You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना महाराष्ट्र : MPSC नंतर आता वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षाही पुढे ढकलल्या
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परीक्षा पुढे ढकलण्याचं सत्र सुरूच आहे.
दहावी, बारावीचे SSC, HSC आणि MPSC परीक्षांनंतर आता राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.
अमित देशमुख यांनी ट्वीट करत म्हटलं, "महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 19 एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून येत्या जूनमध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल."
या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली, असं देशमुख यांनी सांगितलं.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने राज्य सरकारने 11 एप्रिल रोजी नियोजित असलेली MPSC परीक्षा विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर पुढे ढकलली होती. त्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात याव्यात, या मागणीने जोर धरला होता.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 19 एप्रिल ते 30 जूनदरम्यान या परीक्षा होणार होत्या.
MBBS, MD, MS, BDS आदी वैद्यकीय अभ्यासक्रमांचा यामध्ये समावेश आहे.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढती रुग्णसंख्या पाहता या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विविध विद्यार्थी संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून केली जात होती.
खासदार सुप्रिया सुळे, राजीव सातव यांच्यासह आमदार सतीश चव्हाण यांनीही याबाबत मागणी केली होती.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना निवेदन देण्यात आलं होतं.
नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन जाहीर केलं आहे. 14 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून पुढील 15 दिवस हे लॉकडाऊन असणार आहे. या दरम्यानच 19 एप्रिल रोजी ही परीक्षा सुरू होणार होती.
या परीक्षा ऑफलाईन स्वरुपातच घेण्यात येणार असल्याचं विद्यापीठाने जाहीर केलं आहे. कोव्हिडशी संबंधित आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन या परीक्षा होतील, असंही विद्यापीठाने म्हटलं होतं.
मात्र, परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी आज करोनाबाधित आहेत. तर परीक्षेला बसता यावं म्हणून लक्षणे असून सुध्दा अनेक विद्यार्थी करोनाची चाचणी करत नसल्याचे निदर्शनास आलं आहे.
शिवाय वैद्यकीय शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी घरी आहेत. राज्यात लॉकडाऊन लागू असताना त्यांना प्रवासाची साधनं उपलब्ध होतील किंवा नाही, याबाबत शंका आहे.
तसंच वसतिगृहात एका रूममध्ये तीन ते चार विद्यार्थी राहतात. मेस, वॉशरूमचा वापर या विद्यार्थ्यांना करावा लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये करोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता शक्यता जास्त आहे.
या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलल्या असून जून महिन्यात या परीक्षा होतील, अशी घोषणा अमित देशमुख यांनी केली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून विद्यार्थी परीक्षा पुढे ढकलल्याबाबत राज्य सरकारचे आभार मानताना दिसत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)