कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मानसिक स्वास्थ्य बिघडतंय?

    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी

कोरोना काळात मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचं स्पष्ट होतं आहे.

कामधंदा नसल्याने बेरोजगारीला कंटाळून पत्नी आणि मुलाचा खून करुन एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील कदमवाकस्ती येथे 9 मेला घडली होती. हनुमंत शिंदे (वय 38 ) असे खून करुन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव होते. हनुमंत हा सिमेंटच्या टेम्पोवर ड्रायव्हर होता तर ही शिवणकाम करत होती. हनमुंतकडे काम नव्हते त्यामुळे तो आर्थिक अडचणीत होता आणि याच विवंचनेतून त्याने स्वतःचे कुटुंब संपवले.

दुसरी घटना देखील पुण्यातल्या राजेंद्रनगरमधील. लॉकडाऊनच्या काळात एकटे राहणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीने अनेक दिवस काही न खाल्ल्याने त्याची प्रकृती खालावली. 10 दिवस झाले व्यक्ती घराच्या बाहेर येत नसल्याने नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने घरात प्रवेश केला. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. अनेक दिवस खाल्ले नसल्याने त्यांच्या फुप्फुसांवर परिणाम झाला. त्यात त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला.

कोरोनाच्या भीतीने रुग्णांनी आत्महत्या केल्याच्या घटना देखील या पूर्वी समोर आल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा मोठी होती. यात लागण होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली.

अनेकांची जवळचे नातेवाईक या काळात गमवावे लागले. तर अनेक रुग्णांना वेळेत बेड आणि उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या वाढत्या भीतीमुळे अनेकांना मानसिक आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यातच सततच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक अस्थिरतेमुळे देखील अनेकांना नैराश्याने ग्रासले आहे.

वरील घटना या पुण्यातील असल्या तरी राज्यातील इतर भागांमध्ये देखील अशा घटना समोर येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनातील मानसिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मानसिक स्वास्थाविषयी तज्ञ काय म्हणतात ?

''आमच्या ओळखीतल्या एकाचे वडील गेले. तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता. वडिलांच्या अचानक जाण्याने सर्व जबाबदाऱ्या आता त्याच्यावर येऊन पडल्या आहेत. अशात आता त्याला निर्णय घेता येत नाहीयेत आणि मानसिक ताण येतोय.''

पुण्यात प्रॅक्टिस करणाऱ्या समुपदेशिका दीपा राक्षे सांगत होत्या. या काळात त्यांच्याकडे सुद्धा मानसिक समस्या घेऊन अनेक लोक येत आहेत. कोव्हिडमुळे रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांना देखील समुपदेशनाची गरज भासत असल्याचं त्या सांगतात. अशा रुग्णांचं वेळेत समुपदेशन झालं तर त्यांना मानसिक आधार मिळेल आणि ते कोव्हिडमधून लवकर बाहेर येतील असं त्यांना वाटतं.

दीपा राक्षे म्हणाल्या, ''या महामारीमध्ये अनेकांना भावनिक आणि आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. अनेकजण वर्षभरापासून घरुन काम करतायेत त्यांना भावनिक बधिरपणा जाणवू लागला आहे. आणि त्यामुळेच नैराश्य येणं, एकमेकांवर राग काढणं अशा गोष्टी घडतायेत. नैराश्यातून टोकाची पाऊले देखील उचलली जातायेत. यातून बाहेर पडण्यासाठी ही परिस्थिती स्विकारणं ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हा काही शेवट नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. जी गोष्ट आपल्या हाताबाहेर आहे त्याबाबत फारसा विचार न करता पुढे जाणं महत्त्वाचं आहे.''

''अनेकांची सहनशक्ती संपत आली आहे हेही खरं आहे. परंतु ही जागतिक आपत्ती आहे, आपणच यातून जात नाहीये याचा सुद्धा विचार करायला हवा'' असं देखील राक्षे सांगतात.

माहितीचा भडिमार नको

मनोविकार तज्ञ डॉ. भालचंद्र कालमेघ म्हणतात ''दुसरी लाट अचानाक आल्याने याबाबत लोकांची मानसिकदृष्ट्या तयारी नव्हती. त्यामुळे एखादी वाईट गोष्ट घडल्यानतर ती स्विकारण्यासाठी वेळ लागतो. यासाठी एकमेकांशी सातत्याने बोलत राहणं आणि सकारात्म विचार करत राहणं महत्त्वाचं आहे.

या परिस्थितीत देखील बदल होणार आहे हे लक्षात ठेवणं देखील आवश्यक आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या माहितीचा सातत्याने भडिमार देखील मानसिकतेवर परिणाम करु शकतो. त्यामुळे जेवढी माहिती गरजेची आहे तितकीच घ्यायला हवी.''

मानसिक आधार देण्यासाठी समुपदेशकांचा ग्रुप

नागरिकांना मोफत समुपदेशन करण्यासाठी पुण्यातील काही प्रशिक्षित समुपदेशक एकत्र आले असून त्यांच्या मार्फत नागरिकांचं मोफत समुपदेशन करण्यात येत आहे. या ग्रुपची समन्वयक आणि अभिनेत्री, पर्ण सांगते, ''दररोज अनेक फोन आम्हाला येत आहेत. अनेकांनी या लाटेत त्यांच्या जवळच्या व्यक्तींना गमावलंय. त्यामुळे ते पुन्हा उभं राहण्यासाठी मार्ग आणि आधार शोधत आहेत.

काही मुलांनी दोन्ही पालक कोरोनामुळे गमावले आहेत. अशा मुलांना देखील मानसिक आधाराची खूप गरज आहे. आम्हाला येणाऱ्या फोन्समध्ये कोरोनाची आणि भविष्याची भीती आणि पॅनिक वाटणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेक विद्यार्थ्यांचे देखील फोन येत आहेत.

कोरोनाची समस्या फक्त मानसिक आणि शारीरिक नसून सामाजिक, राजकीय आणि व्यवस्थापकीयही आहे. त्यामुळे लोकांमधे, एक प्रकारची असहायता आलीय. अनेकांचे जॉब गेल्याने, बेरोजगारीचे प्रश्नही गंभीर आहेत. अनेक लोक स्वत:हून न लाजता फोन करतात ही चांगली गोष्ट आहे. अजूनही अशा प्रकारची मदत मागण्यास लोकांना भीती आणि लाज वाटते. व्यक्ती आणि समाज म्हणून मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणं गरजेचं आहे.''

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)