पंढरपूर पोटनिवडणूक निकालाचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल?

समाधान आवताडे आणि भगीरथ भालके

फोटो स्रोत, facebook

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"तुम्ही फक्त समाधान आवताडेंच्या नावासमोरचं कमळाचं बटण दाबून त्यांना विजयी करा मी करेक्ट कार्यक्रम करतो," माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या या वाक्याने राज्याचं राजकारण ढवळून निघालं होतं.

'नरेंद्र मोदींच्या झंझावतामुळे अनेकांना लॉटरी लागली आहे,' अशी टीका करत तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी तितक्याच प्रखरतेनी भाजपची परतफेड केली होती.

तसं पाहायला गेलं तर फक्त एका मतदारसंघासाठी ही पोटनिवडणूक झाली पण पूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं. याचं कारण काय असू शकतं?

पंढरपूर मंगळवेढा निवडणुकीमध्ये भाजपच्या समाधान आवताडेंचा विजय झाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढली पण त्यांना विजयश्री खेचून आणता आली नाही.

अनेक कारणांसाठी ही निवडणूक महत्त्वपूर्ण ठरली आहे. आगामी काळात या निवडणुकीचे परिणाम राज्याच्या राजकारणात होऊ शकतात असाही एक सूर आहे.

त्या दृष्टीने घेतलेला हा आढावा. त्या आधी ही निवडणूक कशी झाली हे आपण पाहूत.

पंढरपूर मंगळवेढा लढत कशी झाली?

भारत भालकेंचे चिरंजीव भगीरथ भालके हे राष्ट्रवादीकडून उभे होते तर त्यांच्याविरुद्ध भाजपने समाधान आवताडे यांना उभं केलं.

भारत भालकेंच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट भगीरथ यांना मिळेल असा एक कयास बांधला जात होता तर समाधान आवताडे यांचा दांडगा जनसंपर्क त्यांच्या पारड्यात विजय टाकेल, असं म्हटलं जात होतं. या पार्श्वभूमीवर ही लढत अत्यंत अटीतटीची झाली.

विजय सिंह मोहिते पाटील आणि भगीरथ भालके

फोटो स्रोत, Facebook

मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा पहिल्या फेरीत भगीरथ भालके यांनी आघाडी घेतली होती. पहिल्या सहा फेऱ्यांची मतमोजणी होईपर्यंत भालके आवताडे यांच्यापेक्षा पुढे होते. पण भालके यांच्या मतांची आघाडी शंभर-दोनशेच्याच घरात होती.

पण, सहाव्या फेरीनंतर समाधान आवताडे यांनी मतमोजणीत मुसंडी घेतली.

अनेक फेऱ्यांमध्ये समाधान आवताडे पुढे होते पण नेमकं कोण जिंकेल याची काहीच शाश्वती नव्हती. दहाव्या-अकराव्या फेरीदरम्यान आवताडे यांची आघाडी अडीच हजारांपर्यंत गेली होती. पण तेराव्या फेरीअखेरीस ते 1035 मतांनी पुढे गेले. हेच अंतर हळुहळू वाढत गेलं.

पण एक फेरी जरी भालकेंनी एकहाती मारली तर ते जिंकण्याची शक्यता होती. पण 35 व्या फेरीपर्यंत आवताडेंनी आपल्या आघाडीतील सातत्य राखलं आणि ते शेवटी 4449 मतांनी जिंकले.

तीन पक्ष विरुद्ध तीन स्थानिक बडे नेते

महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचा समावेश आहे. महाविकास आघाडी सरकार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. तिन्ही पक्षांचे मतदान एकत्र मिळाल्यास भगीरथ भालके विजयी होतील असा अंदाज होता पण त्यांच्याविरोधात तीन स्थानिक नेते एकत्र आल्याने त्यांचा पराभव झाला, असं ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांना वाटतं.

समाधान आवताडे

फोटो स्रोत, Facebook

राजा माने सांगतात, "प्रशांत परिचारक, विजय सिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये आहेत. पंढरपूर भागात परिचारक कुटुंबाचे वर्चस्व आहे तर मंगळवेढा बेल्टमध्ये आवताडेंचा स्वतःचा प्रभाव आहे.

"विजय सिंह मोहिते पाटील हे देखील या मतदारसंघातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. या तिघांच्या एकत्र येण्यामुळेच भाजपचा विजय झाला. या निवडणुकीमुळे भाजपचा आत्मविश्वास वाढू शकतो."

ही निवडणूक अजित पवारांनी प्रतिष्ठेची केली होती पण महाविकास आघाडीमधील काही नेत्यांवर सुरू असलेल्या चौकशीचा परिणाम या निवडणुकीत पाहायला मिळाल्याचं सोलापूर येथील ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी सांगतात.

जोशी सांगतात, "महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या मागे सीबीआय चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना मतदारांचा सामना करणे अवघड गेले. भगीरथ भालकेंचे वडील भारत भालके हे मोठं प्रस्थ होतं पण त्यांच्या तुलनेत भगीरथ भालकेंचं व्यक्तिमत्त्व प्रभावी नाही. त्यांच्यासमोर समाधान आवताडेंसारखा तगडा उमेदवार उभा करण्यात आला. याचाही फटका महाविकास आघाडीला मिळाला."

राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल?

पंढरपूर मंगळवेढा निवडणूक ऐन कोरोनाची दुसरी लाट आलेली असतानाच सुरू झाली. भाजपकडून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील हे आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते.

राज्यातील बडे नेते मतदारसंघात ठाण मांडून बसल्यामुळे ही निवडणूक राज्यासाठीच महत्त्वाची आहे, असं चित्र निर्माण झालं होतं. या निवडणूक निकालाचा राज्याच्या राजकारणावर काही परिणाम होऊ शकतो का याबाबत बीबीसीने तज्ज्ञांकडून जाणून घेतलं.

भगीरथ भालके आणि समाधान आवताडे

ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी सांगतात की "या निवडणुकीचा राजकीय बेरजेत फारसा परिणाम होणार नाही कारण ही फक्त एकच जागा होती पण यामुळे भाजपचे मनोबल नक्कीच उंचावेल. विधान परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र आल्यामुळे भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण या निवडणुकीत जिंकल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो."

महाविकास आघाडीत जरी तीन पक्ष असले तरी राष्ट्रवादीनेच प्रचार केला होता. राष्ट्रवादीलाच पूर्ण जोर लावावा लागला, असं सूर्यवंशी सांगतात.

ते पुढे सांगतात, "स्थानिक राजकारणात प्रभावी असलेल्या नेत्यांना एकत्र आणण्यात भाजप यशस्वी ठरलं. गेल्या निवडणुकीमध्ये समाधान आवताडे अपक्ष उभे होते तरी त्यांना 60 हजाराच्या आसपास मतं मिळाली होती. त्यांनाच भाजपने तिकीट दिले. त्याचा फायदा निश्चितपणेच भाजपला झाल्याचं पाहायला मिळालं."

भाजप आणि राष्ट्रवादीची निकालानंतरची प्रतिक्रिया

दरम्यान, भगीरथ भालकेंचा पराभव म्हणजे लोकांच्या रागाची लिटमस टेस्ट, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या लढतीचं वर्णन केलं आहे.

"लोकांच्या मनात राग इतका आहे की लोक या निवडणुकीची वाटच पाहत होते. पंढरपूर निवडणूक ही लोकांच्या मनातील रागाची लिटमस टेस्ट ठरली," अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील

तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, "महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारी कारभाराला आरसा दाखवण्याचं काम पंढरपूरच्या जनतेनं केलय. या निवडणुकीत महाविकास आघाडीनं साम-दाम-दंड-भेद यांचा वापर केला, तरीही जनतेनं भाजपला निवडून दिलंय. मी जनतेचे आभार मानतो."

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत आमचा थोडक्यात पराभव झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

"महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी चांगली मदत केली, मात्र दोन तालुक्यात संवाद साधता न आल्याने आणि दोन तालुक्‍यातील सर्वांना सोबत घेऊन जाण्यात आम्हाला अपयश आल्याने आमचा त्या ठिकाणी थोडक्यात पराभव झाला," असं जयंत पाटील म्हणाले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)