कोरोना संसर्गाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक ठरेल याचा अजून तरी पुरावा नाही - रणदीप गुलेरिया

कोरोना संसर्गाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी अधिक धोकादायक ठरेल याचा अजूनपर्यंत कोणताही ठोस पुरावा समोर आला नाही, अशी बातमी पीटीआय वृत्तसंस्थेनं केंद्र सरकारच्या हवाल्यानं दिली आहे.

एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं की, "कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग झाल्याचं प्रमाण खूप कमी असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळेच आता तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना तीव्र संसर्ग होईल, असं वाटत नाहीये."

"तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग होईल असं म्हटलं जात आहे. मात्र हे अनुमान कोणत्याही ठोस पुराव्यांवर आधारित नाहीये. याचा परिणाम मुलांवर होणारही नाही. त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाहीये," असं गुलेरियांनी म्हटलं.

मानसिक तणाव, स्मार्टफोनचं व्यसन, शिक्षण क्षेत्रातील आव्हान याचा लहान मुलांवर मोठा परिणाम झाला आहे, असंही गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

डॉ. गुलेरिया यांनी काळ्या बुरशीच्या वाढत्या संसर्गाबद्दल बोलताना म्हटलं की, रोग प्रतिकारक्षमता कमी असलेल्या लोकांमध्ये ब्लॅक फंगस, कँडिडा आणि एस्पोरोजेनस संसर्गाचं प्रमाण अधिक दिसून येत आहे.

त्यांच्या मते काळी बुरशी ही मुख्यतः सायनस, नाक, डोळ्यांजवळच्या हाडांमध्ये आढळून येते आणि ती मेंदूपर्यंतही पोहोचू शकते. कधीकधी फुफ्फुसं आणि गॅस्ट्रोइन्टेस्टाइनमध्येही तिचा संसर्ग होऊ शकतो.

सरकारनं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 15 आठवड्यांमध्ये कोव्हिडच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. हे प्रमाण 2.6 पटीनं अधिक आहे. त्याचबरोबर गेल्या दोन आठवड्यांपासून आठवडी पॉझिटिव्हिटी रेटमध्येही घट झाली आहे.

गेल्या 17 दिवसांमध्ये दररोज आढळून येणाऱ्या कोव्हिड रुग्णांच्या प्रमाणामध्ये घट दिसून आली आहेत.

आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दररोज संध्याकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हटलं की, गेल्या 24 तासांत कोव्हिडचे 2, 22, 200 रुग्ण आढळून आले आहेत.

40 दिवसांनंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली दिसली आहे. जिल्हा स्तरावर कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे.

तीन मे रोजी बरं होण्याचं प्रमाण 81.7 टक्के होतं, आता हेच प्रमाण वाढून 88.7 टक्के झालं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)