SSC, HSC परीक्षा कोरोना लॉकडाऊन लागू झाल्यावर होणार की नाही?

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

महाराष्ट्रात सरकारकडून लॉकडाऊनचे संकेत देण्यात आलेत. याबाबत अंतिम निर्णयाची घोषणा आज (12 एप्रिल) केली जाऊ शकते. पण एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होणार की पुढे ढकलणार? याबाबत मात्र संभ्रम कायम आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून राज्यात लॉकडॉऊन लागू करण्यासंदर्भात बैठका घेत आहेत. 10 एप्रिल रोजी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पुढील 8-14 दिवसांसाठी लॉकडॉऊन जाहीर केला जाऊ शकतो असे संकेत देण्यात आले.

रविवारी (11 एप्रिल) मुख्यमंत्री आणि कोव्हिड टास्क फोर्स समितीचीही बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाची रुग्णसंख्या आणि उपाययोजना याचा आढावा घेण्यात आला. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी किती दिवसांचा लॉकडॉऊन आवश्यक आहे यावरही यावेळी चर्चा करण्यात आली.

लॉकडाऊन लागू झाल्यास राज्यातील जवळपास 32 लाख विद्यार्थ्यांच्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे काय होणार? सीबीएसई आणि आयसीएसई या केंद्रीय बोर्डाच्या परीक्षांबाबत राज्य सरकार कसा निर्णय घेणार? परीक्षा पुढे ढकलणार की परीक्षेसाठी काही वेगळा पर्याय राबवला जाणार? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलणार?

राज्य शिक्षण मंडळाच्या नियोजित वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान तर बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 31 मार्च रोजी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, लॉकडाऊन असलेल्या जिल्ह्यांत परीक्षा होणार नाहीत. त्या ठिकाणी जूनमध्ये परीक्षा देण्याची संधी मुलांना असेल असं स्पष्ट केलं होतं.

राज्य सरकारने नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलली आहे. 11 एप्रिल रोजी एमपीएससीची जी परीक्षा होणार होती ती झालेली नाही. परीक्षेच्या दोन दिवस आधी ती पुढे ढकलण्यात आली.

याच धर्तीवर बोर्डाच्या परीक्षांबाबत काय निर्णय घेतला जाणार? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्याही मनात आहे.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

ते म्हणाले, "दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचे अनेक संदेश आमच्यापर्यंत पोहचत आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यापर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या पोहचवल्या आहेत. त्या सुद्धा विविध संबंधित घटकांशी चर्चा करत आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि करिअर धोक्यात येणार नाही."

पण परीक्षा पुढे ढकलणे हा काही उपाय नाही असंही काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

सलोनी कांबळी मुंबईत बारावी विज्ञान शाखेत शिकते. बीबीसी मराठीशी बोलताना ती म्हणाली, "आता परीक्षा पुढे ढकलली तरी जून महिन्यात रुग्णसंख्या आटोक्यात येईलच असे नाही. तसंच कोरोनाचा धोका तेव्हाही राहणार आहे. मग त्यापुढे परीक्षा कधी घेणार आणि निकाल कधी जाहीर करणार?"

"यापेक्षा सरकारने लेखी परीक्षेला दुसरा पर्याय दिला पाहिजे आणि परीक्षा घेतली पाहिजे. जेणेकरून पुढील प्रवेश प्रक्रिया सुरळीत होऊ शकतील," असंही सलोनी सांगते.

'देशातील सर्व विद्यार्थ्यांसाठी समान निर्णय घ्या'

बोर्डाच्या परीक्षांची पद्धती बदलण्यासाठी सरकारला इतर केंद्रीय बोर्डाच्या परीक्षा पद्धतीचाही विचार करावा लागणार आहे. बोर्डाच्या परीक्षा या देशभरात एकसमान पातळीवर होत असतात.

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांना देशातील बोर्डाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी समान निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

ते म्हणाले, "देशातील सर्व दहावी तसंच बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भात धोरण आखुन समान निर्णय घेण्यात यावा. सीबीएसई, आयसीएसई आणि एसएससीप्रमाणे राज्य पातळीवरील विविध बोर्ड असल्यामुळे एकसमान निर्णय घेतला तर विविध राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा प्रावधान किंवा संधीबद्दलचा कोणताही भेदभाव होणार नाही."

महाराष्ट्रात एप्रिल आणि मे महिन्यातच सीबीएसई आणि आयसीएसई या केंद्रीय बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुद्धा होत आहेत. केंद्रीय बोर्ड असल्याने या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत राज्य सरकारला केंद्रीय मंडळाशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे.

'30 लाख कुटुंब धोक्यात येतील'

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. तसंच मुंबई, पुणे, नाशिक या जिल्ह्यांत लेखी परीक्षा रद्द करून ऑनलाईन परीक्षेचा पर्यायही विद्यार्थ्यांनी सुचवला आहे.

पण राज्यातील ग्रामीण भागात ऑनलाईन परीक्षा घेणं शक्य नसल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वी अनेकदा स्पष्ट केलं आहे.

आता राज्यात कडक निर्बंध लागू झालेत. तसंच विकेंडला पूर्ण लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत परीक्षा घेण्यावर सरकार का ठाम आहे? 30 लाख विद्यार्थ्यांचा जीव सरकार का धोक्यात घालत आहे? असा प्रश्न इंडियावाईड पॅरेंट असोसिएशनने उपस्थित केला आहे.

पालक संघटनेच्या प्रमुख अनुभा सहाय यांनी सांगितलं, "परीक्षा ऑनलाईन घ्या किंवा इतर काही राज्यांप्रमाणे अतिरिक्त असाईनमेंट्स घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करा. याबाबत केंद्रीय शिक्षण विभागाने राज्य सरकारला सूचना करावी अशी मागणी आम्ही करत आहोत."

शिक्षक-पालक संघटना, महाराष्ट्र स्टुडंट वेलफेअर असोसिएशन या संघटनांनीही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

'अफवांपासून सावध राहा'

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतेच एका ट्वीटच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांना सावध राहण्याची सूचना केली आहे.

वर्षा गायकवाड यांच्या ट्वीटर हँडलवरून दहावी आणि बारावी परीक्षा रद्द झाल्याचा एक बनावट संदेश व्हायरल होत असल्याची माहिती त्यांनी दिली. हा बनावट फोटो आणि माहिती त्यांनी त्यांच्या अधिकृत अकाऊंवरून ट्वीट केली आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, "सोशल मीडियावरील केवळ अधिकृत अकाऊंट्सवरून दिल्या जाणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवा. माझ्या ट्वीटर हँडलचा एक बनावटी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर विश्वास ठेऊ नका. अफवांपासून दूर राहा." असंही आवाहन त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना केले आहे.

बोर्डाच्या परीक्षा कधी होणार? त्याचे स्वरुप काय असेल? यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील असंही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वी स्पष्ट केले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडॉऊनच्या निर्णयासोबतच बोर्डाच्या परीक्षांबाबतही निर्णय जाहीर करतील अशीही शक्यता आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)