कोल्हापुरातील गोकुळ दूधसंघात सतेज पाटील गटाचा विजय, 30 वर्षांनी सत्तांतर

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. कोल्हापुरातील गोकुळ दूधसंघात सतेज पाटील यांचा विजय, 30 वर्षांनी सत्तांतर

गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीत जवळपास 30 वर्षांनी सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळालं. या निवडणुकीत केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पॅनेलने विजय मिळवला. पाटील यांच्या पॅनेलने माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या पॅनेलला पराभूत केलं.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत 21 पैकी 17 ठिकाणी सतेज पाटील यांच्या आघाडीचे उमेदवार विजयी झाले. तर सत्ताधारी महाडिक गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलंय.

विशेष म्हणजे, या निवडणुकीत विजय मिळवताच सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांना थेट 2 रुपयांची घसघशीत भाववाढ जाहीर केली आहे. हा दूधसंघ आता दूध उत्पादकांच्या मालकीचा झाला, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

2. टीव्हीवर येऊन बोलणारे नेते आता गप्प का? - देवेंद्र फडणवीस

पश्चिम बंगालमध्ये लोक लोकशाहीला काळीमा फासणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात आहे.

कार्यकर्त्यांची घरे जाळली जात आहेत. महिलांसोबत दुर्व्यवहार केले जात आहेत. टीव्हीवर येऊन बोलणारे नेते यावर आता गप्प का, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी तृणमूल काँग्रेस पक्षावर तसंच त्यांचं समर्थन करणाऱ्या नेत्यांवर जोरदार टीका केली. स्वतःला पुरोगामी म्हणून सकाळपासून माध्यमांसमोर येणारे नेते यावर एकही शब्द बोलत नाही. साधा निषेध करायला तयार नाही, यामुळे या हिंसाचाराला समर्थन आहे का, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

3. ऑक्सिजन कंटेनर आणि टँकरमध्ये जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईस अनिवार्य

देशातील कोरोना संकटामुळे गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. देशात ऑक्सिजनचा तुटवडाही निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची कमतरता आणि पुरवठ्यात होणारा विलंब यांचा विचार करता वाहतूक मंत्रालयाने ऑक्सिजन कंटेनर, टँकर आणि वाहनांमध्ये व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस (VLT) बसवणे अनिवार्य केलं आहे.

जीपीएस ट्रॅकिंग या टँकर्सची योग्य देखरेख आणि सुरक्षितता सुनिश्चित करेल. या व्यतिरिक्त, कोणतेही डायव्हर्जन किंवा उशीर होणार नाही याची काळजी घेता येईल, असं वाहतूक मंत्रालयाने ट्वीट करून म्हटलं. ही बातमी न्यूज 18 हिंदीने दिली आहे.

4. मोदींच्या घराऐवजी कोरोना रुग्णांवर खर्च करा - प्रियंका गांधी

देशातील नागरिक ऑक्सिजन, लस, हॉस्पिटल बेड आणि औषधांच्या कमरतेशी लढत असताना सरकार 13 हजार कोटी रुपये खर्चून पंतप्रधानांचं नव घर बांधत आहे. त्याऐवजी सगळी संसाधनं लोकांचा जीव वाचवण्याच्या कामात लावली असती तर बरं होईल, अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

दिल्ली येथे सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत विविध कामे करण्यात येत आहेत. त्यामद्ध्ये नवी संसद आणि इतर कार्यालयांच्या बांधकांमांचा समावेश आहे. यावरून गांधी यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला. प्रियंका गांधी यांनी ट्वीट करताना विविध वृत्तपत्रांमधील बातम्याही सोबत शेअर केल्या.

सेंट्रल व्हिस्टा हा प्रकल्प डिसेंबर 2022 पर्यंत तयार होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी 13,450 कोटी रुपये खर्च येणार आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एक भाग पंतप्रधानांच्या निवासस्थानही असणार आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली.

5. अभिनेत्री दीपिका पादुकोनला कोरोनाची लागण

वडील आणि बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोन यांच्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोण हिलासुद्धा कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

दीपिका सध्या बंगळुरूत असून तिथंच तिच्यावर उपचार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

दिपिकाच्या आधी एका आठवड्यापूर्वी तिचे वडील प्रकाश यांना कोरोनाची लागण झाली होती. तसंच दिपिकाची आई आणि बहीण यांनाही कोरोनाने ग्रासलं. त्यांची प्रकृती आता स्थिर असून उपचार सुरू आहेत.

सध्या प्रकाश पादुकोन यांच्यावर बंगळुरूत अॅडमिट करण्यात आलेलं आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. ही बातमी आजतकने दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)