You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तौक्ते चक्रीवादळ : महाराष्ट्रात 6 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी
तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा मुंबईसोबतच राज्याच्या इतर भागांनाही बसला असून अनेक ठिकाणी झाडं पडून, इमारतींची पडझड झाली आहे.
या चक्रीवादळामुळे एकूण 6 मृत्यू झाले असून 9 जण जखमी झाले आहेत. एकूण 12 हजार 500 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
मृतांमध्ये जळगावमधील दोन सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. वादळामुळे शेतातील झोपडीवर चिंचेचे झाड कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
जळगावमध्ये रविवारी (16 मे) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अंचलवाडी येथे घडली. ज्योती बल्लू बारेला (वय 16) आणि रोशनी बल्लू बारेला (वय 10) अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत.
पुढील काही तासांसाठी चक्रीवादळाचं केंद्र हे मुंबईपासून 160 किलोमीटरच्या आसपास समुद्रात आहे. त्यामुळे मुंबईत वेगवान वारे वाहत असून पाऊसही पडत आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे अशी माहिती यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली
मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. पण तौक्तेचा प्रभाव रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह उर्वरित महाराष्ट्रातही जाणवत आहे.
2 हजार 542 बांधकामांची पडझड
या चक्रीवादळामुळे 2 हजार 542 घरांची अंशत: तर 6 घरांची पूर्ण पडझड झाली आहे. यात ठाणे जिल्ह्यात 24, पालघर 4, रायगड 1784, रत्नागिरी 61, सिंधुदुर्ग 536, पुणे 101, कोल्हापूर 27, सातारा 6 अशा पडझड झालेल्या बांधकामांचा तपशील आहे.
तर रायगड आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी 2 अशी 4 जनावरे मरण पावली आहेत.
रायगमध्ये मृतांची संख्या 3 वर पोहोचली, तर दोघेजण जखमी
रायगड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील 1 हजार 784 घरांचे अंशत: नुकसान तर 5 घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे.
एकूण 3 व्यक्तींचा मृत्यू झाला असून, दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्याचबरोबर 2 प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील एकूण 2 हजार 299 कुटुंबांचे मिळून एकूण 8 हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या आतापर्यंत 7866 नागरिकांचे स्थलांतर पूर्ण झालं आहे.
अलिबाग-605, पेण-193, मुरुड-1067, पनवेल-168, उरण-451, कर्जत-45, खालापूर-176, माणगाव-1309, रोहा- 523, सुधागड-165, तळा- 135, महाड-1080, पोलादपूर-295, म्हसळा- 496, श्रीवर्धन- 1158 अशी तालुकानिहाय स्थलांतर झालेल्यांची आकडेवारी आहे.
तसंच, रायगडच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात चक्रीवादळासंदर्भात उपाययोजनांसाठी 'वॉर रूम' कार्यान्वित करण्यात आली आहे.
रत्नागिरीत काय स्थिती?
रत्नागिरीतही चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. मिरकरवाडा परिसरात भिंत कोसळल्यामुळे 12 दुचाकी वाहनांचं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडं कोसळली असून ती हटविण्याचं काम सुरू आहे.
पुण्यात वादळी वारा आणि पाऊस यामुळे शहराच्या विविध भागात झाडं पडण्याच्या घटना घडल्या आहेत. अग्निशमन दलाकडे शहराच्या विविध भागात गेल्या चोवीस तासात झाडं पडण्याच्या 40 घटनांची नोंद झाली आहे. मात्र यामध्ये कोणीही जखमी झालं नाहीये.
कोल्हापुरात वादळी वारे आणि पावसाचा फटका बसला आहे. शहरातील राजारामपुरी भागात विजेची तार झाडावर पडल्याने झाडाने पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच ही आग विझवली. खबरदारी म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी घराची पडझड आणि झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
अमरावतीमध्येही अचानक वादळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यात शहरातील काही भागातील वीज प्रवाह खंडित झाला. आणि झाडांची पडझड झाली आहे.
सिंधुदुर्गमध्ये 137 घरांची पडझड
सिंधुदुर्गाला या चक्रीवादळाचा फटका बसला. जवळपास 137 घरांची चक्रीवादळामुळे पडझड झाल्याचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी (16 मे) सांगितलं.
सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की, "या वादळाचा वेग सिंधुदुर्ग-रत्नागिरी दरम्यान काही ठिकाणी 64 किमी प्रति तास, तर काही ठिकाणी 70 किमी प्रति तास होता. प्रशासन सतर्क असल्यानं कुठेही जीवितहानी झाली नाही. मात्र, 137 घरांची पडझड झाली. शाळा, शासकीय कार्यालयं यांचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. काही कुटुंबांना स्थलांतरित करावं लागलं."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)