कोरोना बळींना स्मशानभूमीत पोहोचवणारी महिला

    • Author, अनंत झणाणे
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

सात दिवस कोरोनाशी झुंज दिल्यानंतर लखनौच्या 38 वर्षीय अपराजिता मेहरा यांच्या पतीचं निधन झालं. अपराजिता यांच्या कुटुंबीयातल्या सगळ्या सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्या, त्यांची सासू आणि 9 वर्षांचा मुलगा यांना घरात असुरक्षित वाटत होतं

या संकटाच्या काळात अपराजिता यांनी लखनौमध्ये मोफत शववाहन सेवा 'एक कोशिश ऐसी भी' सुरू केलेल्या वर्षा वर्मा यांना फोन केला. वर्षा आणि त्यांची टीम लगेच तिथं हजर झाल्या आणि त्यांनी अपराजिता यांच्या पतीचा मृतदेह स्मशामभूमीपर्यंत पोहोचवला.

अपराजिता एकट्याच आपल्या पतीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी तिथं पोहोचल्या. पण वर्षा वर्मा यांनी अपराजिता यांना एकटं वाटू दिलं नाही.

अपराजिता यांनी सांगितलं, "वर्षा माझ्यासोबत होती. मग ते 30 सेकंदांसाठी का असेना पण त्याक्षणी वर्षानं मला एकटं वाटू दिलं नाही. शहरात माझे अनेक मित्र आणि नातेवाईक आहेत. पण त्यावेळी मी एकटीच माझ्या नवऱ्याच्या चितेसमोर उभी होती. आयुष्यात मी कधीच हे क्षण विसरू शकणार नाही."

6 दिवसांपूर्वीच वर्षा वर्मा यांची जवळची मैत्रीण मेहा श्रीवास्तव यांचं निधन झालं होतं. 38 वर्षीय मेहा यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं.

मेहा श्रीवास्तव यांना वर्षा यांनी स्वत: अग्नी दिला आणि तेव्हाच गाठ बांधली की, कोरोनामुळे आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलेल्या लोकांना मदत करायची.

'मृतदेहाला कुणी हात लात नाही'

कोरोना व्हायरसचा भयानक हल्ला आणि संक्रमणाची भीती यामुळे कोरोना रुग्णांपासून त्यांचे कुटुंबीयही दूर राहणं पसंत करत आहेत.

वर्षा सांगतात, "याविषयी तुम्हाला काय सांगू, आम्ही तर त्या कुटुंबीयातल्या मृतदेहांनाही पाहिलं आहे, जिथं पूर्ण कुटुंब बाहेर थांबून आमचा व्हीडिओ बनवत होतं. पण पीपीई कीटमध्ये ठेवलेल्या मृतदेहाला हात लावायची कुणी हिम्मत केली नाही."

वर्षा यांनी गेल्या 2 वर्षांपासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम सुरू केलं होतं. पण कोरोनाच्या संकटामुळे त्यांच्या कामाची व्याप्ती वाढली आहे. असं असलं तरी सध्या वर्षा आणि त्यांच्या दोन सदस्यीय टीमकडे संसाधनांची कमतरता आहे. त्यांच्याकडे फक्त एक भाडेतत्वावर घेतलेली गाडी आहे. या गाडीची आसनं काढून तिथं स्ट्रेचर ठेवण्यासाठी जागा बनवण्यात आली आहे.

मेहा श्रीवास्तव यांच्या मृत्यूनंतर वर्षा आपली पीपीई कीट घालून दररोज सकाळी घराबाहेर पडतात. त्यांनी त्यांचा फोन नंबर सार्वजनिक केला आहे आणि मंगळवारी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांवरून 9 मृतदेह उचलण्यासाठीचे फोन आले होते.

बीबीसीसोबत बोलताना वर्षा लखनौच्या इंदिरा नगरस्थित सरकारी लोहिया हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या होत्या. तिथं त्यांनी त्यांचा फोन डॉ. गुप्ता यांच्याकडे सोपवला.

डॉ. गुप्ता हो लोहिया हॉस्पिटलच्या कोव्हिड कंट्रोल रूमचे इन्चार्ज आहेत. त्यांच्या टीममधील 4 जणांपैकी 3 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

डॉ. गुप्ता सांगतात, "वर्षा यांच्यासारखे लोक मोठी मदत करत आहेत. आमच्या शववाहिकेचा चालक कोरोना पॉझिटिव्ह आहे. आम्ही आता एक नवीन चालक नियुक्त केला आहे. पण जेव्हा मृतदेहांची संख्या वाढायची तेव्हा आम्हाला मुख्यमंत्री कार्यालयातून शववाहिका मागवावी लागत असे. पण आज ते सगळे व्यस्त आहेत. त्यामुळे आम्हाला वाहन मिळू शकत नाहीयेत. पण वर्षा यांच्या प्रयत्नांमुळे आम्ही त्वरित मृतदेहांना बाहेर काढू शकत आहोत. यामुळे रुग्णांचे मृतदेह आणि आम्हालाही काहीच त्रास होत नाहीये."

'मदतीसाठी हात हवेत'

वर्षा यांनी गेल्या बुधवारी अशाचप्रकारे 8 जणांना अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत पोहोचवलं आहे. गेल्या 6 दिवसांत वर्षा यांच्या टीमनं 36 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या मृतदेहांना स्मशानात पोहोचवलं आहे. आमच्या या कामासाठी लोक आर्थिक मदत देत आहेत, पण हे काम असंच पुढे चालू ठेवण्यासाठी आम्हाला लोकांची गरज आहे, असं वर्षा सांगतात.

वर्षा पुढे सांगतात, "मला आर्थिक मदत मिळत आहे. पण कुणी आमच्या टीमसोबत काम करू इच्छित नाहीये. यामुळे आम्हाला मदतीचा हात मिळत नाहीये आणि कोरोनामुळे आमचं काम खूप वाढलं आहे."

वर्षा वर्मा लखनौत त्यांचे पती आणि 14 वर्षांच्या मुलीसोबत राहतात. त्यांचे पती सार्वजनिक बांधकाम खात्यात इंजीनियर आहेत. कुटुंबीयांना वर्षा यांची काळजी वाटत असली तरी त्यांचा पूर्ण पाठिंबा वर्षा यांना मिळत आहे.

वर्षा एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सक्रिय आहेत. त्या मुलींना सेल्फ डिफेन्सची ट्रेनिंग देतात तसंच ज्यूडोही शिकवतात. आपल्या मुलीसाठी त्या रोल मॉडेलपेक्षाही कमी नाहीये.

या कामाची सुरुवात कशी केली, असं विचारल्यावर वर्षा सांगतात, "कामाची सुरुवात करण्यामागे काही खास कारण नव्हतं. पण बेवारस मृतदेह बघितल्यानंतर मला असं वाटलं की कमीतकमी हे काम तरी करायला पाहिजे आणि मग मी 3 वर्षांपूर्वी हे काम सुरू केलं."

गेल्या तीन वर्षांत 250हून अधिक बेवारस मृतदेह आणि कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक मृतदेहांवर केलेल्या अंत्यसंस्कारामुळे त्यांच्यातील भीती संपुष्टात आली आहे.

वर्षा यांनी सांगितलं, "मला कोरोनाच्या संसर्गाची भीती नाही. जोवर आम्ही ही गाडी तयार करू शकत नव्हतो, तोवर रात्ररात्र मला झोप येत नव्हती. आपण काहीच करू शकत नाही, यामुळे मला त्रास होत होता. पण आता लोकांची मदत करत आहे, तर वाटतंय की कंटाळवाण्या आयुष्यात काहीतरी महत्त्वाचं काम करत आहोत. हे काम करताना मला काहीच भीती वाटत नाहीये. हे काम करताना माझ्यातली भीती संपली असंही तुम्ही म्हणू शकता."

कोरोनाची लाट किती वेगानं लोकांना आपल्या आवेगात घेत आहे, याची जाणीव वर्षा यांना आहे. त्यामुळे त्या त्यांच्याकडून पूर्ण काळजी घेतात. "आता कोरोनालाच माझी भीती वाटेल," असं त्या हसतहसत सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)