You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : गुजरातमध्ये 71 दिवसांत 1.23 लाख मृत्यू, सरकारी आकडा मात्र 4218 #5मोठ्याबातम्या
आज विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर छापून आलेल्या बातम्यांचा आढावा
1. गुजरातमध्ये 71 दिवसांत 1.23 लाख मृत्यू, सरकारी आकडा मात्र 4218
कोरोना संसर्गाच्या उद्रेकामुळे गुजरातमध्ये विदारक परिस्थिती आहे. गुजरातमध्ये गेल्या 71 दिवसांमध्ये 1 लाख 23 हजार 871 जणांचा मृत्यू झाला असला तरी गुजरातमधला सरकारी आकडा 4218 इतकाच असल्याचं दैनिक भास्करने केलेल्या तपासात आढळलंय.
लोकमतने याविषयीचं वृत्त दिलंय.
गुजरातमधल्या 33 जिल्ह्यांमध्ये 1.23 लाखांपेक्षा जास्त मृत्यू प्रमाणपत्रं नोंदवण्यात आली असली तरी सरकारी आकडेवारी 4218 इतकीच आहे. त्यामुळे 71 दिवसांत सव्वा लाख लोकांचा जीव कसा गेला असा प्रश्न उपस्थित होतोय.
पण गेल्या वर्षीच्या तुलनेत 71 दिवसांत मरण पावलेल्यांची संख्या दुप्पट असल्याचं दैनिक भास्करने आकडेवारी दाखवत म्हटलंय.
जागतिक साथ यावर्षी अधिक भीषण - WHO
कोरोना व्हायसच्या संसर्गाचं दुसरं वर्ष हे अधिक भीषण असणार असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय.
जपानमध्ये ऑलिम्पिक होऊ घातलंय. आणि याच्या 10 आठवडे आधीच जपानमधल्या आणखी 3 प्रातांमध्ये कोरोना विषयक आणीबाणी जाहीर करण्यात आलीय. ऑलिम्पिक रद्द करण्यात यावं अशी मागणी करण्यात येतेय.
'कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या जागतिक साथीच्या दुसऱ्या वर्षावर आम्ही नजर ठेवून आहोत, पण पहिल्या वर्षाच्या तुलनेत हे दुसरं वर्षं कित्येक पटींनी भीषण आहे," असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर जनरल टेड्रॉस गब्रायसेस यांनी म्हटलंय.
3. गंगेत वाहणारे मृतहेद भारताचे नाहीत - कंगना राणावत
सध्या गंगेत वाहणाऱ्या मृतदेहांचे व्हायरल होणारे व्हीडिओ हे भारतातले नसून नायजेरियाचे असल्याचं अभिनेत्री कंगना राणावतने म्हटलंय.
जग एकीकडे कोरोनाशी झुंजत असतानाच काही देशांमध्ये युद्ध सुरू असताना तिथले सगळे लोक त्यांच्या देशाच्या बाजूने आहेत, पण मृतदेहांचे हे व्हीडिओ व्हायरल करणारे लोक त्यांच्याच देशाच्या पाठीत सुरा खुपसत असल्याचंही कंगनाने म्हटलंय.
अक्षय्य तृतीया आणि ईदच्या निमित्ताने शुभेच्छा देणारा व्हीडिओ कंगना राणावतने फेसबुकवर पोस्ट केलाय. ट्विटरने काही दिवसांपूर्वी कंगनावर कारवाई करत तिचं ट्विटर हँडल बंद केलं होतं.
पण फेसबुकवरच्या या व्हीडिओनंतर कंगना राणावतला पुन्हा ट्रोल करण्यात येत असल्याचं सकाळने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.
4. कोरोनालाही जगण्याचा अधिकार - भाजप नेते त्रिवेंद्र सिंह रावत
कोरोनाही एक जीव आहे आणि त्यालाही जगण्याचा अधिकार असल्याचं वक्तव्यं उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केलंय.
"मनुष्य स्वतःला बुद्धीजीवी समजतो पण आपण त्या विषाणूला संपवण्यासाठी तयार आहोत, त्यामुळेच तो स्वतःमध्ये बदल घडवत आहे," असं त्रिवेंद्र सिंह रावत यांनी म्हटलंय.
काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी यावर टीका करायला सुरुवात केली आहे. रावत यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हीडिओवरही अनेकांनी काँमेंट करत निषेध दर्शवलाय.
लोकसत्ताने याविषयीची बातमी दिली आहे.
5. पुनर्विचार याचिकेवरच्या बैठकीत विनोद पाटील - गुणरत्न सदावर्तेंमध्ये खडाजंगी
मराठा आरक्षण प्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. याबद्दल व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील आणि आरक्षण विरोधी याचिका दाखल करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंमध्ये खडाजंगी झाली.
गुणरत्न सदावर्तेंनी माजुर्डे शब्दाचा वापर केल्यानंतर विनोद पाटील भडकले. संविधानिक भाषेमध्ये चर्चा करू पण चुकीची भाषा सहन करणार नसल्याचं विनोद पाटील यांनी म्हटलंय.
टीव्ही 9 मराठीने याविषयीचं वृत्त दिलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)