कोरोना आहार : वारकऱ्यांचा विरोध डावलून संजय गायकवाडांनी चिकन बिर्याणी, अंडी वाटली : #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, facebook
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया,
1. आमदार संजय गायकवाड यांनी कोव्हिड रुग्णांना चिकन बिर्याणी आणि अंडी वाटली
रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मांसाहार करण्याचा सल्ला देणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांनी आता कोव्हिड रुग्णांना चिकन बिर्याणी आणि उकडलेली अंडी दिली आहेत. टिव्ही 9 ने हे वृत्त दिलं आहे.
केंद्र सरकारच्या आवाहनानंतर बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनीही काही दिवसांपूर्वीच कोव्हिड रुग्णांनी चिकन, अंडी, मासे असा आहार घ्यावा असं म्हटलं होतं. यामुळे रुग्णांची प्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते असंही ते म्हणाले होते. पण यावरून त्यांच्यावर टीकाही करण्यात आली.
काही वारकऱ्यांकडून संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला.
संजय गायकवाड यांनी बुलडाण्यातील स्त्री रुग्णालयात कोव्हिड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना चिकन बिर्याणी आणि उकडलेल्या अंड्यांचे वाटप केलं आहे. तसंच मासांहार करण्याचे फायदे सांगितल्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असं सांगत संजय गायकवाड यांनी या विषयाचं ज्यांनी राजकारण केलं त्यांची मात्र माफी मागणार नाही, असंही स्पष्ट केलं.
2. कोव्हिडमुळे मृत्यू झालेल्या दोन वर्षांच्या चिमुकल्याला पालकांनी सोडलं
झारखंडमध्ये दोन वर्षांच्या मुलाला हॉस्पिटलमध्येच सोडून आई-वडिलांनी पळ काढल्याचं समोर आलं आहे. दोन वर्षांच्या या मुलाला ताप आला होता. कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पण उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. सकाळने हे वृत्त दिलं आहे.
आई-वडील मात्र मृत्यू झालेल्या आपल्या दोन वर्षाच्या मुलाला सोडून गेले. सलग दोन दिवस हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी मुलाच्या आई-वडिलांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण हॉस्पिटलमधून गेल्यानंतर ते परतलेच नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
झारखंडमधील रिम्स हॉस्पिटलमधील वॉर्ड बॉय रोहित बेदियाने या मुलाचे अंत्यसंस्कार केले.
कोव्हिडची लागण झाल्यानंतर लहान मुलगा काही दिवस व्हेंटिलेटरवर होता. त्यानंतर आई-वडील अचानक गायब झाल्याचं हॉस्पिटलने सांगितलं. 12 मे रोजी लहान मुलाचा मृत्यू झाला.
3. महाराष्ट्र सरकारची प्रशंसा देवेंद्र फडणवीसांना पचत नाही- नवाब मलिक
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची बदनामी करत असल्याचा आरोप केला आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.
आपल्या पत्रात देवेंद्र फडणवीसांनी "हेच महाराष्ट्र मॉडेल का? ते देशाने स्वीकारायचं का?" असे प्रश्न उपस्थित केले होते. यावर नवाब मलिक म्हणाले, "विरोधी पक्षनेते सोनिया गांधी यांना पत्र लिहून खोटी माहिती पसरवत आहेत. महाराष्ट्र सरकार सुरुवातीपासून गांभीर्याने काम करत आहे. आम्ही कधी कोरोना मृत्यूचा आकडा लपवलेला नाही. महाराष्ट्रात 6200 लॅब तयार करण्यात आल्या. कोरोनाच्या चाचण्या वाढवल्या. सर्व माहिती उघडपणे लोकांसमोर ठेवत आहोत."

फोटो स्रोत, Nawab Malik/FACEBOOK
यामुळेच सुप्रीम कोर्ट, नीती आयोग यांनी राज्य सरकारचे प्रशंसा केली आहे आणि हेच विरोधी पक्षाला पचत नाही असंही नवाब मलिक म्हणाले.
ते पुढे सांगतात, "जगभरात महाराष्ट्राच्या कामाची, मुंबई मॉडेलची दखल घेतली जात असताना त्यांना ही कामं दिसत नसतील तर काही इलाज करू शकत नाही."
4. मालिकांच्या शूटिंगचे सर्व मार्ग बंद?
महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरापासून लॉकडाऊन असल्याने मनोरंजनसृष्टीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. मुंबईसह राज्यात शूटिंग बंद असल्याने मालिका आणि चित्रपटाचे शूटिंग राज्याबाहेर होऊ लागले.
सुरुवातीला गोव्यात सर्वाधिक शूटिंग सुरू झालं. पण तिथेही कोव्हिड रुग्णसंख्या प्रचंड वाढल्याने मालिकांना आपला मुक्काम हलवावा लागला. त्यानंतर अनेकांनी ओडिसाला जाऊन शूटिंगसाठी सेट बसवले. पण आता ओडिसा सरकारनेही मालिकांच्या शूटिंगसाठी परवानगी रद्द केलीय. न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मालिक बंद पडून नये म्हणून शूटिंगसाठी निर्मात्यांचीही खटपट सुरू आहे. पण आता त्याचेही पर्यायी मार्ग बंद होताना दिसत आहेत. परिणामी आगामी काळात अनेक मालिकांचे प्रसारण यामुळे पुन्हा एकदा बंद पडू शकते.
5. पुण्यात सराईत गुंडाच्या हत्येनंतर अंत्ययात्रेला प्रचंड गर्दी
पुण्यात एका सराईत गुन्हेगाराच्या मृत्यूनंतर अंत्ययात्रेला समर्थकांनी प्रचंड गर्दी केली. झी 24 तासने हे वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माधव वाघाटे याला ठार मारण्यात आलं. भांडणं झाली हे सांगण्यासाठी त्याला फोन करण्यात आला होता. त्यासाठी तो बिबवेवाडी परिसरात गेला. त्याठिकाणी बाजारपेठेत दहा जाणांनी त्याला घेरलं. ट्यूब, लोखंडी रॉड आणि चाकूने त्याच्यावर वार करण्यात आले.
माधव वाघाटे हा सराईत गुंड होता. या प्रकरणातील आरोपही याच परिसरात राहत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








