कोरोना : आईच्या पायाशी मुलाचा मृतदेह... ना इलाज, ना अॅम्ब्युलन्स, ना शववाहिका

वाराणसी घटना

फोटो स्रोत, ADITYA BHARDWAJ

फोटो कॅप्शन, चंद्रकला सिंह
    • Author, प्रदीप कुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

समाजमाध्यमांवर वाराणसीमधील एक छायाचित्र गेले काही दिवस व्हायरल झालं आहे. या छायाचित्रात ई-रिक्षामध्ये एका हताश वयस्कर आई दिसते आणि तिच्या पायाशी तिचा मुलगा निपचित पडलेला आहे.

हे छायाचित्र हृदय हेलावून टाकणारं आहेच, शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातील घटनेशी संबंधित असल्यामुळे समाजमाध्यमांवर हे छायाचित्र वेगाने पसरलं.

याच महिलेचं दुसरंही एक छायाचित्र समाजमाध्यमांवरून शेअर होत राहिलं, त्यामध्ये ती काहीतरी मदत व्हावी म्हणून मरण पावलेल्या मुलाचा स्मार्टफोन उघडण्याची खटपट करताना दिसते आहे.

या महिलेचं नाव आहे चंद्रकला सिंह. त्या वाराणसीजवळच्या जौनपूरमधील अहिरौली (शीतलगंज) इथल्या रहिवासी आहेत. त्यांचा 29 वर्षांचा मुलगा विनीत सिंह याच्यावरील उपचारांसाठी त्या सोमवारी (19 एप्रिल) बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) रुग्णालयात गेल्या होत्या.

विनीत मुंबईला एका औषधांच्या दुकानात नोकरी करत होते. कोरोनाच्या साथीदरम्यान त्यांची नोकरी गेली, त्यामुळे ते गावी परतले.

बीएचयूच्या रुग्णालयात त्यांना भरती होता आलं नाही, त्यामुळे मग चंद्रकला यांनी ई-रिक्षाने आपल्या मुलाला जवळच्या कुठल्यातरी रुग्णालयात न्यायचा प्रयत्न केला, पण त्यातही त्यांना यश मिळालं नाही. काही तासांनी ई-रिक्षामध्येच आईच्या डोळ्यांसमोर विनीत यांनी तडफडत अखेरचा श्वास घेतला.

चंद्रकला यांना आपल्या मुलाच्या अकाली मृत्यूच्या धक्क्यापेक्षाही त्याची काहीच मदत करता न आल्याचं दुःख जास्त वाटतं. या सगळ्या दुर्दैवी घडामोडीबाबत त्या म्हणतात, "आम्ही बीएचयूच्या रुग्णालयात गेलो होतो. तिथे आम्हाला सांगितलं की, डॉक्टर आलेले नाहीयेत, त्यामुळे तुम्ही तिकडे (ट्रॉमा सेंटरमधे) जा, ट्रॉमा सेंटरमध्येच मुलाची तब्येत आणखी बिघडली आणि तिथे शिडीजवळच तो जमिनीवर आडवा झाला. पण तिथल्या लोकांनी त्याला तिथून उचलायचा तगादा लावला. कोरोना है, कोरोना है, असं ते बोलायला लागले."

चंद्रकला सिंह

फोटो स्रोत, ADITYA BHARDWAJ

चंद्रकला सिंह म्हणतात, "माझ्या मुलाला श्वास घेताना त्रास होत होता. आम्ही तिकडे ऑक्सिजन मागितला, अँब्युलन्सही मागितली, पण कोणी आमचं काही ऐकलं नाही. मग मी खटपट करून ई-रिक्षामधे झोपवून त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमधे नेलं. तिथे त्यांनी त्याला भरती करून घ्यायला नकार दिला. मग आणखी एखाद्या हॉस्पिटलच्या शोधात आम्ही जात होतो, इतक्यात माझ्या मुलाने प्राण सोडले, तिथेच तडफडत त्याला मरण आलं."

चंद्रकला सिंह यांच्या आयुष्यात आधीच दुःखाचं प्रचंड ओझं होतं. दहा वर्षांपूर्वी त्यांचा नवरा मरण पावला, गेल्याच वर्षी विनीत यांच्याहन मोठ्या मुलाचा मृत्यू झाला. सलग दोन वर्षं दोन तरुण मुलांच्या मृत्यूचं दुःख झेलणं सोपं नाही. त्यांना अजून दोन मुलगे आहेत, पण "माझा आधारच निघून गेलाय. आता माझी काळजी घेणारं कोणी नाही," असं त्या म्हणतात.

चंद्रकला सिंह

फोटो स्रोत, ugc

मृत्यूचं कारण

विनीत सिंह यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा काही पुरावा नाही. त्यांच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, त्यांना गेल्या काही दिवसांमध्ये ताप किंवा सर्दी असं काही झालेलं नव्हतं.

विनीत सिंह यांचे काका जय सिंह सांगतात, "त्याच्यात कोरोनाचं काहीच लक्षण दिसत नव्हतं. त्याला ताप वगैरेही आलेला नव्हता. त्याला किडनीचं काही दुखणं होतं, त्यावर उपचार सुरू होते. तो मुंबईला काम करायचा, तिकडेच काही उपचार सुरू होते. त्याचसाठी तो गेले काही दिवस बीएचयूला ये-जा करत होता."

"या मुलाला धाप लागत होती. 19 एप्रिलला डॉ. समीर त्रिवेदी यांची ऑनलाइन अपॉइन्टमेन्ट मिळाली होती, पण तिथे त्याच्यावर काही उपचार होऊ शकला नाही. ट्रॉमा सेंटरला काही मदत मिळाली नाही. जवळच्या रुग्णालयांमध्ये जागा नसल्याचं सांगितलं जातं. कोरोनाची केस आहे, असंही सांगितलं. त्याला किडनीचा आजार होता, पण त्यावर उपचार सुरू होता, ऑक्सिजन मिळाला असता, तर त्याचा मृत्यू झाला नसता. रुग्णालयातील बेपर्वाईमुळे तो मरण पावला," असा दावा जय सिंह करतात.

ते म्हणतात, "कोणाला तरी प्राण गमवावे लागावे याहून निष्काळजीपणाची गोष्ट काय असणार आहे. या व्यवस्थेत गरिबांना कोणी वाली उरलेला नाही. इथे निष्काळजीपणामुळे अनेक लोकांचा जीव जाऊ शकतो."

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

चंद्रकला सिंह व त्यांच्या मुलाच्या या असहायतेबद्दल 'दैनिक जागरण'मध्ये बातमी छापून आल्यावर सगळ्यांचं तिकडे लक्ष गेलं. ही बातमी देणारे पत्रकार श्रवण भारद्वाज सांगतात, "चकरमत्ता महमूरगंज मार्गावर कोणाचा तरी मृत्यू झाल्याची माहिती मला सकाळी दहा वाजता मिळाली. तिकडे बराच गोंधळ सुरू होता. मी तत्काळ तिथे पोचलो, तर तिकडे हे विदारक दृश्य पाहायला मिळालं. त्या मातेकडून मी सगळी माहिती घेतली आणि बातमी लिहिली."

विनीत सिंह यांचा मृत्यू ज्या रस्त्यावर झाला, तिथे बीएचयूसह इतर डझनभर रुग्णालयं आहेत, हे लक्षात घेतलं तर कोरोनामुळे रुग्णालयांची अवस्था काय झालेय याचा अंदाज येऊ शकतो, असं श्रवण भारद्वाज सांगतात.

व्हायरल झालेली छायाचित्रं कोणी काढली?

चंद्रकला सिंह व त्यांच्या मुलाची व्हायरल झालेली छायाचित्र कोणी काढली? याबद्दल श्रवण भारद्वाज सांगतात, "मी तिथे माझ्या मित्रासोबत गेलो होतो. त्याला मी छायाचित्रं काढायला सांगितलं. तो सरकारी कर्मचारी असल्यामुळे त्याचं नाव आम्ही जाहीर केलं नाही."

ही छायाचित्रं काढणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याचं सांगितलं की, 'मी श्रवणजींच्या सांगण्यावरून फोटो काढले आणि लगेच ते फोटो श्रवणजींना दिले.'

विनीत सिंह यांच्या आईच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलाचा मृत्यू सकाळी नऊच्या आसपास झाला, आणि श्रवण भारद्वाज सांगतात त्यानुसार, ते साडेदहा वाजता घटनास्थळी पोचले तेव्हा तिथे लोकांची प्रचंड गर्दी झालेली होती आणि तिथे इतर कोणी लोकांनी मोबाइलवर छायाचित्रं काढली असण्याचीही शक्यता आहे. पण माध्यमांमध्ये पसरत असलेली छायाचित्रं त्यांनी काढलेलीच आहेत.

चंद्रकला सिंह त्यांच्या मुलाच्या मृतदेहाजवळ थांबून मदतीची वाट पाहत होत्या, तेव्हा तिथे माजी स्थानिक नगरसेवक विकास चंद्रसुद्धा आले होते. त्यांनी ११२ क्रमांक डायल करन पोलिसांना बोलावलं.

वाराणसी

फोटो स्रोत, Getty Images

स्थानिक पोलीस चौकीचे प्रभारी अनुज कुमार तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, पोलीस तिथे गेले तोवर मुलाचा मृत्यू झाला होता आणि त्याच्या आईची अवस्था पाहून दोन शिपायांना घटनास्थळीच थांबवून ठेवण्यात आलं.

मृत्यनंतरही अँब्युलन्स मिळायला अडचणी

विनीत सिंह यांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्या आईला अँब्युलन्स मिळवण्यात बरीच अडचण आली. सकाळी त्यांना वाराणसीच्या महुआडीह स्टेशनवर सोडायला आलेले त्यांचे भावजी जय सिंह सांगतात, "मला माझ्या मुलीला स्टेशनवरून आणायचं होतं, म्हणून हे दोघंही आमच्यासोबत आले होते. आम्ही त्यांना महुआडीहजवळ एका ई-रिक्षामध्ये बसवलं. डॉक्टरांना दाखवून घ्या, तोवर मी मुलीला घेऊन येतो, असं मी त्यांना सांगितलं. मग साडेनऊला त्यांचा फोन आल्यावर मी तिथे पोचलो."

जय सिंह सांगतात, "मी तिथे पोचलो तर गर्दी गोळा झालेली होती आणि मुलाचं प्रेत उन्हात पडलेलं होतं. त्याला सावलीत घेऊन जाऊया, असं मी लोकांना म्हणालो. त्याची आई रडून बेजार झाली होती. मग अँब्युलन्स मिळवण्यासाठी खटपट सुरू झाली. अनेक लोकांना फोन करायला लागले. एकाने तर 22 हजार रुपये मागितले. शेवटी, 60 किलोमीटरवर असलेल्या आमच्या घरी जाण्यासाठी पाच हजार रुपये देऊन अँब्युलन्स मिळाली. मग विनीतचं प्रेत घेऊन आम्ही घरी आलो."

बीएचयू प्रशासनाचं म्हणणं काय आहे

कोरोना संकटादरम्यान वाराणसीमधील बीएचयू रुग्णालयावरचा ताण खूपच वाढला आहे. पूर्वांचलमधील सुमारे चाळीस जिल्ह्यांमधील रुग्ण बीएचयूकडे आशेने व विश्वासाने पाहत असतात, पण सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीत रुग्णालयाची व्यवस्था पुरेशी पडेनाशी झाली आहे.

बीएचयूमधील सर सुंदरलाल चिकित्सालयातील वैद्यकीय अधीक्षक शरद माथूर सांगतात, "बराच ताण आलेला आहे. आपात्कालीन चिकित्सा विभागात रुग्णांची तपासणी होते आहे. खूप गंभीर अवस्थेतील रुग्णही येत आहेत, पण आम्ही सर्व रुग्णांना वाचवू शकत नाही."

विनीत सिंह यांची चिकित्सालयात तपासणी का झाली नाही, या प्रश्नावर उत्तर देताना शरद माथूर म्हणाले, "कोरोनामुळे प्रत्यक्ष कन्सल्टन्सी बंद आहे. पण आम्ही लोकांना ऑनलाइन सल्ला देतो आहोत. कदाचित त्यांना याबद्दल माहिती नसेल. कदाचित ते आधीपासून आजारी असतील आणि गंभीर अवस्थेत गेल्यावर ते इथे आले असतील. पण प्रत्यक्ष कन्लस्टन्सी बंद असल्यामुळे त्यांना डॉक्टर भेटले नाहीत. पण आपात्कालीन चिकित्सा विभागात रुग्णांची तपासणी होते आहे."

इतर समस्यांसंदर्भात ते म्हणाले, "मनुष्यबळ खूप कमी आहे, आणि या व्यवस्थेत जितके लोक आहेत त्यांना ड्युटीवर लावण्यात आलेलं आहे. दररोज आम्ही शेकडो लोकांचा जीव वाचवतो आहोत. पण लोकही एकदम गंभीर पातळी आल्यानंतरच रुग्णालयात येतात, शिवाय कोरोनाचं अधिकचं संकट आहेच."

स्थलांतर

फोटो स्रोत, Getty Images

समाजमाध्यमांवरून उपस्थित झालेले प्रश्न

चंद्रकला सिंह व त्यांच्या मुलाच्या प्रेताची छायाचित्रं पाहून लोक पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारत आहेत. हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ असल्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची तातडीने दखल घेतली आहे आणि बीएचयू रुग्णालयाच्या प्रशासनाकडून अधिक माहिती मागवली आहे. विनीत सिंह यांना इमर्जन्सी विभागात दाखल का केलं नाही, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी प्रश्न विचारले आहेत. या संदर्भात बीएचयूच्या प्रशासकीय समितीची बुधवारी बैठकही झाली.

परंतु, या घटनेने सामाजिक क्रौर्याकडेही लक्ष वेधलं आहे. एक असहाय माता तिच्या तरुण मुलाचा मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी मदत मागत होती, तेव्हा गर्दीतल्या कोणीतरी त्यांची पिशवी चोरली, त्यात विनीत सिंह यांच्या उपचारांसंबंधीची कागदपत्रं व मोबाइल फोन होता.

(जौनपूरहून आदित्य भारद्वाज आणि वाराणसीहून निलांबुज यांनी वार्तांकन केलं).

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)