आषाढी वारी : यंदा पंढरीची वारी पायी की एसटीनेच?

फोटो स्रोत, BBC/Rahul Ransubhe
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठी
यंदाच्या आषाढी वारीबाबत पुण्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीत निर्णय झाला नसून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली शुक्रवारी पुण्यात पालखी सोहळ्याच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. यंदाची वारी कमीत कमी वारकऱ्यांसह पायी करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी इच्छा यावेळी वारकऱ्यांनी बोलून दाखवली.
बैठकीविषयी माहिती देताना अजित पवार म्हणाले, "आजच्या बैठकीत वारकरी संप्रदायातील मान्यवरांना बोलावलं होतं. त्यांच्याशी चर्चा केली. कमीत कमी लोकांमध्ये पायी वारी काढू आणि त्याला परवानगी द्या, असं बहुतेकांचं म्हणणं होतं. पण, ते हेदेखील म्हणाले, हे सगळं मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या कानावर घाला आणि जो काही निरोप असेल तो लवकरात लवकर द्या."
ते पुढे म्हणाले, "पालखी निघताना इतर लोक येणार नाही, गर्दी होणार नाही, आम्ही सगळी काळजी घेऊ, असं त्यांचं म्हणणं आहे. वारकरी संप्रदाय जे सांगतो ते करतो, हा गेल्या कित्येक वर्षांचा अनुभव आहे. पण, वारीमध्ये इतरही अनेक घटक सहभागी होत असतात, हाही अनुभव आहे. त्यामुळे आज त्याबाबतचा निर्णय झालेला नाही. तो निर्णय पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळात चर्चा करून राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील."

मंत्रिमंडळाची पुढची बैठक मंगळवारी किंवा बुधवारी असेल. त्यावेळी यंदाच्या आषाढी वारीचा निर्णय होईल, असं अजित पवार यांनी सांगितलं.
आजही महाराष्ट्रात 18 जिल्हे असे आहेत जिथला पॉझिटिव्हिटी रेट महाराष्ट्राच्या सरासरी पॉझिटिव्हिटी रेटपेक्षा जास्त असल्याचं सांगत कोरोनाचं संकट अजून टळलेलं नसल्याचं पवार म्हणाले.
कोरोनामुळे गेल्यावर्षी पायी वारीला खंड पडला. केवळ काही निवडक वारकरी आणि पदाधिकाऱ्यांनाच वारीमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. एसटी महामंडळाच्या 'विठाई' या बसमधून ज्ञानेश्वर महाराजांच्या तसंच तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपूरला नेण्यात आल्या. या वारीत सहभागी झालेल्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.
यंदा आषाढी वारी कशी होणार?
गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये कोरोनाची लाट काहीशी ओसरायला सुरुवात झाली होती. लॉकडाऊन देखील शिथिल करण्यात आला होता. परंतु मार्च 2021 पासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली. यात शहरांबरोबरच ग्रामीण भागात देखील कोरोनाचा प्रसार मोठ्याप्रमाणावर झाला. अनेकांची बेड मिळविण्यासाठी तर अनेकांची ऑक्सिजन मिळविण्यासाठी धावाधाव झाली.

त्यातच पंढरपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमुळे तिथली रुग्णसंख्या वाढल्याचेही आरोप झाले.
सध्या राज्यातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी ती समाधानकारक नाही. त्यामुळे लाखो वारकऱ्यांच्या उपस्थित होणारी वारी यंदासुद्धा एसटी बसमधून होणार की पायी होणार याबाबत स्पष्टता नाही. याबाबत बीबीसी मराठीने वारी सोहळ्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
'पायी वारीलाच परवानगी देण्यात यावी'
नियम तयार करून निवडक वारकऱ्यांच्या उपस्थित पायी वारी करण्यात यावी अशी वारकरी सांप्रदायाची भावना असल्याचं ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक यांनी सांगितलं.
टिळक म्हणाले, "गेला महिनाभर सर्वांसोबत आम्ही विचार विनिमय करत आहोत. शासनाने काही नियम जरुर घालावेत परंतु आम्हाला पायी चालण्याची परवानगी द्यावी अशी वारकऱ्यांची भावना आहे. या पायी वारीत वारकऱ्यांची संख्या किती ठेवायची, काय निकष लावायचे याबाबत शासनाशी चर्चा करणार आहोत. परंतु गेल्या वर्षी पादुका या बसमधून नेण्यात आल्या होत्या, तसं यंदा न होता पायीच वारी व्हावी अशी सगळ्यांची भावना आहे."
'पाचशे वारकऱ्यांच्या उपस्थितीत पायी वारी व्हावी'
"गेल्या वर्षी कोरोनावर ठराविक उपचार पद्धती नव्हती. सध्या कोरोना रुग्णांवर कसे उपचार करावेत याबाबत उपचार पद्धती ठरविण्यात आली आहे. सध्या रुग्णसंख्या देखील कमी झाली आहे. त्यामुळे 500 लोकांच्या उपस्थितीत पायी वारी करवी" असं संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख संजय मोरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
मोरे म्हणाले, "700 वर्षांची पायी वारीची परंपरा आहे. गेल्या वर्षीची परिस्थिती पाहता शासनाला आम्ही सहकार्य केलं. यंदा 350 दिंड्यांचा एक प्रतिनिधी आणि इतर पदाधिकारी यांच्यासोबत पायी दिंडीची परवानगी मिळावी अशी आमची मागणी आहे."

"यात प्रत्येकाची कोव्हिड चाचणी करावी तसंच लसीकरण देखील करावं. त्याचबरोबर या पाचशे लोकांच्या व्यतिरिक्त कोणी यात सामील होणार नाही अशी खबरदारी घेण्यात यावी."
सातही पालखी प्रमुखांची ऑनलाईन बैठक झाली त्यात देखील सर्वांनी पायी वारी करण्यात यावी असंच मत व्यक्त केल्याचे देखील मोरे यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








