ममता बॅनर्जींचा टोला, निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपनं 50चा आकडाही गाठला नसता #5मोठ्या बातम्या

ममता बॅनर्जी, पश्चिम बंगाल

फोटो स्रोत, SANJAY DAS

फोटो कॅप्शन, ममता बॅनर्जी

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1.निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपनं 50चा आकडाही गाठला नसता-ममता बॅनर्जी

"निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपला 50 पेक्षा अधिक जागाही मिळाल्या नसत्या, असा गंभीर आरोप ममता दीदींनी केला आहे. निवडणूक आयोगाचं पॅनल भाजपचा प्रवक्ता असल्यासारखं वागत होतं," असंही त्यांनी म्हटलं आहे. 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

ममता म्हणाल्या, "यावेळी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाची वागणूक भयानक होती. तृणमूलची यंदा डबल सेंच्युरी होईल आणि आम्ही 221 चा आकडा गाठू असा आम्हाला विश्वास होता." असा विश्वास तुम्हाला का होता? या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, "मी रस्त्यावर उतरुन लढणारी बाई आहे. पहिल्यापासूनच मी सांगत होते की आम्ही दोनशेपार जाऊ तर भाजप 70 पारही जाणार नाही. त्यामुळे जर निवडणूक आयोगानं भाजपला मदत केली नसती तर त्यांना 50 जागाही मिळाल्या नसत्या."

"नंदीग्राममधील पराभव हे आमचं नुकसान नाही. कारण या ठिकाणी मतमोजणीत छेडछाड करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे नंदीग्राममध्ये पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. इतकं नव्हे तर मतदानाच्या दिवशी मी स्वतः मतदान केंद्राच्या बाहेर तीन तास बसून होते, कारण याठिकाणी कोणालाही मतदान करु दिलं जात नव्हतं," असं ममता म्हणाल्या.

2. बेळगाव लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणूक-भाजपच्या मंगल अंगडी विजयी

अत्यंत चुरशीच्या झालेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या मंगल अंगडी विजयी ठरल्या. त्यांनी काँग्रेसच्या सतीश जरकीहोळी यांचा 5 हजार 240 मतांनी पराभव केला. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळके यांनी जोरदार टक्कर दिली. शुभम यांना 1 लाख 17 हजार 174मतं मिळाली. मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेल्या उत्तर दक्षिण आणि बेळगाव ग्रामीण मतदारसंघात शेळके यांनी मुसंडी मारली. शिवसेनेने शेळके यांना पाठिंबा जाहीर केल्याने मराठी एकीकरण समितीचं बळ वाढलं होतं. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही शेळके यांचा प्रचार केला होता.

3. या सरकारचा योग्यवेळी करेक्ट कार्यक्रम होईल-फडणवीस

सध्या कोरोनाचा काळ आहे, आम्ही राज्य सरकारला सहकार्य करत आहोत. योग्यवेळी या सरकारचा कार्यक्रम केला जाईल असं विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंढरपूर पोटनिवडणूक आणि पाच राज्यातील निवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. 'न्यूज18 लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, देवेंद्र फडणवीस

पंढरपूर विधानसभा मतदार संघात प्रथमच भाजपा विजयी झाली आहे. त्यामुळे पंढरपूर जनतेचा आभार आहे. महाविकास आघाडी गैरकारभाराला जनतेनं दिलेलं हे उत्तर आहे. महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्रित आले पैशांच्या गैरवापर, साम,दाम,दंड, भेद वापर त्यांनी केला तरी ही जनेतेने भाजपाला साथ दिली, त्यामुळे नाराजी सरकारच्या विरोधात हा निकाल आला आहे, असं फडणवीस म्हणाले.

"मी प्रचारसभेत म्हणालो होतो यांचा योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम केला जाईल. पण, आता योग्य वेळ नाही. काय करायचे आहे ते योग्य वेळी ते करेल. त्याच्या घडामोडी या सर्वांना दिसतील. पण आता आपली लढाई कोरोना विरोधात लढायची आहे. आम्ही राज्य सरकारला पूर्ण मदत करत आहोत, योग्य वेळ आली की कार्यक्रम हा होणार आहे," असं फडवणीस यांनी स्पष्ट केलं.

4. ज्येष्ठ काँग्रेस नेते दामोदर शिंगडा यांचे निधन

काँग्रसचे जेष्ठ नेते व माजी खासदार दामोदर शिंगडा यांचे रविवारी निधन झाले ते 68 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून आजारी असलेल्या शिंगडा यांच्यावर वसई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 'महाराष्ट्र टाईम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

वाडा तालुक्यातील पोशेरी येथील रहिवाशी असणारे शिंगडा हे पूर्वीच्या डहाणू लोकसभा मतदारसंघाचे तब्बल पाच वेळा खासदार होते. तर त्यांनी काँग्रेसची जिल्हाध्यक्ष तसेच अन्य पदे भूषविली होती.

त्यांच्या पश्चात पत्नी, सहा मुले, नातवंडे असा परिवार आहे. आदिवासी समाजासह ग्रामीण भागातील खंदे नेतृत्व हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते.

5. मला तुमच्या तिसरी लाट चित्रपटात काम द्या, मी मृतदेह मोजू शकतो- रामगोपाल वर्मा

"सर नरेंद्र मोदीजी, मी एक सभ्य हॉरर चित्रपट निर्माता आहे. पण माझी तुम्हाला विनंती आहे की मला तुमच्या आगामी "तिसरी लाट" या हॉरर चित्रपटात स्पॉट बॉयचं काम द्या. मी मृतदेह मोजण्याच्या विभागातही काम करु शकतो. कारण, तुमच्याइतकेच मलाही मृतदेह आवडतात पण कारणं वेगवेगळी आहे," असं उपरोधिक ट्वीट चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी केलं आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

देशभरात कोरोनाचे लाखो रुग्ण आढळत आहेत. हजारो रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होतो आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन तुटवड्यामुळे, औषधांच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचंही समोर येत आहे. ही परिस्थिती पाहून मन विदीर्ण झालेल्या रामगोपाल यांनी पंतप्रधान मोदींना टॅग करून आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)