तौक्ते: खवळलेल्या अरबी समुद्रातून शेकडो जणांना नौदलानं कसं वाचवलं?

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

वीस फुटांहून उंच लाटा, ढगांमुळे दाटलेला अंधार आणि भर समुद्रात थैमान घालणारा वारा.

नुसत्या कल्पनेनंही थरकाप उडेल, अशा या परिस्थितीत अडकलेल्या जहाजांवरून भारतीय नौदल आणि तटरक्षक दलानं शेकडो जणांना सुखरूप वाचवलं. ही त्याचीच कहाणी आहे.

"हे म्हणजे सिंहाच्या मुखात हात घालायचा होता आणि सुरक्षित बाहेर पडायचं होतं," अशा शब्दांत व्हाईस अडमिरल अ‍ॅडमिरल मुरलीधर सदाशिव पवार यांनी या बचाव मोहिमेचं वर्णन केलं आहे.

पवार हे भारतीय नौदलाचे डेप्युटी चीफ ऑफ नेव्हल स्टाफ आहेत. मीडियात जारी केलेल्या व्हीडियोमध्ये ते सांगतात, "मी गेल्या चार दशकांत पाहिलेल्या सर्वांत खडतर बचाव मोहिमांपैकी ही एक आहे."

अरबी समुद्रात वादळी वाऱ्यांना तोंड देत ही बचाव मोहीम मंगळवारीही सुरू राहिली.

नेमकं काय घडलं होतं?

तौक्ते चक्रीवादळामुळे सोमवारी (17 मे) अरबी समुद्रात उधाण आलं होतं. त्याचा तडाखा बॉम्बे हाय तेलक्षेत्राजवळ ओएनजीसीसाठी काम करणाऱ्या जहाजांना बसला.

हे सगळे बार्ज म्हणजेच सपाट तळ असलेली जहाजं होती आणि ती नांगर टाकून उभी होती. पण वादळानं समुद्रात पाण्याची पातळी वाढली, आणि ही जहाजं सुटून पाण्यात हेलखावे खाऊ लागली.

पापा-305 (P-305) या बार्जवर 273 जण अडकले असल्याचा संदेश नौदलाला मिळाला. सोमवारी संध्याकाळी हा बार्ज बुडाला. त्यातल्या 180 जणांना वाचवण्यात यश आलं. बाकिच्यांचा शोध अजून सुरू आहे.

तर गल कन्स्ट्रक्टर या आणखी एका बार्जवरील 137 जणांनाही नौदल आणि तटरक्षक दलानं मंगळवारी सहीसलामत वाचवलं. कुलाबा पॉइंटपासून भरकटलेलं हे जहाज पालघरमधल्या माहिमजवळ गेलं होतं.

गुजरातच्या पिपावाव बंदरापासून समुद्रात साधारण 90-92 किलोमीटरवर आणखी तीन जहाजं भरकटली. सागर-भूषण हे ड्रिल शिप (ऑईल रिग किंवा तेलाचा शोध घेणारं जहाज) 101 जणांसह भरकटलं होतं. तर सपोर्ट स्टेशन तीन (SS-3) या बार्जवर 196 जण होते. ग्रेट शिप अदिती हे आणखी एक जहाजही वादळाच्या तडाख्यात सापडलं.

या जहाजांवरील सर्वजण बचावले असून, त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

असा केला वादळाचा सामना...

नौदल आणि तटरक्षक दलाच्या बोटींनी सोमवारी बचाव मोहीम सुरू केली खरी, पण तेव्हा परिस्थिती फारच बिकट होती. 'तौक्ते' चक्रीवादळ मुंबईजवळच्या समुद्रात घोंघावत होतं आणि त्यानं अत्यंत तीव्र चक्रीवादळाचं रूप धारण केलं होतं.

बचावपथकं थेट चक्रीवादळाला जाऊन धडकणार होती, आणि तिथून लोकांना वाचवून परत आणणं मोठं खडतर आव्हान होतं.

दुपारी एकच्या सुमारास INS कोची, INS कोलकाता, INS तलवार या युद्धनौका बचावकार्यासाठी बाहेर पडल्या.

पण INS कोची मुंबईपासून साठ किलोमीटर्सपेक्षाही आत समुद्रात असलेल्या P-305 या बार्जपर्यंत पोहोचेपर्यंत संध्याकाळचे सात वाजून गेले होते आणि त्याच सुमारास हे जहाज बुडालं.

गडद अंधारात, पाऊस आणि वादळाचा सामना करत साठ जणांना वाचवण्यात आलं. मध्यरात्रीच्या सुमारास ही मोहीम थांबवण्यात आली आणि सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणांसोबतच सगळे पुन्हा कामाला लागले.

या मोहिमेत हवामान हाच सर्वांत मोठा अडथळा होता. व्हाईस अडमिरल मुरलीधर पवार बचावपथकासमोर या अडचणींची यादीच समोर मांडतात.

"80-90 नॉट्‌स म्हणजे ताशी 148-160 किलोमीटर वेगानं वाहणारे वारे, 6 ते 8 मीटर (सुमारे 18-25 फूट) उंचीच्या लाटा, सतत कोसळणारा पाऊस, दाट ढग आणि शून्य दृष्यमानता…

"अशा परिस्थितीत अंगावर पडणारं पाणी म्हणजे पाऊस आहे की सी-स्प्रे म्हणजे वाऱ्यानं उडणारे समुद्राच्या पाण्याचे तुषार आहेत हेही कळत नाही. जहाज चालवणं हेच तेव्हा एक मोठं आव्हान बनतं."

ते पुढे सांगतात, "एरवी असं वातावरण असेल, तर जहाजाच्या डेकवर कोणी जात नाही. कारण तिथे सगळं निसरडं झालेलं असतं. पण अशा परिस्थितीत लोकांना वाचवायचं काम करायचं आणखी कठीण आणि आव्हानात्मक बनतं."

पण त्या परिस्थितही नौदलानं पापा 305 या बार्जवरून शेकडो लोकांना बाहेर काढलं.

युद्धनौकांचं यश

भारतीय नौदलाच्या INS कोची आणि INS कोलकाता या विनाशिकांसह INS तलवार, INS बियास, INS बेटवा आणि INS तेग नौकाही बचावकार्यात सहभागी झाल्या होत्या.

"या सगळ्या युद्धनौका आहेत आणि त्या भक्कम साडेसातशे टन वजनाच्या आहेत. एखाद दुसऱ्या क्षेपणास्त्राचा मारा सहन करुन लढत राहाण्याची त्यांची क्षमता आहे." अशी माहिती व्हाईस अडमिरल पवार देतात.

अर्थात समुद्र असा फरक करत नाही. तिथे सराव आणि शिस्त कामाला येते, हेही ते नमूद करतात.

कोव्हिडच्या काळातलं मोठं बचावकार्य

कोरोना विषाणूच्या जागतिक साथीदरम्यानच हे वादळाचं संकट उभं ठाकलं होतं. त्या पार्श्वभूमीवर बचावकार्यासाठी नौदलानं काही विशेष तयारी केली होती का, याविषयी व्हाईस अडमिरल पवार यांन विचारण्यात आलं.

ते सांगतात, "कोव्हिड असो वा नसो, आमचं ध्येय एकच होतं, लोकांना पाण्यातून वाचवणं. आमच्या जहाजांवरील सर्वांना सुदैवानं कोव्हिशील्डचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तसंच समुद्रात अडकलेले लोक हे तिथे काही काळापासून काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून कुणाला कोव्हिड होण्याचा धोकाही कमी आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)