पंढरपूर वारी: सोशल डिस्टन्सिंग पाळत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

फोटो स्रोत, Dehu sansthan
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा शुक्रवारी पार पडला. वारकरी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत मास्क लावून त्यात सहभागी झाले. कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर यंदा पायवारी होणार नाहीये. तुकोबांच्या पादुका एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूरला नेल्या जातील.
देहू येथील संत तुकाराम मंदिरात 335 वा पालखी प्रस्थान सोहळा संपन्न झाला. सरकारने सांगितलेल्या नियमांनुसार पालखी सोहळा होणार असल्याचं देहू मंदिराचे ट्रस्टी विशाल मोरे यांनी सांगितलं. विशाल मोरे यांच्याकडेच देहू पालखी सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी आहे.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
कार्यक्रम झाल्यावर संत तुकाराम महाराजांच्या पादुका या मुख्य मंदिरातच राहतील. 29 किंवा 30 जूनला सरकारने दिलेल्या वाहनाने पंढरपूरला पादुका जातील आणि 5 जुलैपर्यंत त्या पादुका पंढरपुरातच राहतील अशी माहिती विशाल मोरे यांनी दिली.
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं मोजक्या प्रतिनधींच्या उपस्थित प्रस्थान होणार आहे. उ
पण आळंदीचा मंदिर परिसर कंटेनमेंट झोनमध्ये असल्यामुळे काही मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पादुकांची पूजा होऊन पालखीचं प्रस्थान होईल पण त्या पादुका 13 ते 30 जून या काळात देऊळ वाड्यात राहतील, अशी माहिती प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.

आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा संबंधी देवस्थान विश्वस्थांची बैठक पार पडली. प्रशासनाने दिलेल्या पर्यायानुसार आषाढी एकादशीच्या दिवशी पादुका पंढरपूरला पोहचतील. मात्र, अद्याप पर्यायांबाबत प्रशासनाचा कोणताच निर्णय आलेला नाही, असे प्रांताधिकारी तेली म्हणाले आहेत.
विठोबाच्या सासरच्या पालखीला सोहळ्याला परवानगी नाही
विदर्भातून कौंडिण्यपूर येथून जाणाऱ्या रुक्मिणी मातेच्या पालखीला परवानगी नाकारण्यात आल्यामुळे तब्बल 425 वर्षांची परंपरा खंडित झाली आहे. अमरावतीतील कौंडिण्यपूर येथून दरवर्षी पंढरपूरला वारी जाते यावेळी पायी वारी जाणार नसल्यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं दिसत आहे. विठ्ठलाची पत्नी रुक्मिणी माता या कौंडिण्यपूरच्या आहेत अशी आख्यायिका आहे.
दशमीलाच जातील पादुका
आषाढातली पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातल्या सर्वांत मोठ्या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानली जाते. पण यंदा कोरोना विषाणूची साथीमुळे पायी आषाढी वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असं असलं तरी आळंदी आणि देहूहून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पादुका नवमी किंवा दशमीला पंढरपूरला जातील.
या पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमान यापैकी कशाने नेणार याबाबतचा निर्णय नंतर होणार आहे. पण देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनाने 29 मे रोजी घेतला होता. त्यानुसारच सर्व कार्यक्रम पार पडेल असं मोरे सांगतात.
या बैठकीला उपस्थित असलेले देहू पालखी सोहळ्याचे प्रमुख विशाल मोरे यांनी सांगितलं की "पालखी प्रस्थान ठरल्या दिवशीच करेल. पण पादुका तिथेच ठेवल्या जातील. त्यानंतर दशमीच्या दिवशी राज्य सरकारनं सांगितल्याप्रमाणे, त्या त्या जिल्ह्याचे पालक मंत्री आणि कलेक्टर सांगतील तसं पादुका पंढरपूरला जातील. मग त्या विमानानं नेतील, की हेलिकॉप्टरनं नेतील की एसटी बसनं नेतील, किती लोक त्यात जातील हा निर्णय स्वतः राज्य सरकार घेणार आहे.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?

तो निर्णय संस्थानांच्या प्रमुखांना सांगितला जाईल. त्याअनुषंगानं पादुका पंढरपूरला जातील. एकादशीला संतांची तिथे पांडुरंगाशी भेट होईल. जर पौर्णिमेपर्यंत थांबण्याची परिस्थिती असेल, तर तिथे थांबण्याची परवानगी देतील नाहीतर एकादशीच्या दिवशी परत यावं लागेल." असं देहूच्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख विशाल मोरे म्हणाले.
सगळ्या मुख्य पालख्यांच्या प्रतिनिधींसोबत एकत्र बैठक झाली आणि सगळ्यांना निर्णय मान्य आहे.
यंदा आषाढी एकादशी 1 जुलैला आहे. त्यासाठी परंपरेनुसार सुमारे तीन आठवडे आधी म्हणजे 12 जून रोजी देहू येथून संत तुकराम यांच्या तर 13 जून रोजी आळंदीतून संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचं प्रस्थान नियोजित आहे.
कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं.
"श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षाची या वारीला परंपरा आहे, राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेत पुढील पंधरा दिवसातील कोरोना स्थिती पाहून पुन्हा वारकरी सांप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून, विश्वासात घेऊनच अंतिम निर्णय घेण्यात येईल," असं पवार म्हणाले होते.
याआधी वारी कधी रद्द झाली होती का?
असा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी शंभर, सव्वाशे वर्षांपूर्वी प्लेग, कॉलरा, फ्लू अशा आजारांच्या साथी आल्या, तेव्हा पंढरपूर ओस पडलं होतं. त्यावेळी स्वरूप बदलून वारीचं आयोजन करण्यात आल्याचं तिथले ज्येष्ठ रहिवासी सांगतात.
यंदा चैत्रातली वारीही लॉकडाऊनमुळे रद्द करण्यात आली होती. दर महिन्याला वारी करणारे वारकरीही गेल्या दोन महिन्यांत इथे आलेले नाहीत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








