You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जगणाऱ्या वीरा साथीदारांचं आयुष्य कसं होतं?
- Author, प्रवीण मुधोळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी, नागपूरहून
'कोर्ट' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात नारायण कांबळेंची भूमिका साकारणारे वीरा साथीदार यांचं 13 एप्रिलला कोव्हिडमुळे नागपुरात निधन झालं.
वीरा साथीदार यांचं आयुष्य कसं होतं याबाबत त्यांचे मित्र धम्मचारी पद्मबोधी यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "वीरा नक्षल समर्थक नव्हता, पण तो विद्रोही गीतकार होता. तो शांतिवादी होता. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानेच तो समाज प्रबोधन करायचा. पोलिसांचा ससेमिरा, न्यायव्यवस्थेच्या विलंबाने त्रस्त झालेला एक सामान्य भारतीय नागरिक, जो कोर्ट सिनेमात आपण 'नारायण कांबळे' या भूमिकेत पाहिला...वीरा तेच आयुष्य जगायचा.
"तो भारतातील मानसिक गुलामगिरीच्या विरोधात होता. त्याला त्याच्या समाजाला या मानसिक गुलामगिरीच्या साखळदंडातून बाहेर काढायचे होते. पण हा वसा पूर्ण करताना त्याला अनेकदा पोलिसांनी अटक केली पण एकदाही त्यांच्या विरोधात पुरावा पोलिस सिद्ध करू शकले नाही. घेतला वसा त्याने कधी टाकला नाही त्यामुळेच त्याला बराच काळ विजनवासात राहावे लागले. पण हे सर्व सहन करुनही त्याने कधी परिस्थितीसोबत हातमिळवणी केली नाही."
वीरा साथीदार यांचे बालपणीचे मित्र आणि सहकारी धम्मचारी पद्मबोधी वीरा साथीदार यांच्याविषयी बोलत होते.
आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते वीरा साथीदार यांचं कोव्हिडने निधन झालं. त्यांच्यावर नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये गेले आठवडाभर उपचार सुरू होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार वीरा साथीदार यांनी आयुष्यभर समाज प्रबोधन केलं.
आयुष्यभराचा संघर्ष
वर्धा जिल्ह्यातील जोगी नगर इथे बालपण गेलेल्या वीरा साथीदार यांचं खरं नाव विजय वैरागडे. आडनावावरून जात कळते म्हणून त्यांनी कधीही आडनाव लावलं नाही. सामान्य लोकांचा आंदोलनाताला साथीदार म्हणून वीरा साथीदार असं नाव त्यांनी लावलं.
त्यांनी 'विद्रोही' नावाच्या मासिकाचे संपादन केले. पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी शोषित-पीडितांना न्याय देण्यासाठी मोठा संघर्ष केला होती. 'रिपब्लिकन पँथर' संघटनेच्या माध्यमातून ते वंचितांसाठी काम करत होते. त्यांची व्याख्यानं विशेष देशभर गाजली होती.
वीरा साथीदार यांचे सहकारी संघर्षवाहिनी - भटके विमुक्त परिषदेचे संयोजक दीनानाथ वाघमारे सांगतात, "विजय वैरागडे, म्हणजेच आमचा वीरा साथीदार याचा संघर्ष शेवटी संपला. परवा त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आलं आणि आज त्यांच्या जाण्याची बातमी आली. ते संघर्षमय आयुष्य जगले.
"दलित शोषितांचे ते प्रतिनिधी होते. जमिनीवर ते सदैव राहिल, राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे वागणे साधंच होते. ते भाड्याच्या घरात राहायचे, कारण त्यांनी कमावलेला सर्व पैसा हा सामाजिक कार्यासाठी दान दिला. त्यांची पत्नी पुष्पा अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. दोघेही पती-पत्नी आपल्या कष्टातून दलित -शोषितांसाठी काम करत होते," वाघमारे सांगतात.
'साधेपणा आणि सच्चेपणा कधीही सोडला नाही'
न्याय व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणाऱ्या 'कोर्ट' या चित्रपटाचे देशविदेशातील अनेक महोत्सवांत कौतुक झालं होतं. चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित 'कोर्ट' या मराठी चित्रपटाला सुवर्णकमळाचा सर्वोच्च बहुमान मिळाला होता.
या सिनेमात नारायण कांबळेंची मध्यवर्ती भूमिका वीरा साथीदार यांनी साकारली होती. 62 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली होती.
कोर्ट सिनेमाने त्यांचं नाव देश-विदेशात झालं तरी केवळ तीच त्यांची ओळख नव्हती. आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता, पत्रकार, रंगभूमीवरचा कलाकार अशा विविध गोष्टींसाठी ते ओळखले जात. इतके असूनही ते अतिशय नम्र होते असं त्यांचे सहकारी आणि मित्र पद्मबोधी सांगतात.
"माझा आणि त्यांचा युवावस्थेत असतांना पासून संबध आला, आम्ही दोघांनीही दलित रंगभूमीपासूनच सुरुवात केली. खरं पाहिलं तर ते एक निस्वार्थी व्यक्तिमत्त्व होते. ते शेवटपर्यंत साधेच राहिले कधीही त्याच्यात अहंकार आला नाही. तोच साधेपणा आणि खरेपणा होता. ज्या वेळेस त्याच्या 'कोर्ट' सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा आम्ही 'नागलोक' मध्ये त्यांचा सत्कार केला होता. बाबासाहेबांची चळवळ कशी पुढे जाईल यासाठी सदैव त्याच्या डोक्यात विचार सुरू असायचे. यात त्याने आपला परिवार आणि स्वत:कडे दुर्लक्ष केले," धम्मचारी पद्मबोधी सांगतात.
"कोर्ट या चित्रपटाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हणे यांना एकदा कोणीतरी वीराचा फोटो दाखविला होता. तेव्हा ताम्हणे यांनी कोर्ट चित्रपटात हेच अभिनय करतील हे निश्चित केलं. नंतर वीरा आणि ताम्हणे भेटले आणि अप्रतिम कलाकृती तयार झाली. पण त्याने कोर्ट चित्रपटात अभिनय केला नव्हता तो जे काही जगत होता, सोसत होता ते तो चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी व्यक्त करत होता. पण वीराच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळूनही, कोर्ट चित्रपटाने भारताचे प्रतिनिधित्व करूनही त्याच्या साधेपणात आणि खरेपणात तसुभरही कमतरता आली नाही हे विशेष."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)