केरळच्या पराभवाचा राहुल गांधींच्या राजकारणावर काय परिणाम होईल?

फोटो स्रोत, InC
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
केरळच्या जनतेने तब्बल चाळीच वर्षांची परंपरा मोडीत काढत सलग दुसऱ्यांदा सत्ताधारी एलडीएफला (लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट) बहुमत दिलं आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधून लोकसभेवर निवडून गेल्याचा फायदा काँग्रेसला झालेला नाही.
तामिळनाडूप्रमाणे केरळमध्येही जनता एकाच पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आणत नाही. पण मुख्यमंत्री पिनराई विजयन मात्र याला अपवाद ठरलेत.
दोन दशकांपासून केरळमध्ये जो कल दिसत होता त्यानुसार या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता होती. पण राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्ता आणण्यात डाव्यांना यश आलंय.
आसाममध्येही भाजपला सत्ता कायम राखण्यात यश आलं आहे.
काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या राजकारणावर याचे दूरगामी परिणाम दिसू शकतात, असं जाणकार सांगतात.
राष्ट्रीय पातळीवर विचार केल्यास एकाबाजूला नरेंद्र मोदी-अमित शहा यांचे कडवे आव्हान आणि दुसऱ्या बाजूला यूपीएच्या नेतृत्त्व पदावरून आजही असलेली अनिश्चितता यामुळे या पाच राज्यांचे निकाल राहुल गांधी आणि काँग्रेससाठीही निर्णायक ठरू शकतात. कसे ते पाहूयात...
राहुल गांधी अपयशी ठरले का?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी केरळमधून खासदार आहेत. त्यांनी केरळमध्ये प्रचाराचा धुरळा उडवला होता.
पिनराई विजयन यांची वाढती लोकप्रियता तसंच कोरोना आरोग्य संकटात सरकारची भूमिका यामुळे एलडीएफची बाजू भक्कम होत गेली. त्या तुलनेत काँग्रेसला सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यात यश आलं नाही, असंच म्हणावं लागेल.

फोटो स्रोत, Twitter@vijayanpinarayi
डिसेंबर महिन्यात केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही एलडीएफला यश आलं होतं.
केरळमध्ये पंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका या तिन्ही निवडणुकांमध्ये एलडीएफनं मुसंडी मारली. डिसेंबरच्या निवडणुकीत एलडीएफने 40.2 टक्के मते जिंकली तर यूडीएफला 37.9 टक्के मते मिळाली, तर भाजपप्रणित एनडीएला 15 टक्के मते मिळाली.
केरळमध्ये सीपीएम नेतृत्व करत असलेल्या एलडीएफ आणि काँग्रेस नेतृत्व करत असलेल्या यूडीएफकडे सत्ता आलटून-पालटून दिली जाते.
केरळ निवडणुकीचे वार्तांकन केलेले बीबीसीचे प्रतिनिधी जुबैर अहमद सांगतात, "पिनराई विजयन यांची लोकप्रियता वाढली. त्यांची प्रतिमा नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणे आहे. राज्यात ते एक सक्षम आणि शक्तीशाली नेते मानले जातात."
ते पुढे सांगतात, "विजयन यांचे व्यक्तीमत्व एकाधिकारशाही प्रमाणे असल्याचंही बोललं जातं. त्यांचा स्वभाव, निर्णय प्रक्रिया आणि कडक कारवाई यासाठीही ते ओळखले जातात."

फोटो स्रोत, Inc
राहुल गांधी यांनी निवडणुकीत मेहनत तर घेतली होती, पण एलडीएफच्या तुलनेत ते कमी पडले असंच चित्र आहे असंही ते सांगतात.
राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके सांगतात, "काही आठवड्यांपूर्वी काँग्रेसच्या 23 अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. त्यामुळे राहुल गांधी हे या गटापासून दुरावले हे स्पष्ट आहे. यामुळे ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांच्यातील दरी आणखी वाढण्याचीही शक्यता आहे. याचा परिणाम निश्चितच निवडणुकांच्या रणनीतीवरही झाला असेल."
या निवडणुकांमधील पराभव हे राहुल गांधी यांचे अपयश मानले जाईल असंही ते सांगतात.
आणखी एका राज्यात काँग्रेस कमकुवत होणार?
केरळमध्ये एलडीएफला स्पष्ट बहुमत मिळाल्याने आता दुसऱ्या टर्मसाठीही पिनराई विजयन यांची सत्ता कायम राहणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे.

फोटो स्रोत, InC
यामुळे काँग्रेस सलग दहा वर्ष केरळमध्ये सत्तेपासून दूर राहिल. ही परिस्थिती गेल्या तब्बल चाळीत वर्षांत पहिल्यांदा उद्भवली आहे.
राहुल गांधी ज्या केरळचा उल्लेख आपलं घर म्हणून करतात त्या घरातच काँग्रेस एकसंघ ठेवण्याचे आव्हान आता त्यांच्यासमोर असणार आहे.
झुबैर अहमद सांगतात, "केरळमध्ये काँग्रेस पक्षाचे भविष्य अंधारात आहे असंही म्हणता येईल. दहा वर्ष सत्तेपासून दूर राहिल्याने असाही अंदाज वर्तवला जात आहे की काही नेते दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात. त्यामुळे हा मोठा धोका काँग्रेसला आहे."
तर केरळ काँग्रेसची अंतर्गत गटबाजी हानिकारक असल्याचं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रशीद किडवई यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.
"केरळ काँग्रेसमध्येही गटबाजी आहे. एका गटाच्या बाजूने निर्णय घेतला तर लगेच दुसऱ्या गटात बंडखोरी उफाळून येते, त्यामुळे हे आव्हानात्मक आहे," असं किडवई सांगतात.

फोटो स्रोत, InC
"पण काँग्रेसचा मुख्य विरोधक हा भाजप आहे. त्यामुळे 'दुश्मन का दुश्मन दोस्त' या म्हणीप्रमाणे काँग्रेससाठी भाजपचा पराभव झाला हे सुद्धा सुखावणारे आहे," असंही रशीद किडवई सांगतात.
ते पुढे सांगतात, "राहुल गांधी यांनी पूर्ण प्रयत्न केले पण त्यांना अपयश आलं हे मान्य करावं लागेल. केरळबाबत बोललो तर ते काही मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नव्हते. पण तिथे त्यांना जिंकता आले असते हे वास्तव आहे."
पंजाब, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. तामिळनाडू आणि महाराष्ट्रात आघाडीचं सरकार आहे. पण उर्वरित सर्व राज्यांमध्ये काँग्रेसची पिछेहाट आहे.
मुस्लीम आणि ख्रिश्चन समुदायाची लोकसंख्या केरळच्या एकूण लोकसंख्येच्या 48 टक्के आहे. यात मुस्लिमांची संख्या जास्त आहे. या अल्पसंख्यांक समुदायाने भाजपला अजूनही सत्तेपासून दूर ठेवलं आहे.
काँग्रेस अध्यक्षपदापासून राहुल गांधी दुरावणार?
आसाम, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ आणि पुद्दुचेरी या निवडणुका राष्ट्रीय राजकारणातही अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. तशाच त्या काँग्रेससाठीही निर्णायक ठरू शकतात, असं जाणकार सांगतात.

फोटो स्रोत, ANI
काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आता लपून राहिलेली नाही. राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्षपदी निवडून देण्यावरून पक्षातच मतमतांतरे आहेत. अशा परिस्थितीत या पाच निवडणुकांमधील राहुल गांधी यांची कामगिरी काँग्रेसला जाहीर निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची ठरली असती.
राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार सुनील चावके सांगतात, "केरळमध्ये काँग्रेसची सत्ता आली असती तर त्याचे श्रेय राहुल गांधींना मिळालं असतं. आगामी काळात होणाऱ्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते बिनविरोध निवडून येऊ शकले असते. पण आता तसं होण्याची शक्यता कमी आहे."
केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसने दमदार लढत देणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही त्यामुळे याचाही राहुल गाधींना फटका बसणार असल्याचं दिसतं असंही ते सांगतात.
"या निवडणुकांमध्ये पराभव होणं हे पूर्णत: राहुल गांधींचं अपयश आहे. आसाममध्ये काँग्रेसने निराशा केली आणि पुद्दुचेरीतही कमबॅक करणं त्यांना जमलं नाही. यामुळे आता काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे," असाही अंदाज सुनील चावके यांनी वर्तवतात.

फोटो स्रोत, PRAKASH SINGH/AFP via Getty Images
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पराभव करता येऊ शकतो हे या निकालांमधून स्पष्ट झालं आहे असं रशीद किडवई सांगतात.
ते म्हणाले, "गांधी कुटुंबाला पंतप्रधानपदाची लालसा नाही कारण 1989 पासून नेहरू-गांधी कुटुंबातील कोणताही सदस्य पंतप्रधान किंवा मंत्री बनला नाही. ते राजकीय नेतृत्वात ते समाधानी आहेत हे स्पष्ट आहे.
"तसंच 2022-2024 मध्ये ज्या आघाड्या बनतील त्यात सोनिया गांधी किंवा राहुल गांधी नेतृत्व करू शकतात याची कल्पना काँग्रेसजनांना आहे. राहुल गांधी यांच्या नावावरून वाद आहे पण कोरोना काळात परिस्थिती बदलली आहे."
"नरेंद्र मोदी पूर्वीप्रमाणे लोकप्रिय नेते राहिले नाहीत असं काँग्रेसजनांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे जेव्हा मोदी लाट संपुष्टात येईल तेव्हा त्याचा थेट फायदा काँग्रेसला होणार आहे. काँग्रेसच्या नेत्यांनाही याची कल्पना आहे," असंही रशीद किडवई सांगतात.

फोटो स्रोत, Hindustan Times
यापूर्वी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये पाहिले तर कर्नाटक, राजस्थान आणि मध्यप्रदेशात काठावर सत्ता आणण्यात काँग्रेसला यश मिळाले. पण कर्नाटक आणि मध्यप्रदेशात काही काळातच सत्तांतर झाले आणि भाजप सत्तेत आली.
सुनील चावके सांगतात, "राहुल गांधी यांच्यातील एक कमतरता म्हणजे ते इतर राजकीय नेत्यांप्रमाणे आपल्या चुकांमधून बोध घेताना दिसत नाहीत. राजकीय नेते अनुभव घेतात आणि चुका सुधारून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. पण राहुल गांधींच्या बाबतीत असे होताना दिसत नाही."
ममता बॅनर्जी विरोधकांचे नेतृत्व करणार?
बंगाल निवडणूक निकालांचाही मोठा परिणाम राहुल आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसवर होईल, असं मत जाणकार व्यक्त करतात.

फोटो स्रोत, Getty Images
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी हॅटट्रिक साधत पुन्हा एकदा भरघोस मतांनी विजय मिळवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या सर्व ताकदवर नेत्यांना बंगालमध्ये जोरदार प्रचार केला. ही निवडणूक ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यात अटीतटीची मानली जात होती.
"ममता बॅनर्जी यांनी गड राखला आणि ज्या पद्धतीने त्यांनी केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपचा पराभव केला त्यामुळे ममता बॅनर्जी आगामी काळात राष्ट्रीय पातळीवर विरोधकांचे नेतृत्व करू शकतील," असं सुनील चावके सांगतात.

फोटो स्रोत, ANI
ते पुढे सांगतात, "यामुळे ही संधी सुद्धा राहुल गांधी गमावतील. त्यांचे राजकीय महत्त्व यामुळे कमी होईल. ही संधी शरद पवारांकडे येऊ शकली असती पण आता शक्यता कमी वाटते. त्यांचं वय झालं आहे हा सुद्धा एक फॅक्टर आहे."
तर रशीद किडवई यांना वाटते की ममता बॅनर्जी यांनी विरोधकांचे नेतृत्त्व केले तरी काँग्रेसला फार फरक पडणार नाही. ते सांगतात, "सोनिया गांधी यांच्यासाठी ममता बॅनर्जी आणि डॉ. मनमोहन सिंह यांच्यात फार फरक नाही."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








