You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मराठा आरक्षणाविरूद्ध कोर्टात जाणाऱ्या जयश्री पाटील कोण आहेत?
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळलं आहे. इंद्रा साहनी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जी 50 टक्के आरक्षण मर्यादा आखली होती ती ओलंडण्यास नकार दिला आहे.
मराठा आरक्षण देत असताना 50 टक्क्यांची मर्यादा भंग करण्यासाठी कोणताही वैध आधार नव्हता, असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात नोंदवलं आहे.
मराठा समाजाला आरक्षणाच्या अंतर्गत आणण्यासाठी मराठा समाजातील नागरिकांना शैक्षणिक किंवा सामाजिकदृष्ट्या मागास घोषित करता येऊ शकणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.
- मराठा आरक्षण ज्यामुळे रद्द झालं, तो इंद्रा साहनी खटला काय होता?
- 'मराठा आरक्षणासाठी माझ्या भावाने जे बलिदान दिलं ते व्यर्थ गेलं, असं मला आज वाटतंय'
- मराठा आरक्षण रद्द करताना सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलं?
- मराठा आरक्षणाच्या मागणीचा 40 वर्षांचा प्रवास, काय काय घडलं होतं आतापर्यंत?
- उद्धव ठाकरे सरकारने बाजू नीट न मांडल्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून आरक्षण रद्द - भाजप
ज्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले ती याचिका अॅड जयश्री पाटील (सदावर्ते) यांनी दाखल केलेली होती. ही पहिलीच वेळ नाहीये जेव्हा जयश्री पाटील चर्चेत आल्या आहेत.
याआधीही मराठा आरक्षणाच्या सरकारच्या निर्णयाविरोधात त्यांनी याचिका दाखल केली होती. यासंदर्भातच सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.
कोण आहेत जयश्री पाटील?
जयश्री पाटील यांचा जन्म माहूरगड या गावचा. त्यांचं शालेय शिक्षण तिथेच झालं. पुढे त्यांनी वकिलीचं शिक्षण औरंगाबादमध्ये घेतलं तर LLM मुंबईत केलं. त्यांनी क्रिमिनॉलॉजी या विषयात PhD केली आहे.
मराठा आरक्षणाविरोधात 2014 साली पहिली याचिका दाखल करणाऱ्या डॉ लक्ष्मणराव किसनराव पाटील यांच्या त्या कन्या आहेत, तर अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी आहेत.
त्यांच्याविषयी बोलताना बीबीसी मराठीच्या एका मुलाखतीत गुणरत्न सदावर्ते म्हणाले होते की, "50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही, घटनेच्या मूळ ढाचाला धक्का पोहचतो, या शुद्ध हेतूने जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे,"
याच मुलाखतीत बोलताना त्यांनी असंही म्हटलं होतं की जयश्री पाटील मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. त्यांनी या विषयावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत तसंच त्यांनी राज्य मानवी हक्क आयोग मुंबई इथे राज्य संशोधन अधिकारी म्हणून कामही केलेलं आहे.
"त्यांचा फक्त अभ्यास नाहीये, त्याही पलीकडे जाऊन त्या कायद्याचं चिंतन करतात. त्या चिंतनातूनच जेव्हा 2018 साली मराठा आरक्षणाचं (SEBC) बिल पास झालं तेव्हा त्यांनी राज्यपालांकडे हरकत याचिका दाखल केली होती."
तुमचा मराठा आरक्षणाला विरोध आहे का या प्रश्नाचं उत्तर देताना जयश्री पाटील यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "माझा कोणत्याच जातीच्या आरक्षणाला विरोध नाही. पण जी गोष्टच मुळात घटनाबाह्य आहे तिला समर्थन कसं देणार? 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिलं तर तो ओपन क्लासवर होणारा अन्याय आहे. कोणाला आरक्षणाची गरज आहे, किंवा कोणाला नाही ही वेगळी बाब आहे, पण जी गोष्ट असंवैधानिक आहे तिला कोर्टात आव्हान देणं गरजेच आहे कारण देश हा संविधानानुसार चालतो. कोणत्याही मोर्चा किंवा दडपशाहीने तुम्ही आरक्षण घेऊ शकत नाही किंवा कोणालाही प्रेशराईज करू शकत नाही. न्यायालय हे नेहमी न्यायाच्या बाजून उभं असतं."
अनिल देशमुखांविरोधात याचिका
मराठा आरक्षणाविरोधातल्या याचिकेनंतर तुम्ही माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात याचिका का दाखल केली असं विचारलं असताना त्या म्हणाल्या की, "मी अनेक विषयांवर याचिका करते. माझं कामच आहे की जनहितार्थ याचिका दाखल करणं. आताही माझ्या वेगवेगळ्या याचिका कोर्टासमोर आहेत."
अनिल देशमुख यांच्याविरोधात जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती आणि उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती. त्यांनी आपल्या याचिकेत लिहिलं होतं की, 'अनिल देशमुख लोकांकडून, बिझनेसमनकडून 100 कोटी वसूल करतात. ते स्वतः मराठा पुढारी आहेत, मसल पॉवर आहेत. इतकंच नाही तर शरद पवारांचा वरदहस्त त्यांच्या डोक्यावर आहे. पण ते ताकदवान नेते असले तरी त्यांना अभय नसावं, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.'
याबद्दल पुढे बोलताना त्या म्हणतात, "भ्रष्टाचार हा या देशाला, या राज्याला झालेला कॅन्सर आहे. तो संपूर्ण समाजाला नष्ट करून टाकतो. त्यामुळे हा भ्रष्टाचार करणाऱ्या अनिल देशमुखांसारख्या नेत्यांच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे. त्यांच्यासारखे मराठा नेते आपल्या पदाचा दुरुपयोग करतात."
त्यांनी माध्यमांशी बोलताना असंही सांगितलं की मलबार हिल पोलीस स्टेशनात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्यावर खूप दबाव आणण्यात आला.
या याचिकेवर आदेश देताना हायकोर्टाने हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं होतं आणि सीबीआयला येत्या 15 दिवसात प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करायला सांगितलं आहे.
दरम्यान, अनिल देशमुख गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारनेही यासंदर्भात एक याचिका दाखल केली आहे.
मराठाविरोधी प्रतिमा
स्वतः मराठा असूनही तुमची मराठाविरोधी अशी प्रतिमा का तयार झाली आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणतात, " मी भारत मातेची कन्या आहे, एका स्वातंत्र्यसैनिकाची कन्या आहे. मला जात नाही, मला जात समजतंही नाही. माझ्या वडिलांनी मला जात दिली नाही. त्यामुळे मला त्या चष्म्यातून पाहाता येत नाही. मी फक्त संविधानाला मानते, आणि स्वतःला भारतीय समजते. मी कोणाच्या विरोधात नाही, कोणाच्या बाजूने नाही, फक्त संविधानानुसार चालते. त्यामुळे माझ्या जातीचा उल्लेख कोणीही करू नये असं माझं म्हणणं आहे."
दुसरीकडे जयश्री पाटील यांनी मराठा समाजाची बदनामी केल्याचं मराठा क्रांती मोर्चाने म्हटलं आहे. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करू असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने एक परिपत्रक काढून दिला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)