You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोहन भागवत : 'कोरोनाची दुसरी लाट सरकार आणि जनता बेफिकीर राहिल्यानेच' #5मोठ्याबातम्या
1. 'सरकार आणि जनता बेफिकीर राहिल्यानेच कोरोनाची दुसरी लाट'- मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जनता आणि सरकार जबाबदार असल्याचं सांगत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पहिल्या लाटेचा यशस्वी सामना केल्यानंतर सरकार आणि लोक बेफिकिर झाले असं मोहन भागवत म्हणाले.
टीव्ही 9 मराठीने हे वृत्त दिलं आहे.
पुण्यात 'पॉझिटिव्ह अनलिमिटेड' या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, 'आता मात्र लोकांना पॉझिटिव्ह राहूनच या संकटाला तोंड देणं गरजेचं आहे. कोव्हिड निगेटिव्ह राहण्यासाठी सावधान रहावं लागणार आहे. तसंच या परिस्थितीत तर्कहीन वक्तव्यं टाळायला हवीत. ही परीक्षेची वेळ असून सर्वांनी एकजूट रहायला हवं. एक टीम म्हणून काम करायला हवं.'
तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू असताना त्याला घाबरून न जाता आपण स्वत:ला तयार केलं पाहिजे असंही मोहन भागवत म्हणाले.
2. देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस करावे- नाना पटोले
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्यानंतर नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्याचे धाडस करावे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.
नाना पटोले यांनी म्हटलं, "देशाचे स्मशानभूमीत रुपांतर करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहावे. देशात आज दररोज चार लाखांहून अधिक रुग्ण आणि चार हजारांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. या परिस्थितीला केंद्रातील भाजप सरकारचा अहंकार आणि गलथानपणा कारणीभूत आहे. सोनिया गांधी यांना पत्र लिहून देशाचे स्मशान बनविणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत."
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी 12 फेब्रुवारी 2020 रोजी कोरोना त्सुनामीसारखं संकट असल्याचा इशारा दिला होता. पण नरेंद्र मोदी यांनी ते गांभीर्याने घेतले नाही अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.
3. मराठा आरक्षणासाठी 5 जूनपासून राज्यव्यापी मोर्चा- विनायक मेटे
राज्य सरकारने मराठा आंदोलनाचा आवाज दाबण्यासाठी लॉकडाऊन वाढवला असल्याचा आरोप आमदार विनायक मेटे यांनी केला आहे.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारच्या निषेधार्थ आज (16 मे) बीडमधून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला सुरुवात होणार होती. मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्याने 5 जून रोजी भव्य आंदोलनाचा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे.
न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
18 तारखेला प्रत्येक तालुक्यात आंदोलनाचा इशारा देणारे पत्र देण्यात येणार आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
"त्या दिवशी मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही. या मोर्चाच्या नियोजनासाठी प्रत्येक गावात कोरोनाचे नियम पाळून घोंगडी बैठका घेण्यात येणार आहेत. या मोर्चात मराठासह धनगर, ब्राह्मण, लिंगायत, मुस्लीम समाजाचे लोकही सहभागी होणार आहेत. त्यामुळे हा मोर्चा केवळ एका समाजाचा नसून यात सर्वजण सहभागी होणार आहे," असंही विनायक मेटे म्हणाले.
4. यंदा आषाढी पालखी सोहळा पायी होणार?
आषाढी एकादशीसाठी पालखी सोहळा गेल्यावर्षीप्रमाणे बसने नको तर पायीच व्हावा अशी आग्रही मागणी राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या संस्थानांनी केली आहे. यंदा वारीच्या पार्श्वभूमीवर व्हीडिओ कॉन्फरंसिंगद्वारे नुकतीच एक बैठक पार पडली. सकाळने हे वृत्त दिलं आहे.
कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून वारीसाठी आषाढी एकादशीचा पालखी सोहळा पायीच व्हावा असा आग्रह संस्थांनी केला आहे. वारकऱ्यांची संख्या सरकार ठरवू शकतं पण पालखी सोहळा बसने नको अशीही भूमिका या बैठकीत मांडण्यात आली.
जुलै महिन्यात पालखी सोहळा आहे. गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पालखी सोहळा बसमधून करण्यात आला होता.
संत तुकाराम महारज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी सांगितलं, की कोरोनाची कालमर्यादा कोणालाही माहीत नाही. कोरोना काळातच सध्या सर्व व्यवहार सुरू आहेत. यंदाचा पालखी सोहळा सरकारच्या नियमानुसार व्हावा. मात्र, तो पायी व्हावा अशी सर्वांची मागणी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
संत मुक्ताईंचा पालखी सोहळा 14 जूनला आहे. त्यापूर्वी शासनाने 1 जूनपर्यंत भूमिका स्पष्ट करावी असं ठरल्याचंही ते म्हणाले.
5. यूपीएससी परीक्षा पास केलेल्या प्रांजल नाकटचा कोरोनामुळे मृत्यू
नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा पास केलेल्या प्रांजल नाकट या अकोल्यातील तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाची लागण झाल्यानंतर फुफ्फुसं बाधित झाल्याने प्रांजलला हैद्राबाद येथे उपचारासाठी नेण्यात आलं होतं. याठिकाणी यशोदा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान प्रांजलचा मृत्यू झाला. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.
प्राजंल नाकट हा अकोल्या जिल्ह्यातील तांदळी बुजरूक गावातील रहिवासी होता. त्याने यूपीएससी परीक्षा पास केल्यानंतर जिल्हाधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण होणार म्हणून संपूर्ण गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तलाठ्याच्या मुलाने यूपीएससीसारख्या परीक्षेत यश मिळवल्याने आई-वडिलांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. पण हा आनंद पूर्ण होण्याआधीच नाकट कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
6 मे रोजी प्रांजलला एअर अँब्यूलंसने हैद्राबादला हलवण्यात आलं. त्याची फुफ्फुसं निकामी होत होते. उपचापरासाठी 55 लाख रुपयांची आवश्यकता होती. त्याचीही जुळवाजुळव कुटुंबियांनी समाज, नातेवाईक आणि मित्र परिवाराकडून केली होती. पण शनिवारी (15 मे) त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)