कोरोना व्हायरस : कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या महामंडलेश्वर कपिल दास यांचं कोव्हिडमुळे निधन

फोटो स्रोत, Ani
मध्य प्रदेशातल्या निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव दास यांचं कुंभमेळ्यात सहभागी झाल्यानंतर कोव्हिड 19मुळे निधन झालंय. ते 65 वर्षांचे होते.
एकीकडे देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असतानाच दुसरीकडे उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात लाखो भाविकांनी सहभाग घेतला आहे.
कपिल दास यांच्या निधनानंतर निरंजनी आखाड्याने कुंभमेळ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं टाईम्स ऑफ इंडियाने म्हटलंय.
कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या 68 जेष्ठ साधूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याचंही या बातमीत म्हटलं आहे.
कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या नागा साधूंच्या आखाड्यांमध्ये 'जुना आखाडा' सर्वात मोठा आहे. त्यानंतर निरंजनी आखाडा हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा आखाडा आहे. शाही स्नानानंतर आपल्यासाठी कुंभमेळा संपुष्टात आल्याचं या आखाड्याने म्हटलंय.
गुरुवारी एकूण 332 लोकांना कोरोना संसर्ग झाल्याचं आढळल्याचं कुंभमेळा प्रशासनाने म्हटलंय. पण या संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची आकडेवारी प्रशासनाकडे नाही. 12 एप्रिलनंतर 79,301 लोकांची चाचणी झाली असून त्यापैकी 745 जणांना संसर्ग झाल्याचं प्रशासनाने म्हटलंय.
आपल्या छावणीतल्या बहुतेक साधू आणि भाविकांमध्ये कोव्हिडसारखी लक्षणं दिसत असल्याने 17 एप्रिलपासून आपण कुंभमेळ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं निरंजनी आखाड्याने म्हटलंय.
कुंभमेळा अधिकृतपणे 30 एप्रिलला संपणार आहे. यादरम्यान 27 एप्रिलला पुढचं शाही स्नान होईल.
मोठ्या प्रमाणावर लोक येत असल्याने इथे कोरोनामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांचं पालन करण्यात अडचणी येत असल्याचं इथं व्यवस्था पाहणाऱ्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
कुंभमेळ्याच्या काळात गंगा नदीत स्नान केल्यास पाप धुवून निघतं आणि मोक्षाची प्राप्ती होते, असं हिंदू भाविकांना वाटतं.
कुंभमेळा दर 12 वर्षांनी एकदा येतो. अलाहाबाद, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन यापैकी एका जागेवर तो होतो.
यंदा हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे, तेही अशा वेळेस जेव्हा देशातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत आहे.

फोटो स्रोत, Reuters
7 एप्रिलपासून देशात दररोज 1 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. 12 एप्रिलला देशात कोरोनाचे 1 लाख 68 हजार 912 रुग्ण आढळले, तर 904 जणांचा मृत्यू झाला. तर 11 एप्रिल 1 लाख 52 हजार 879 इतके कोरोना रुग्ण आढळले, 10 एप्रिलला हा आकडा 1 लाख 45 हजार 384 इतका होता.
गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये एकूण 2 लाख 17 हजार 353 नवीन कोव्हिड रुग्णांची नोंद झाल्याचं 16 एप्रिलच्या सकाळी जाहीर करण्यात आलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
परिस्थिती बिघडण्याची भीती
आरोग्याशी निगडीत तज्ज्ञांनी हा कार्यक्रम रद्द करण्याचं आवाहन केलं होतं. पण, कोरोनाच्या काळातील सगळ्या आदेशांचं पालन केलं जाईल, असं सांगत सरकारनं कुंभमेळ्याच्या आयोजनास परवानगी दिली.
असं असलं तरी नदीच्या घाटावर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना लागू करणं खूप अवघड काम आहे, असं एका पोलीस अधिकाऱ्यानं वृत्तसंस्था ANI ला सांगितलं.

फोटो स्रोत, Reuters
कुंभमेळा आयजी पोलीस संजय गुंजयाल यांनी म्हटलं, "आम्ही लोकांना नियमितपणे कोरोनाच्या निर्बंधांचं पालन करा म्हणून आवाहन करत आहोत. पण इथं इतकी गर्दी आहे की कुणाला दंड करणंही शक्य होत नाहीये."
जर आम्ही लोकांना बळजबरीनं घाटांवर कोरोना निर्बंधांचं पालन करण्यास सांगितलं, तर मात्र इथं चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण होऊ शकते, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
सोमवारचा दिवस हा सोमवती अमावस्याचा दिवस होता. या दिवशीच्या गंगा स्नानाला पवित्र समजलं जातं आणि मोठ्या प्रमाणावर लोक नदीत स्नान करण्यासाठी येतात.
कुंभमेळ्यापूर्वी सरकारनं म्हटलं होतं की, मेळ्यात त्याच लोकांना यायला परवानगी दिली जाईल ज्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असेल आणि मेळ्यात येणाऱ्या प्रत्येकाला सरकारी नियमांचं पालन करावं लागेल.

फोटो स्रोत, Reuters
पण मेळ्यात आलेल्या साधू-संतांसहित अनेक जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
आता सोमवारी झालेल्या गर्दीनंतर अशी चिंता व्यक्त केली जातेय की, कोरोना व्हायरस हा भाविकांमध्ये वेगानं पसरू शकतो. तसंच तो भाविकांसोबत त्यांच्या गावांमध्ये, शहरांमध्येही जाऊ शकतो.
भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. देशात अनेक ठिकाणी रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत, तर काही ठिकाणी रेमडेसिवीरची कमतरता जाणवत आहे.

फोटो स्रोत, Ani
महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयंकर आहे. देशात दररोज आढळणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 30 ते 40 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत.
कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रात नाईट कर्फ्यूसहित 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात लॉकडाऊन लावण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या बैठका सुरू आहेत.

फोटो स्रोत, Reuters
दिल्लीतही नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात एप्रिलच्या शेवटापर्यंत शाळा बंद असणार आहेत. देशात अशी स्थिती असतानाही कुंभमेळ्याच्या आयोजनास परवानगी दिल्यामुळे जाणकार नाराज आहेत.
आता जर कठोर पावलं उचलली नाहीत तर स्थिती आणखी बिघडेल, असं काही जाणकारांचं मत आहे. तसंच कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यात यावा आणि कोरोनाच्या निर्बंधांचं प्रशासनानं कठोरपणे पालन करून घ्यावं, अशी सूचना जाणकार देत आहेत.
भारत सरकारचं म्हणणं आहे, की भारत हा जगातला पहिला देश आहे, ज्यानं कोरोना व्हायरसपासून बचावण्यासाठी सर्वाधिक वेगानं लोकांना लस दिली.
85 दिवसांत लशीचे 10 कोटी डोस लोकांना देण्यात आल्याचं सरकारचं म्हणणं आहे. अमेरिकेला यासाठी 89, तर चीनला 102 दिवस लागले, असंही सरकार सांगतं.
लसीकरण मोहिमेत वेग आणण्यासाठी सरकार 11 एप्रिल ते 14 एप्रिल या चार दिवसांसाठी 'लस महोत्सव' साजरा करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं.
हा महोत्सव म्हणजे कोरोनाविरुद्धच्या दुसऱ्या युद्धाची सुरुवात आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. या काळात लसीकरण केंद्रावर स्वत: जाऊन लस न घेऊ शकणारे, तसंच लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी आवश्यक साधनं उपलब्ध नसलेल्या लोकांची मदत करा, असंही मोदींनी म्हटलं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








