You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'म्युकर मायकोसिस टाळण्यासाठी स्टेरॉइड्सचा अतिवापर टाळायला हवा'
कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असताना, रुग्णालयांमध्ये इन्फेक्शन कंट्रोल प्रोटोकोल पाळणं आवश्यक आहे. बुरशीसारखा संसर्ग वाढत असून त्यामुळे मृत्यू ओढवत असल्याचं लक्षात येत आहे असं एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं.
म्युकर मायकोसिस चेहरा, नाक, डोळ्याचा भाग, मेंदू यावर परिणाम होऊ शकतो. बुरशीचा संसर्ग वाढल्यास दृष्टी जाऊ शकते. बुरशीचा संसर्ग फुप्फुसापर्यंत जाऊ शकतो.
स्टेरॉइड्सचा गैरवापर हे म्यूकर मायकोसिस मागचं महत्त्वाचं कारण आहे. कोव्हिड झालेल्या रुग्णांना मधुमेहही असेल आणि स्टेरॉइड्स देण्यात येत असतील तर बुरशीचा त्रास होण्याची शक्यता असते. म्युकर मायकोसिस टाळण्यासाठी स्टेरॉइड्स नियंत्रण प्रमाणात देण्यात यावीत.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने भारताला तडाखा दिला आहे मात्र त्याचवेळी बुरशी जीवघेणी ठरत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
कोरोनाच्या उपचारांदरम्यान रुग्णांवर स्टेरॉइड्सचा अतिरिक्त वापर, गैरवापर यामुळे बुरशीची वाढ होते आहे. या बुरशीला म्युकर मायकोसिस म्हणतात. दिल्लीत अशा बुरशीचा त्रास झालेले चार रुग्ण आहेत. चौघांनाही मधुमेहाचा त्रास आहे. अनेकदा कोरोनाऐवजी या काळ्या बुरशीने रुग्ण जीव गमावत आहेत असं लोकनायक रुग्णालयाचे संचालक डॉ. सुरेश कुमार यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, "स्टेरॉइड्सचा वापर मर्यादित ठेवायला हवा. ऑक्सिजन पातळी 90च्यावर असणाऱ्या रुग्णांना देण्यात आलं तर काळ्या बुरशीचा त्रास होऊ शकतो. लवकर निदान होणं महत्त्वाचं आहे. चेहऱ्याचा सिटी स्कॅन केला तर हे इन्फेक्शन लक्षात येऊ शकतं. बुरशीचा त्रास होणाऱ्यांना अम्फोटेरिसीन हे औषध देण्यात येत आहे".
कोव्हिड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. प्रसंगी काही जणांना आपला डोळा देखील गमवावा लागला आहे. एका बुरशीमुळे होणाऱ्या संसर्गामुळे अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे.
कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका हा सहव्याधी म्हणजेच मधुमेह, उच्च-रक्तदाब, हृदयरोग असलेल्या लोकांना अधिक आहे. कोव्हिड-19 ची लागण झालेल्यांपैकी 70 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण सहव्याधीने ग्रस्त आहेत. त्यापैकी अनेकजणांचा कोव्हिड बरा होत आहे पण तरीदेखील त्यांना या व्याधींचा त्रास होत आहे.
म्युकर मायकॉसिस' आजाराची लक्षणं?
नाकातून रक्त येणं
मेंदूत संसर्ग झाल्यास तीव्र डोकेदुखी
डबल व्हिजन म्हणजे, एखादी गोष्ट दोन दिसून येते
म्युकर मायकॉसिस' ची कारणं?
रोगप्रतिकारशक्ती चांगली असलेल्यांना याचा त्रास होत नाही. पण, ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे. त्यांच्यासाठी ही बुरशी घातक आहे असं मुंबईच्या सर जे.जे रुग्णालयाचे नाक-कान घसातज्ज्ञ विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण यांनी सांगितलं.
मधुमेही रुग्णांना जास्त त्रास का होतो?
कोरोनासंसर्गात मधुमेह वाढतो. इम्युनिटी कमी झाल्याने म्यूकर मायकॉसिस जास्त घातक ठरतोय. मधुमेह नसलेल्यांना उपचारादरम्यान स्टिरॉईड दिल्याने शरीरात सारखेची मात्रा वाढते. अशा रुग्णांमध्येही हा आजार घातक असल्याचं आढळून आलंय," असं डॉ. चव्हाण म्हणतात.
म्युकर मायकॉसिसच्या देशभरातून केसेस पहायला मिळत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत याचं प्रमाण प्रचंड वाढलंय. गेल्यावर्षी गुजरात आणि मध्यप्रदेशात ही प्रकरणं आढळून आली होती.
उपचार काय?
म्युकर मायकॉसिसवर योग्यवेळी उपचार झाले नाहीत. तर, संसर्ग शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचू शकतो.
म्युकर मायकॉसिसग्रस्त रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागते. सायनस क्लिअर करण्यासाठी 'एन्डोस्पोपिक सायनस सर्जरी' करुन बुरशी काढली जाते. सध्या बुरशीचा त्रास होणाऱ्या रुग्णांना एम्फोटेरिसिन इंजेक्शन दिलं जात आहे. त्याची मागणी वाढल्याने किंमतीतही वाढ झाली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)