मराठा आरक्षण: संभाजी राजे छत्रपती म्हणतात '28 तारखेला माझी भूमिका स्पष्ट करणार'

    • Author, स्वाती पाटील
    • Role, बीबीसी मराठी

मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर असलेले खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे की मराठा आरक्षणाबाबत मी माझी भूमिका मी 28 तारखेला मांडणार आहे.

"70 टक्के मराठा समाज हा गरीब आहे. त्यांच्यासाठी प्रत्येक पक्षाची काय योजना आहे हे तुम्ही स्पष्ट करावे," असं वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केलं.

"शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं, आमचीही तीच भूमिका आहे," असं संभाजी राजे छत्रपती म्हणाले.

तर मी राजीनामा उद्या देतो

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण निर्णय रद्द केल्यानंतर मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. जर माझ्या राजीनाम्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी उद्या राजीनामा देतो असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

सध्या संभाजीराजे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मराठा समाज तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहे तर दुसरीकडे यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मोदींना वारंवार भेट मागूनही वेळ मिळाली नसल्याने याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी 27 मे रोजी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे नाशिक इथं पत्रकार परिषदेत सांगितलं.

मराठा समाजाने 27 तारखेपर्यंत शांत राहावे, त्यादिवशी मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे असं ते म्हणाले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी पंतप्रधानांकडे चारवेळा वेळ मागितली, ती मिळाली नाही.

नाशिक इथं पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. केंद्र आणि राज्य सरकारच्या मराठा आरक्षण विषयावर असलेल्या भूमिकेवर त्यांनी संताप व्यक्त केला.

या अभिनेत्री कोणते प्रश्न घेऊन भेटल्या होत्या?- सचिन सावंत

तर मराठा आरक्षण विषयावर मोदींनी संभाजीराजेंना भेट दिली नाही, यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला. त्यावर ''मराठा आरक्षण हा विषयच माझा नाही. हा राज्याचा विषय आहे, असं मोदींना वाटतं त्यामुळे त्यांनी संभाजीराजेंना भेट दिली नाही," असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पुणे इथं झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीका केली आहे.

सचिन सावंत यांनी ट्वीट करून म्हटलं की, "चंद्रकांत दादा, प्रियांका चोप्रा व कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींना छत्रपती संभाजी राजेंना भेटायला वेळ नाही. राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते. या अभिनेत्री‌ कोणते प्रश्न घेऊन भेटल्या?"

संभाजीराजेंना भेट न देणं महाराष्ट्राचा अपमान आहे , असंही सचिन सावंत यांनी म्हटलं.

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील केंद्र सरकारवर टीका केली होती. मोदींनी खासदार संभाजीराजे यांना भेट नाकारल्याने संभाजीराजे आक्रमक झाल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींना आतापर्यंत तीन पत्र पाठवली त्यांची उत्तरे अपेक्षित आहेत असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं

यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले होते की, ''संसदेतील सर्व खासदारांना मराठा आरक्षण विषयावर एकत्र येण्याचं आवाहन मी केलं होतं. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे सगळे खासदार यासाठी तयार होते. याबाबत बोलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागितली होती. पण अजूनही त्यांची वेळ मिळाली नाही. कोरोना साथीच्या काळात इतक्या खासदारांना कसं भेटणार हा उद्देश असेल म्हणून त्यांनी वेळ दिली नसेल'', असेही संभाजीराजे छत्रपती यांनी या मुलाखतीत म्हटले होते.

दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी पुन्हा लढा उभा करण्याची गरज असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी म्हटले. त्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र राज्याचा दौरा सुरू केला आहे.

या दौऱ्यादरम्यान संभाजीराजे राज्यातील कायदेतज्ज्ञ, अभ्यासक यांच्याशी चर्चा करणार आहेत. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणं हा एक भाग आहे पण त्यासोबतच इतर पर्यायी मार्ग काय आहेत हे शोधण्यासाठी हा दौरा असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षण न्यायालयात टिकण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारला काय सूचना देऊ शकतो याचा अभ्यास या दौऱ्यादरम्यान करणार असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितले.

आरक्षणाचे जनक राजश्री शाहू छत्रपती महाराज यांच्या समाधी स्थळाला अभिवादन करून या दौऱ्याला कोल्हापूर इथून आज सुरुवात झाली कोल्हापूर-पंढरपूर-सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद-नांदेड असा त्यांचा आजचा दौरा असणार आहे. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)