IPL 2021 : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातल्या भांडणाची चर्चा का होते?

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत, नाहीत असं म्हणतात. आज हा वाक्प्रचार आठवण्याचं कारण म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातल्या 'रायव्हलरी'ची चर्चा.

तसं तर खेळाडूंमधल्या चढाओढीच्या, वादविवादांच्या बातम्या नेहमीच चघळल्या जातात. पण विराट आणि रोहितमधून म्हणे एके काळी विस्तवही जात नव्हता.

दोघांनी आपल्यात कुठलाही बेबनाव नसल्याचं अनेकदा स्पष्ट केलं आहे. तरीही अशा चर्चा वारंवार होत राहतात, यालाही काही कारणं आहेत.

वर्ल्ड कप 2019 आणि ड्रेसिंगरूममधलं 'भांडण'

रोहित आणि विराटमधल्या कथित वादाची सुरुवात 2019 सालच्या वन डे विश्वचषकादरम्यान झाली.

न्यूझीलंडविरुद्धची सेमीफायनल वगळता रोहितनं त्या स्पर्धेत भरीव कामगिरी बजावली होती. पण एक कर्णधार म्हणून विराटनं त्याची खुल्या दिलानं फारशी तारीफ केलेली नाही, असं चाहत्यांचं म्हणणं होतं.

याच दरम्यान ड्रेसिंग रूममधल्या एका भांडणाचीही चर्चा होऊ लागली. एका सीनियर प्लेयरनं नियम मोडल्यावरून हा वाद झाला होता. पण तो सीनियर खेळाडू कोण आणि नेमकं काय झालं होतं, याविषयी कुणीच पुढे येऊन कधीच स्पष्टपणे बोललं नाही.

भारतीय मीडियात त्याविषयी अनेक तर्क प्रसिद्ध झाले. इंग्लंडमध्ये त्यावेळी विश्वचषकाचं वार्तांकन करणारे एक भारतीय पत्रकार त्याविषयी सांगतात, की खेळाडूंसोबत त्यांच्या पत्नीनं राहावं की नाही, याविषयी टीमचे काही नियम असतात आणि रोहितनं ते मोडल्याचा आरोप झाला होता.

"रोहितची पत्नी रितिका ही त्याच्या मॅनेजमेंट टीमची सदस्य असून त्याच नात्यानं इंग्लंडमध्ये गेली होती, असं रोहितचं म्हणणं होतं. दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री आणि विराटची पत्नी अनुष्का शर्माला मात्र तशी परवानगी मिळू शकली नाही आणि त्यावरून मतभेद झाले, असं टीममधील सूत्रांनी तेव्हा सांगितलं होतं."

दोन सहकाऱ्यांमध्ये असे काही खटके उडणं स्वाभाविक आहे, पण त्यावेळी भारताच्या पराभवानंतर याची जरा जास्तच चर्चा झाली, असंही ते सांगतात.

रोहित आणि विराट हे दोघं एकमेकांना ट्विटरवर फॉलो करत नाहीत, एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत नाहीत, असं दोघांचे चाहते लिहू लागले. तर बीसीसीआयमध्या काहींनी भारतीय संघाचं कर्णधारपद विभागून दिलं जावं असाही सल्ला दिला.

पण स्वतः विराटनं मात्र असा वाद झाल्याचं साफ नाकारलं. "आमच्यात कुठलंही भांडण नाही. मला कोणी आवडत नसेल, तर ते माझ्या चेहऱ्यावर लगेच दिसतं. मी गेल्या काही दिवसांत खूप काही ऐकतो आहे. पण टीममधलं वातावरण चांगल नसतं, तर आम्ही चांगलं खेळू शकलो नसतो." असं कोहली तेव्हा म्हणाला होता.

तर विराटनंही मीडियातल्या चर्चेविषयी आणि सोशल मीडियावर येणाऱ्या कमेंट्सविषयी नाराजी व्यक्त केली होती. "आमच्यातल्या वादाविषयी मी पहिल्यांदा ऐकलं, तेव्हा मला हसूच फुटलं. पण नंतर ही चर्चा वाढतच गेली आणि माझ्या कुटुंबाला त्यात ओढलं गेलं. माझ्याविषयी काहीही बोला, पण माझ्या कुटुंबाचा यात काही संबंध नाही. मला वाटतं, विराटलाही असंच वाटलं असावं."

रोहितची दुखापत आणि 2020चा ऑस्ट्रेलिया दौरा

गेल्या वर्षी आयपीएलदरम्यान विराट आणि रोहितमधल्या वादाला पुन्हा तोंड फुटलं. नोव्हेंबरमध्ये युएईत खेळवण्यात आलेल्या आयपीएलच्या तेराव्या मोसमादरम्यान रोहितला दुखापत झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याचा संघात समावेश झाला नाही.

पण त्यानंतर रोहित क्वालिफायर आणि फायनलमध्ये खेळला आणि त्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबईनं पाचव्यांदा आयपीएलचं जेतेपदही मिळवलं.

मग पुढे टीम ऑस्ट्रेलियात पोहोचली तेव्हा विराटला रोहितच्या दुखापतीविषयी विचारण्यात आलं. तेव्हा विराटनं आपल्याला रोहितच्या दुखापतीविषयी पूर्ण माहिती नसल्याचं मान्य केलं.

"बीसीसीआयनं ईमेलद्वारा रोहित दुखापतग्रस्त असल्याचं म्हटलं होतं. तो आयपीएलमध्ये खेळला. तेव्हा तो टीमसोबत ऑस्ट्रेलियाला येईल असं सगळ्यांना वाटलं होतं. आम्ही पण त्याच्याविषयी स्पष्ट माहितीची वाट पाहतो आहोत," असं कोहली तेव्हा म्हणाला होता.

हे सगळं ऐकल्यावर या दोघांमध्ये कधी थेट बोलणं होतं की नाही, असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला. चाहत्यांचे दोन कंपू पडले आणि नव्यानं चर्चा रंगू लागली. नुसती चर्चा नाही, तर ऑनलाईन जुंपली, असंच म्हणायला हवं.

दोघांमधलं नातं नेमकं कसं आहे?

गेल्या वर्षी जे काही घडलं, त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. कोव्हिडच्या साथीमुळे खेळाडूंना बायोबबलमध्ये राहावं लागतंय आणि बाहेरच्या जगाशी त्यांचा संपर्क कमी झाला आहे.

अशात रोहित आणि विराटमधला संवाद वाढला असून, त्यांचं नातं आता पुन्हा मैत्रीपूर्ण झालं असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

सोशल मीडियावर ते इतरांसारखे गळ्यात गळे घालून दिसत नाहीत. पण यंदा जानेवारीत विराट आणि अनुष्कानं त्यांना मुलगी झाल्याचं जाहीर केलं, तेव्हा रोहितनं त्यांचं अभिनंदन केलं होतं.

तसंही दोघं एकमेकांसोबत मैत्री किंवा वाद असण्याविषयी कधीच बोलत नाहीत. पण 2017 साली विराट रोहितविषयी काही बोलला होता.

'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या शोला 2017 साली दिलेल्या मुलाखतीत विराटनं कबूल केलं होतं, की रोहितनं जेव्हा पदार्पण केलं, तेव्हा मला त्याच्यापासून आपल्याला धोका वाटला होता.

"मला उत्सुकता वाटायची, हा एवढा कोण आहे, ज्याच्याविषयी लोक एवढं भरभरून बोलतायत? मी पण तरुण खेळाडू आहे ना? मग ट्वेन्टी20 विश्वचषकात त्याला खेळताना पाहिलं. तेव्हा मी गप्पच झालो." अशा आशयाचं विधान विराटनं केलं होतं. त्यानं रोहितच्या खेळाचं कौतुकही केलं.

तरीही दोघांमध्ये सारं काही आलबेल आहे का, असा प्रश्न वारंवार विचारला जातो. आणि हे प्रश्न कधी थांबणार नाहीत, असं ज्येष्ठ क्रिकेटर सुनील गावस्कर यांना वाटतं.

इंग्लंडमधल्या विश्वचषकादरम्यान झालेल्या कथित वादानंतर गावस्कर यांनी स्पोर्टस्टारमध्ये लिहिलं होतं, की "मीडियासाठी ही आकाशातून झालेली खैरात आहे. जेव्हा क्रिकेट सुरू असतं, तेव्हा ही सगळी चर्चा बाजूला असते. पण मधल्या दिवसांत पुन्हा या कहाणीची आग पेटवली जाते."

गावस्कर पुढे लिहितात, "विराट आणि रोहित व्यावसायिक खेळाडू आहेत. ते आपलं लक्ष खेळावर केंद्रीत करून भारतासाठी सामने जिंकत राहतील. पण वीस वर्षांनंतरही अशीच चर्चा होत राहील."

तसंही, क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे, त्यामुळे दोघांपैकी वरचढ कोण, याची चर्चा होत राहीलच.

आकडे काय सांगतात?

रोहित आणि विराट साधारण एकाच वयाचे. एक पक्का मुंबईकर 'मुलगा' आणि दुसरा दिल्लीचा 'लाडला'.

दोघांमध्ये जेमतेम काही महिन्यांचं अंतर आहे. साधारण एकाच सुमारास त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात झाली. पण विराटनं आल्या आल्याच वेगानं शिखर गाठलं तर रोहितचा प्रवास थोडा खाचखळग्यांतून धक्के खात झाला.

दोघांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या कामगिरीत त्याचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं.

कसोटी क्रिकेटमध्ये रोहितनं 38 सामन्यांत 2615 धावा केल्या आहेत, तर विराटनं 91 सामन्यांत 7490 धावा केल्या आहेत. यादरम्यान रोहितनं एका द्विशतकासह सात शतकं ठोकली आहेत, तर विराटनं सात द्विशतकांसह 27 शतकं ठोकली आहेत.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मात्र दोघांमधली दरी थोडी कमी आहे.

रोहितनं 227 सामन्यांत 9205 धावा करताना 29 शतकं ठोकली आहेत. त्यात रोहितनं तीनदा द्विशतक साजरं केलं आहे. तर विराटनं 256 सामन्यांत 12169 धावा करताना 43 शतकं ठोकली आहेत.

तर ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये रोहितनं 111 आंतरराष्ट्रीय सामन्यांत चार शतकांसह 2864 धावा केल्या आहेत. आणि विराटनं 90 सामन्यांत 3159 धावा केल्या आहेत, पण एकही शतक ठोकलेलं नाही.

टेस्ट आणि वन डे क्रिकेटमध्ये विराटनं आपल्या नेतृत्त्वाचा ठसा उमटवला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर तो टीम इंडियाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आला आहे. पण ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये मात्र कर्णधार म्हणून रोहितची कामगिरी लक्षणीय आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या प्रांगणात फलंदाज म्हणून विराटची आकडेवारी रोहितपेक्षा चांगली आहे. पण नेतृत्त्वाच्या बाबतीत तिथे रोहित विराटपेक्षा बराच वरचढ ठरतो. रोहितच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सनं आजवर पाचवेळा ही स्पर्धा जिंकली आहे. तर रोहितची रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरू अजूनही विजेतेपदासाठी धडपडतानाच दिसते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)