कोरोना : कुंभ मेळ्यात सहभागी झालेल्या आखाड्यांमध्ये कोरोनाची काय स्थिती?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, विनीत खरे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
एकीकडे निरंजन आखाडा कुंभमेळ्यातून बाहेर पडणार अशा बातम्या येत आहेत आणि दुसरीकडे आखाडा परिषदेचे महामंत्री हरी गिरी यांनी या बातम्यांचा इन्कार केला आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, निरंजन आखाड्याचे सचिव रविंदर पुरी यांनी सांगितलं की, 14 एप्रिलला संक्रांतीच्या मुहुर्तावर होणारं मुख्य स्नान आटोपलं आहे. आमच्या आखाड्यातील अनेकांना कोव्हिडची लक्षणं आहेत. यामुळे आमच्यासाठी कुंभमेळा संपला आहे.
महानिर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी कपिल देव यांचं निधन झालं आहे. त्यांचं वय 65-70 दरम्यान असल्याचं सांगितलं जात आहे. ते चित्रकूटला राहायचे. कुंभमेळ्यात, कोव्हिडने मृत्य होणारे कपिल देव हे पहिलेच साधू आहेत.
दुसरीकडे हरी गिरी यांनी बीबीसीला सांगितलं की, निरंजनी आखाडा कुंभमेळ्याबाहेर जात आहे ही पूर्णपणे चुकीची बातमी आहे.
ते म्हणाले, "इथे कितीतरी साधू आहेत. निरंजनी आखाडा बाहेर जातोय असं कसं होऊ शकेल? निरंजनी आखाड्याचे काही महात्मा आम्ही चाललो आहोत असं म्हणू शकतात. ती वेगळी गोष्ट आहे. निरंजनी आखाडा कुंभमेळा सोडून थोडीच बाहेर जाणार आहे? महात्मा जात-येत असतात."
हरी गिरी यांनी म्हटलं की, कोणत्या आखाड्यात काय स्थिती आहे याचा बैठकीत विचार केला जाईल.

फोटो स्रोत, Reuters
बातम्यांनुसार आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी कोव्हिड झाल्यामुळे रुग्णालयात आहेत. त्यांना फोन केला असता ते बोलण्यासाठी तयार नसल्याचं सांगण्यात आलं.
अपर कुंभमेळा अधिकारी रामजी शरण शर्मा यांनी निरंजनी आखाडा कुंभमेळ्याबाहेर जात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आणि त्याचं स्वागत केलं.
शर्मा म्हणाले की, बाकी आखाडेही हळूहळू कुंभमेळ्यातून बाहेर जातील अशी मी आशा करतो. कोरोनाप्रती हे महंत, साधू चिंतित आहेत असा संदेश यातून जाईल.
रामजी शरण शर्मा यांच्या मते निरंजनी आखाड्याच्या निर्णयाने कुंभमेळ्याच्या व्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही. गर्दी कमी होईल. यामुळे कोरोनाचा प्रसार कमी होईल.
नेमकी परिस्थिती काय आहे हे स्पष्ट झालेलं नाही. यासाठी निरंजनी आखाड्याचे सचिव राजिंदर पुरी यांच्याशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क प्रस्थापित होऊ शकला नाही.
कुंभमेळ्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हे काळजीचं कारण ठरत आहे.
हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.के. झा यांच्या मते, 10 ते 14 एप्रिल या कालावधीत कुंभमेळा क्षेत्रात 1664 कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यापैकी 35 साधू आहेत.
डॉ. झा यांच्या मते कुंभमेळ्यात पॉझिटिव्हिटी रेट 0.29 टक्के आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आम्ही ज्या साधूंशी बोललो त्यांचा दावा आहे की, त्यांच्या आखाड्यात कोरोनाचा संसर्ग नाही.
किन्नर आखाडयाचे लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या मते, सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांच्या आखाड्याने लोकांशी भेटणं बंद केलं आहे. त्यांचा आखाडा 27 एप्रिलला स्नान करूनच बाहेर जाईल असं त्यांनी सांगितलं.
त्यांनी म्हटलं, आम्ही जिथे आहोत तिथे बाहेरच्या व्यक्तींना येऊ दिलं जात नाहीये. आमच्या आखाड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. आम्ही अतिशय काळजी घेत आहोत.
मात्र दिगंबर आखाड्याशी संलग्न हठयोगी बाबा यांनी आखाड्यात वेगाने कोरोना पसरत चालल्याचं सांगितलं. साधूंनी सतर्क राहावे असा सल्लाही त्यांनी दिला. साधूंचा बेफिकीरपणा हे यामागचं कारण असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








