HSC, CBSE Board Exam: बारावीच्या परीक्षेसाठी सीबीएसईचे दोन पर्याय कोणते?

"दहावीची परीक्षा कोरोनाचा धोका लक्षात घेता रद्द करण्यात आली होती. ही बाजू मुंबई उच्च न्यायालयात मांडू," असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.

आज (23 मे) देशातील शिक्षणासंदर्भात परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी विविध राज्यातील शिक्षणमंत्री सहभागी झाले. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, महिला व बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

या बैठकीत सीबीएसई बोर्डाने बारावीच्या परीक्षेसाठी दोन पर्याय सुचवले आहेत. यावर विविध राज्यातील शिक्षणमंत्र्यांना 25 मेपर्यंत अभिप्राय देण्याची मुदत देण्यात आली आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी बारावीच्या परीक्षेबाबत अंतिम निर्णय 25 मे नंतर आणि 1 जूनपूर्वी जाहीर करू असं सांगितलं आहे.

"केंद्र सरकारने दिलेल्या पर्यायांचा आम्ही विचार करू. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत येत्या दोन दिवसांत बोर्डाच्या परीक्षांबाबत बैठक होणार आहे. यापर्यायांवरही चर्चा करण्यात येईल," असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

या बैठकीत बारावीच्या परीक्षेसंदर्भात सीबीएसईनं मांडलेल्या दोन पर्यांयाची माहिती वर्षा गायकवाड यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

सीबीएसई बोर्डाचे दोन पर्याय कोणते?

पहिला पर्याय: मोजक्या महत्त्वाच्या अनिवार्य विषयांची परीक्षा नियमित पद्धतीने घेतली जाऊ शकते. यासाठी मर्यादित परीक्षा केंद्र असतील.

174 विषयांपैकी 20 विषय सीबीएसई बारावी बोर्डाकडून महत्त्वाचे किंवा अनिवार्य मानले जातात. यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, बिझनेस स्टडिज, जिओग्राफी इकोनॉमिक्स, अकाऊंटंसी, इंग्रजी अशा विषयांचा समावेश आहे. यापैकी मोजक्या विषयांचीच परीक्षा घेण्याचा पर्याय सीबीएसई बोर्डाने दिला आहे.

या महत्त्वाच्या विषयांच्या मार्कांवर आधारितच एकूण सर्व विषयांचे मूल्यांकन केले जाईल. परीक्षा पूर्व तयारी, परीक्षा आणि निकाल जाहीर करण्यासाठी एकूण तीन महिन्याचा कालावधी आवश्यक असल्याचंही बोर्डाने म्हटलं आहे. ही परीक्षा ऑगस्टमध्ये होऊ शकते आणि निकाल सप्टेंबरपर्यंत जाहीर होईल.

परंतु तीन महिन्याच्या कालावधीत सुरक्षितरित्या हे करता येणार असेल तरच या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो असंही बोर्डाने स्पष्ट केलं आहे. पण यामुळे शैक्षणिक वर्ष सप्टेंबरपर्यंत पुढे ढकललं जाईल आणि उच्च शिक्षणासाठी विविध शाखांचे प्रवेशही यामुळे रखडण्याची शक्यता आहे.

या पर्यायासाठी सीबीएसई बोर्डाने 1 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान परीक्षा आणि 20 सप्टेंबरपर्यंत निकाल जाहीर होऊ शकतो असंही म्हटलं आहे.

दुसरा पर्याय: कनिष्ठ महाविद्यालयाच्या पातळीवर परीक्षा घेणे

बारावीत विद्यार्थी ज्या कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत तिथेच परीक्षा घेतली जाऊ शकते. परीक्षेचा कालावधी 180 मिनिटांऐवजी (तीन तास) 90 मिनिटं (दीड तास) असेल. ही परीक्षाही महत्त्वाच्या विषयांसाठीच होईल.

विद्यार्थ्यांना एक भाषा विषय आणि इतर तीन विषयांची निवड करण्याची संधी असेल. पाचव्या आणि सहाव्या विषयाचे मूल्यांकन या चार विषयांच्या निकालाच्या आधारे जाहीर होईल.

या परीक्षेसाठी वस्तूनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) आणि थोडक्यात उत्तरांसाठी (शॉर्ट अनसर) प्रश्नपत्रिका असेल. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दोन संधी दिल्या जातील. (पहिली 15 जुलै ते 1 ऑगस्ट आणि दुसरी 5 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट)

परीक्षा झाल्यानंतर पुढील पंधरा दिवसात निकाल जाहीर केला जाईल.

कोरोनासंदर्भातील कोणत्याही कारणामुळे विद्यार्थी परीक्षेला हजर होऊ शकला नाही तर परीक्षेची दुसरी संधी विद्यार्थ्यांना मिळेल.

परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची मागणी

परीक्षेसाठी विद्यार्थीहिताचा निर्णय घ्या अशी भूमिका महाराष्ट्राने या बैठकीत मांडली, तसंच परीक्षा घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे लसीकरण करा अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठकीत केली.

दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनीही परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करून माहिती दिलीय.

ते म्हणाले, "17-18 वयोगटासाठी कोणती लस देता येईल हे पाहून केंद्र सरकारने लस विद्यार्थ्यांसाठी मागवावी किंवा ज्या लस देशात उपलब्ध आहेत त्या बारावीच्या विद्यार्थ्यांना देता येतील का ते पहावे.

सर्व विद्यार्थ्यांचे अगोदर लसीकरण करा मग परीक्षा घ्या. लस न देता परीक्षा घेणे मोठी चूक ठरेल. लस उपलब्ध करून दिल्यास दिल्लीत आम्ही दोन आठवड्यात बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करू."

विविध राज्यांमधील शिक्षणमंत्र्यांना आता 25 मेपर्यंत आपल्या सूचना लेखी स्वरुपात देण्यास सांगण्यात आलं आहे. बारावी परीक्षेसंदर्भात अंतिम निर्णय लवकरच घेऊ असं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी म्हटलंय.

बैठकीनंतर वर्षा गायकवाड यांनी म्हटलं, "विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. कोर्टासमोर परीक्षा रद्द करण्यासंदर्भातला निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतल्याचे सांगू. बारावीची परीक्षा कशी असेल याबाबत आठवड्य़ाभरात चित्र स्पष्ट होईल. काही तांत्रिक बाबी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल."

दहावीची परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. बारावीची परीक्षा घेत आहात मग दहावीची परीक्षा का नाही? असा सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं होतं. 20 मे रोजी झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने परीक्षा रद्द केल्याचा निर्णय आम्ही का रद्द करू नये? असंही न्यायालयाने म्हटलं होतं.

येत्या आठवड्यात राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयासमोर आपलं म्हणणं मांडण्याचे निर्देश दिले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)