योगी आदित्यनाथ : 'विरोधी पक्षाने भीती निर्माण केल्याने लोकांनी ऑक्सिजनसाठी धावपळ केली' #5मोठ्याबातम्या

आजची विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा पाहूया थोडक्यात,

1. 'विरोधी पक्षाने भीती निर्माण केल्याने लोकांनी ऑक्सिजनसाठी धावपळ केली' - योगी आदित्यनाथ

विरोधी पक्षाने लोकांमध्ये कोरोनाची भीती निर्माण केल्याने लोक ऑक्सिजनसाठी धावपळ करू लागले आणि घाबरले, असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

योगी आदित्यनाथ काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी (17 मे) ते मुजफ्फरनगर येथे बोलत होते. साथीच्या आजारात लोकांना धीर देण्याची गरज असताना विरोधी पक्ष मात्र लोकांना घाबरवत आहेत असा आरोप त्यांनी केला.

उत्तर प्रदेशात 300 ऑक्सिजन प्लँट उभारण्याचं काम सुरू असल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी यावेळी दिली, तसंच उत्तर प्रदेशामध्ये कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या झाल्याचंही ते म्हणाले.

आतापर्यंत साडेचार कोटी कोरोना चाचण्या झाल्याची माहिती त्यांनी दिली.

2. 'उद्धव ठाकरे यांची झापड मुंबईपुरती' - प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

राज्य संकटात असताना मुख्यमंत्र्यांची झापड केवळ मुंबईपुरती आणि उपमुख्यमंत्र्यांची केवळ बारामतीपुरती असल्याचा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. टीव्ही 9 ने वृत्त दिलं आहे.

ते म्हणाले, "या परिस्थितीमुळेच उच्च न्यायालय आदेश देत आहे. राज्यातली संकट दूर करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडत आहेत."

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी मोदी सरकार जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केलीय. ममता बॅनर्जी यांना निवडणुकीत हरवण्याच्या अट्टाहासामुळेच दुसऱ्या लाटेत अपयश आल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी टोला लगावला आहे. पत्र लिहिण्यापेक्षा नागपुरात कोव्हिड सेंटर्स उभारावीत असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांना दिला.

3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेला कोरोनाचा फटका?

देशातील कोरोना आरोग्य संकटात केंद्र सरकारला परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याची टीका सातत्याने मोदी सरकारवर केली जातेय. याचा फटका आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेलाही बसताना दिसतोय. कारण पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा आलेख कमालीचा घसरत असल्याचे चित्र आहे.

द क्विंटने हे वृत्त दिलं आहे.

'मॉर्निंग कन्सल्ट' या अमेरिकेच्या 'ग्लोबल अप्रूव्हल रेटिंग'च्या आकडेवारीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा आलेख घसरला असून अन्य एका सर्वेक्षणात तो 50 टक्क्यांपेक्षा खाली उतरला आहे.

ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, ब्राझील, भारत, कॅनडा, इटली, दक्षिण कोरिया,जपान, स्पेन, यूके, अमेरिका या देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या लोकप्रियेतेविषयी माहिती आणि आकडेवारी गोळा करणाऱ्या तसंच या देशातील प्रमुख नेत्यांना मान्यता देण्यासंदर्भात जनतेचे मत जाणून घेणाऱ्या मॉर्निंग कन्सल्टच्या 'ग्लोबल अप्रूव्हल रेटिंग'ची ताजी आकडेवारी समोर आली आहे.

त्यानुसार, सर्व प्रमुख नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात लोकप्रिय असले तरी 1 एप्रिल ते 11 मे या कालावधित त्यांच्या लोकप्रियतेमध्ये 10 टक्क्यांनी घसरण झाली आहे. एप्रिलपूर्वी मोदींचे 'अप्रूव्हल रेटिंग' 73 टक्के एवढे होते पण आता ते 63 टक्क्यांवर आलं आलं आहे.

भारतीय पॉलस्टरच्या ओआरमॅक्स मीडियाने घेतलेल्या सर्वेक्षणातही असंच चित्र आहे. त्यांनी विविध 23 राज्यांमध्ये सर्वसामान्यांकडून सर्वेक्षण करून घेतले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता 57 टक्के एवढी होती. 11 मेपर्यंत त्यात 9 टक्क्यांनी घसरण झाली आणि आता त्यांची लोकप्रियता 48 टक्के एवढी आहे. पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता 50 टक्क्यांपेक्षा खाली आल्याचं संस्थेचं म्हणणं आहे.

4. संजय राऊत यांच्याकडून भाजपच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक

शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून भाजपचे नेते आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे कौतुक करण्यात आले आहे. अनाथ मुलांना दर महिन्याला पाच हजार रुपये देण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

'सामना'मधून मध्य प्रदेशातील भाजप सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले आहे.

कोरोना काळात अनाथ मुलांची संख्या वाढत असून ही सुद्धा एक मोठी आपत्ती आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे, 'कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकांना वाचवण्यात यश आले नाही तर त्यांच्या निराधार मुलांना तरी आधार देता आला पाहिजे. यासाठी सामाजिक संस्था पुढाकार घेतीलच पण राज्यकर्ते अनाथ मुलांसाठी काय करतात हे मध्यप्रदेश सरकारने दाखवून दिले आहे. यासाठी शिवराजसिंह चौहान यांचे आभार!'

कोरोनामुळे आई-वडील दोघांचाही मृत्यू झाल्यास अनाथ मुलांसाठी काय करता येईल? यावर महाराष्ट्रातही चर्चा झाली. पण हा प्रश्न नुसताच चिघळत न बसता मध्यप्रदेश सरकारने यावर तातडीने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असंही त्यांनी म्हटलं आहे.

5. अमरावतीच्या डॉ. संदेश गुल्हाणे यांनी स्कॉटिश संसदेत घेतली खासदारकीची शपथ

मूळचे अमरावतीचे असलेले आणि सध्या स्कॉटलँड येथे वैद्यकीय सेवा देणारे डॉ. संदेश प्रकाश गुल्हाणे यांनी नुकतीच स्कॉटिश संसदेश खासदारकीची शपथ घेतली आहे. स्कॉटिश संसदेत निवडून जाणारे भारतीय वंशाचे ते पहिलेच खासदार आहेत. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

डॉ.संदेश गुल्हाणे यांचे वडील लंडनमध्ये खासगी कंपनीत नोकरी करत होते. डॉ. संदेश यांचा जन्मही तिथेच झाला. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी विविध क्षेत्रात कार्य करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी स्कॉटिश राजकारणात प्रवेश केला. 2021 मध्ये स्कॉटलंडच्या संसद निवडणुकीत ग्लासगो पोलॉक मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर झाली.

स्कॉटिश कन्झरर्वेटिव्ह आणि युनियनवादी पार्टीकडून ते खासदार म्हणून निवडून आले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)