You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लस नसताना कॉलरट्यून का ऐकायची? हायकोर्टाचा केंद्राला सवाल #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. लस नसताना कॉलरट्यून का ऐकायची?हायकोर्टाचा केंद्राला सवाल
"तुमच्याकडे लोकांना द्यायला लशी नाहीत, पण एखाद्या व्यक्तीने फोन केल्यास लसीकरणाची कंटाळवाणी कॉलरट्यून ऐकावी लागते," अशा शब्दांत न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारलंय.
"लोकांना देण्यासाठी तुमच्याकडे लसी नाहीत, पण लसीकरण करू असं तुम्ही सांगत आहात. लशीच नसतील तर लसीकरण कोण करणार?" अशी विचारणाही दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली आहे.
सकाळने याविषयीची बातमी प्रसिद्ध केली आहे.
2. व्हायरस पुन्हा डोकं वर काढू शकतो, संसर्गाचा 'पीक' येईल - डॉ. व्ही. के. पॉल
कोरोना व्हायरसच्या संसर्गाची दुसरी लाट इतकी गंभीर असेल, याची कल्पना केंद्र सरकारला नव्हती हा आरोप नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी फेटाळलाय.
ते म्हणाले, "कोव्हिड-19ची दुसरी लाट येईल, हा धोक्याचा इशारा आम्ही वारंवार दिला होता. सिरो सर्व्हेत 20 टक्के जण पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं होतं, पण उर्वरित 80 टक्के जनतेला संसर्गाची शक्यता आहेच. हा व्हायरस कुठेही गेलेला नाही आणि इतर देशांत त्याने पुन्हा डोकं वर काढलं होतंच."
देशातल्या संसर्गाच्या लाटेचा उच्चांक वा Peak नेमका कधी येईल, याविषयी सांगताना ते म्हणाले, "या व्हायरसमध्ये होत असलेले बदल पाहता, कोणत्याही मॉडेलद्वारे हा उच्चांक नेमका किती मोठा असेल, हे सांगणं कठीण आहे. म्हणूनच हा पीक येण्याची आणि व्हायरस पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता आहे. म्हणूनच देशभरात त्यासाठीची तयारी करणं गरजेचं आहे."
इकॉनॉमिक टाईम्सने याविषयीची बातमी दिली आहे.
3. कोव्हॅक्सिनचं उत्पादन करण्यासाठी सरकारचं लस उत्पादक कंपन्यांना आमंत्रण
देशात असलेल्या लशींच्या तुटवड्यावर तोडगा म्हणून कोव्हॅक्सिनचं उत्पादन करण्यासाठी कंपन्यांनी पुढे यावं, असं सरकार आणि भारत बायोटेकने लस उत्पादक कंपन्यांना आवाहन केलंय.
कोव्हॅक्सिनचं उत्पादन वाढवण्यासाठी इतर कंपन्यांनाही यात सहभागी करून घेण्याच्या प्रस्तावाचं कोव्हॅक्सिनची मूळ उत्पादक कंपनी भारत बायोटेकने स्वागत केल्याचं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटलंय.
ज्या कंपन्यांना कोव्हॅक्सिनचं उत्पादन करण्याची इच्छा असेल, त्यांना सरकार मदत करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
ऑगस्ट ते डिसेंबर 2021 या काळात देशाकडे विविध लशींचे 200 कोटींपेक्षा जास्त डोसेस असण्याची अपेक्षा असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं होतं. NDTV ने ही बातमी दिली आहे.
4. वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सेसमध्ये रेमडेसिव्हीरची निर्मिती
वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीमध्ये तयार करण्यात आलेल्या रेमडेसिव्हीरची पहिली बॅच गुरुवारी उपलब्ध झाली. एकूण 17 हजार इंजेक्शन्सचा साठा या पहिल्या बॅचमध्ये उपलब्ध झालाय.
नागपूरसह संपूर्ण राज्यात या रेमडेसिव्हरचं वितरण केलं जाणार आहे.
राज्यामध्ये रेमडेसिव्हीरचा तुटवडा भासत असताना भाजप नेते नितीन गडकरींनी या जेनेटिक लाईफ सायन्सेस लॅबला रेमडेसिव्हीर निर्मितीची परवानगी मिळवून दिल्याचं टीव्ही 9 मराठीने दिलेल्या वृतात म्हटलंय.
30 हजार इंजेक्शन्सची निर्मिती करण्याचं या कंपनीचं उद्दिष्ट असून नितीन गडकरींच्या व्हर्च्युअल उपस्थितीत या इंजेक्शन्सचं वितरण सुरू करण्यात आलं.
5. गोव्याला विना पास जाणाऱ्या पृथ्वी शॉला पोलिसांनी अडवलं
पास न घेता मुंबईहून कोल्हापूरमार्गे गोव्याला जायला निघालेल्या क्रिकेटर पृथ्वी शॉ याला आंबोली पोलिसांनी रोखलं. पासशिवाय पुढे जाण्याची परवानगी देणार नसल्याचं पोलिसांनी पृथ्वी शॉला सांगितलं.
शॉ ने पोलिसांना विनंती करूनही पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यानंतर पृथ्वी शॉने तिथूनच या पाससाठी ऑनलाईन अर्ज केला.
तासभर थांबल्यानंतर त्याचा पास आला आणि तो पाहिल्यानंतरच त्याला पुढे मार्गस्थ होण्याची परवानगी देण्यात आल्याचं लोकमतने दिलेल्या बातमीत म्हटलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)