You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हिमंत बिस्व सरमांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड, मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा
आसाम विधानसभेत भाजप नेते आणि आमदार हिमंत बिस्व सरमा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री आणि भाजप नेते नरेंद्र सिंह तोमर यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.
याचाच अर्थ हिमंत बिस्वा सरमा हेच आसामच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार हे निश्चित झालं आहे.
यामुळे विद्यमान मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांचं सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचं स्वप्न मात्र भंगलं आहे.
दिल्ली आणि गुवाहाटीत याबाबत भारतीय जनता पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरू होतं.
सर्बानंद सोनोवाल आणि हिमंत बिस्व सरमा या दोन्ही नेत्यांना शनिवारी (8 मे) दिल्लीत बोलवण्यात आलं होतं. तिथं भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दोन्ही नेत्यांच्या बैठका झाल्या. त्यानंतर आज (9 मे) हिमंत बिस्व सरमा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
आसाम विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. 126 सदस्यीय आसाम विधानसभेत भाजपने 60 जागांवर विजय मिळवला आहे. तर सहयोगी पक्ष असलेल्या आसाम गण परिषदेने 9 तर युनायटेड पीपल्स पार्टीने (लिबरल) 6 जागांवर विजय मिळवला आहे. अशा प्रकारे भाजपकडे 75 जागांसह स्पष्ट बहुमत आहे.
आसाममध्ये भाजपने यंदा मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा केली नव्हती. अखेर हिमंत बिस्व सरमा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
हिमंत बिस्व सरमा यांनी विधानसभा निवडणुकीत जालुकबारी मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसच्या रोमेन चंद्र बोरठाकूर यांचा 1 लाख 1 हजार 911 मतांनी पराभव केला.
दरम्यान, मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी काही वेळापूर्वीच राज्यपाल जगदीश मुखी यांच्या हातात आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोनोवाल यांनी याआधीच भाजपच्या विधानसभा सदस्यांच्या बैठकीत राजीनामा दिलेला होता. या बैठकीनंतर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी हेमंत बिस्वा सरमा यांनी भाजपच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी हेमंत बिस्वा सरमा यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे सरमा यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सरमा हे आजच राज्यपाल जगदीश मुखी यांची भेट घेणार असून उद्या (10 मे) त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
हिमंत बिस्वा सरमा कोण आहेत?
एका सर्वसामान्य कुटुंबातून येणारे हिमंत बिस्व यांचा जन्म गुवाहाटीच्या गांधी वस्तीत झाला. त्यांच्या कुटुंबातलं कुणीही राजकारणात नव्हतं. मात्र, हिमंत यांनी शालेय जीवनापासून एक उत्तम वक्ता अशी स्वतःची ओळख निर्माण केली होती.
एकदा आसामचे माजी मुख्यमंत्री प्रफुल्ल कुमार महंत यांनी माझ्याशी अनौपचारिक गप्पा मारताना सांगितलं होतं की, आसाम आंदोलनावेळी एका शालेय विद्यार्थ्याच्या भाषणाने माझं लक्ष वेधलं होतं. तो मुलगा हिमंत बिस्व सरमा होते.
हिमंत बिस्व शाळेत असताना राज्यात अवैध बांगलादेशींविरोधात ऑल आसाम स्टुडंट यूनियनच्या (आसू) नेतृत्त्वाखाली आसाम आंदोलन सुरू झालं होतं.
यातूनच ते विद्यार्थी राजकारणाकडे आकर्षित झाले आणि आसूमध्ये सहभागी झाले. आसूमध्ये काम करताना ते रोज संध्यासाळी वर्तमानपत्रांसाठी प्रसिद्धी पत्रक आणि इतर साहित्य घेऊन जायचे. काही वर्षांनंतर आसूने त्यांना गुवाहाटी युनिटचं सरचिटणीसपद दिलं.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर हिमंत यांनी इथल्या प्रसिद्ध कॉटन महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतलं. इथे त्यांची तीन वेळा कॉटन कॉलेज यूनियन सोसायटीच्या सरचिटणीसपदी निवड झाली.
1901 साली स्थापन झालेल्या कॉटन कॉलेजमधल्या विद्यार्थी राजकारणातून अनेक मोठे नेते निघाले. हिमंत बिस्व यांनी याच महाविद्यालयातून पॉलिटिकल सायंसमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर सरकारी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली.
त्यानंतर राजकारणात सक्रीय असताना त्यांनी गुवाहाटी विद्यापीठातून पीएचडी मिळवली.
हिमंत बिस्व सरमा यांच्या राजकारणातील प्रवेशाविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार नव कुमार ठाकुरिया म्हणतात, "हिमंत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या हाताखाली काम करूनच स्वतःची राजकीय कारकिर्द घडवली, यात शंका नाही. मात्र, त्यांना राजकारणात आणलं ते काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री हितेश्वर सैकिया यांनी. हितेश्वर सैकिया हेच त्यांचे पहिले राजकीय गुरू होते.
1991 साली काँग्रेसचं सरकार आलं आणि हितेश्वर सैकिया मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यावेळी त्यांनी हिमंत यांना विद्यार्थी आणि तरुण कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सल्लागार समितीचं सचिवपद दिलं. इथूनच हिमंत यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली."
"हिमंत सुरुवातीपासूनच खूप महत्त्वाकांक्षी होते आणि म्हणूनच त्यांना मिळालेली पहिली जबाबदारी त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. त्यांनी राज्यातल्या सर्व शाळा-महाविद्यालयांच्या ग्रंथालयांमध्ये पुस्तक वाटपाची योजना सुरू केली आणि त्यांच्या या कामाचं बरंच कौतुकही झालं."
हिमंत यांनी त्यावेळी हितेश्वर सैकिया यांचे निकटवर्तीय म्हणून स्थान मिळवण्यासाठी बरीच मेहनत घेतली होती.
नव ठाकुरिया सांगतात, "हितेश्वर सैकिया यांना एक सवय होती. रात्री झोपण्यापूर्वी ते दुसऱ्या दिवशीची सर्व वर्तमानपत्रं वाचत. त्यांच्या सरकारविरोधात एखादी बातमी छापली जाणार असेल तर ते त्यांना आदल्या दिवशी रात्रीच कळायचं. त्यामुळे ते सरकारच्या स्पष्टीकरण विभागाला आदल्या रात्रीच उद्या काय स्पष्टीकरण द्यायचं, याची तयारी करण्याचे आदेश द्यायचे. त्यावेळी राज्यात जेमतेम 4 ते 5 वर्तमानपत्रं होती. त्यामुळे रात्री 12 वाजेच्या आधीच सैकिया यांच्याकडे वृत्तपत्रं यायची. सुरुवातीला हिमंत बिस्व सरमा हेच हितेश्वर सैकिया यांना ही वृत्तपत्रं आणि माहिती पोहोचवायचे आणि यातूनच ते हळूहळू सैकिया यांचे निकटवर्तीय बनले."
त्यांची सक्रियता आणि व्यासंग सैकिया यांनी हेरली. यातूनच काँग्रेसने 1996 साली आसाम आंदोलनातले दुसऱ्या क्रमांकाचे नेते भृगू फुकन यांच्याविरोधात जालुकबाडी विधानसभा मतदारसंघातून हिमंत यांना उमेदवारी दिली.
मात्र, हिमंत पहिली निवडणूक हरले. त्यानंतर 2001 साली हिमंत यांनी फुकन यांचा जवळपास दहा हजार मतांनी पराभव केला. तेव्हापासून ते सातत्याने जालुकबाडी मतदारसंघातून निवडून येत आहेत.
सुवर्णकाळ
2001 साली तरुण गोगोई आसामचे मुख्यमंत्री झाले आणि हिमंत बिस्व सरमा यांचा राजकारणातला सुवर्णकाळ सुरू झाला. 2002 साली गोगोई यांनी हिमंत यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं.
खरंतर 2001 साली काँग्रेसने तरुण गोगोई यांना आसामच्या मुख्यमंत्री पदी विराजमान केलं, त्यावेळी ते आसामच्या जनतेसाठी तुलनेने नवखे होते. कारण तोवर गोगोई केंद्राच्या राजकारणात सक्रीय होते.
आणि म्हणूनच गोगोई यांनी हिमंत बिस्व सरमा आणि रकिबुल हुसैन या दोघांचाही आपल्या मंत्रिमंडळात समावेश केला. राज्यात ते या दोन मंत्र्यांना घेऊनच फिरायचे.
सुरुवातीला हिमंत यांना कृषी आणि नियोजन व विकास खात्याचं राज्यमंत्रिपद देण्यात आलं. मात्र, काही वर्षातच त्यांना अर्थ, शिक्षण-आरोग्य यासारख्या मोठ्या खात्यांची जबाबदारी मिळाली. पुढे हळू-हळू ते राज्याचे गोगोई यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून उदयास आले.
राज्यात सक्रीय असलेल्या बंडखोर संघटनांना नियंत्रणात ठेवण्यापासून ते अवैध नागरिकांशी संबंधित मोठ-मोठ्या विषयात हिमंत यांचं मत महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं. आपल्या कामामुळे ते गोगोई यांचे राईट हँड बनले.
तरुण गोगोई यांनी त्यांना स्वतःची राजकीय आणि प्रशासकीय क्षमता सिद्ध करण्याची पुरेपूर संधी दिली. हाग्रामा मोहिलारीच्या बोडोलँड पिपल्स पक्षाला सरकारमध्ये सहभागी करुन घेणं असो किंवा इतर कुठलाही राजकीय निर्णय, हिमंत सर्वत्र असायचे.
एखाद्या मुख्यमंत्र्यांप्रमाणेच हिमंत नियमितपणे सर्व आमदारांची बैठक घ्यायचे. एकप्रकारे ते आसामचे 'शैडो सीएम' बनले. त्यामुळे त्यांनाही असं वाटू लागलं की तरुण गोगोई यांच्या निवृत्तीनंतर आसामच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची त्यांनाच मिळेल.
मात्र, 2011 साली मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा कार्यभार स्वीकारल्यानंतर गोगोई यांनी त्यांचे चिरंजीव गौरव गोगोईला राजकारणात पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू केले. इथूनच गोगोई आणि हिमंत बिस्व सरमा यांच्या संबंधात कटुता यायला सुरुवात झाली.
2015 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर हिमंत बिस्व सरमा यांनी आपल्या कामातून स्वतःला भाजपमध्ये रिलॉन्च केलं.
त्यामुळे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यानंतर राज्यातली सर्व महत्त्वाची खाती सरमा यांना मिळाली. 2016 साली पहिल्यांदा आसाममध्ये सरकार स्थापन करणाऱ्या भाजपने आपल्या सर्व जुन्या नेत्यांना बाजूला सारत हिमंत बिस्व सरमा यांना पक्षात दुसऱ्या क्रमांकाचं स्थान दिलं.
आसाममध्ये भाजपच्या घवघवीत यशानंतर भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांना काँग्रेस मुक्त भारत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न ईशान्य भारतात हिमंत बिस्व सरमा पूर्ण करू शकतात, असा विश्वास वाटू लागला.
त्यामुळे 24 मे 2016 रोजी सर्बानंद सोनवाल यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच काही तासातच अमित शहा यांनी ईशान्य भारतात राजकीय आघाडीसाठी नॉर्थ-ईस्ट डेमोक्रेटिक अलायंस (नेडा) नावाने एक राजकीय आघाडी उघडली आणि हिमंत बिस्व सरमा यांना या आघाडीचं संयोजकपद दिलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)