छत्तीसगढ : बिजापूरमध्ये आणखी एक नक्षलवादी हल्ला

फोटो स्रोत, GANESH
- Author, आलोक प्रकाश पुतुलू
- Role, रायपूरहून, बीबीसी हिंदीसाठी
छत्तीसगढच्या बिजापूरजवळ गेल्या आठवड्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 22 जवानांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बिजापूरमध्येच आणखी एक नक्षलवादी हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
रविवारी (11 एप्रिल) बिजापूरमध्ये वॉटर फिल्टरचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये संशयित माओवाद्यांनी फिल्टरच्या कामात असलेल्या पाच वाहनांना आग लावल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
बिजापूरच्या नैमेड पोलीस ठाणे हद्दीत मिनगाछल नदीवर वॉटर फिल्टर प्लांटचं बांधकाम सुरू आहे.
इथे साहित्याची ने-आण करणाऱ्या वाहनांना माओवाद्यांनी लक्ष्य केलं. येथील पाच वाहनांना नक्षलवाद्यांनी आग लावली. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त रवाना करण्यात आल्याची माहिती बिजापूरचे पोलीस अधीक्षक कमलोचन कश्यप यांनी दिली आहे.
दंतेवाडात एका माओवाद्याला कंठस्नान
दरम्यान, छत्तीसगढमध्ये दंतेवाडा परिसरात झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिषेक पल्लव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात गोळीबार झाला.
यामध्ये एका माओवाद्याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला असून घटनास्थळी अनेक माओवाद्यांचा मृत्यू झाल्याचे तसंच ते जखमी झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. याप्रकरणी सध्या पोलीस तपास सुरू आहे, अशी माहिती डॉ. पल्लव यांनी दिली आहे.
दंतेवाडातील कटेकल्याण परिसरात गादम जवळ ही घटना घडली. या चकमकीत मारल्या गेलेल्या माओवाद्याची ओळख पटली आहे.
वट्टी हूंगा असं याचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या नक्षलवाद्यावर एक लाख रुपयांचं बक्षीसही होतं, असं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माओवाद्यांनी आधीच बिजापूर येथील वॉटर फिल्टरचं काम थांबवण्याची धमकी दिली होती. रविवारी सशस्त्र माओवाद्यांचा एक गट घटनास्थळी दाखल झाला. या ठिकाणच्या वाहनांमध्ये बसलेल्या लोकांना त्यांनी खाली उतरवलं. त्यांना भविष्यात इथं काम न करण्याचा इशारा दिला. त्यानंतर त्यांनी या वाहनांना आग लावली.
गेल्या काही दिवसांत बस्तर परिसरात माओवाद्यांच्या हल्ल्याचं प्रमाण वाढलं आहे. एका आठवड्यापूर्वीच बिजापूरजवळ जोनागुडा परिसरात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 22 जवान मृत्यूमुखी पडले होते.
यापूर्वी, 26 मार्च रोजी बिजापूरच्या जिल्हापरिषदेचे सदस्य बुधराम कश्यप यांची संशयित माओवाद्यांनी हत्या केली होती. 25 मार्च रोजी कोंडागांवमध्ये रस्त्याचं काम करणाऱ्या 12 वाहनांना माओवाद्यांनी आग लावली होती.
23 मार्च रोजी नारायणपूरमध्ये माओवाद्यांविरुद्ध झालेल्या चकमकीत जिल्हा राखीव सुरक्षा बलाचे 5 जवान मारले गेले होते.
त्याच दिवशी बीजापूरमध्ये पोलीस आरक्षक सन्नू पुनेम यांचं माओवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती.
13 मार्च रोजी सुनील पदेम नामक कथित माओवादी स्फोटकं लावताना झालेल्या स्फोटात मारला गेला होता.
5 मार्च रोजी नारायणपूर परिसरात भारत-तिबेट सीमा सुरक्षा बलाचे प्रमुख आरक्षक रामतेर मंगेश यांचा IED स्फोटात मृत्यू झाला होता. तसंच 4 मार्च रोजी दंतेवाडातील फुरनारमध्ये छत्तीसगढ सशस्त्र बलाचे लक्ष्मीकांत द्विवेदी हे IED स्फोटात मृत्यूमुखी पडले होते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








