You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लॉकडाऊन: दुकानं उघडी ठेवली तर कोरोना पसरतो का?
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लॉकडाऊनचा विचार सरकारी पातळीवर सुरू आहे. गेल्या आठवड्यात घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या निर्णयाच्या विरोधात राज्यातील व्यापाऱ्यांनी आंदोलने केली. पुण्यातील व्यापाऱ्यांनी देखील आज दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु काल रात्री उशीरा व्यापाऱ्यांची बैठक झाली. त्यात दुकाने उघडण्याचा निर्णय आजच्या दिवसापुरता स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या आजच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयानंतर पुढील भूमिका व्यापाऱ्यांकडून ठरविण्यात येणार आहे.
दुकाने बंद ठेवण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आम्ही राज्याचे आरोग्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंके यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
व्यापाऱ्यांचा दावा त्याला तज्ञांचे उत्तर
1. भाजी मंडई सुरु आहे, खाद्यपदार्थ विकणारे स्टॉल यांच्यापासून देखील कोरोना पसरु शकतो मग त्यांच्यावर निर्बंध का नाहीत ?
व्यापारी किंवा कर्मचारी सुपर स्प्रेडर असेल तर त्याच्याकडून प्रसार होण्याचा धोका अधिक असतो. दुकानांमध्ये लोक बराच काळ असतात त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. अनेक दुकानांमध्ये व्हेंटिलेशन योग्य प्रमाणात नसते तर अनेक दुकानांमध्ये एसी असतात त्यामुळे प्रसार मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.
भाजी मंडई, खाद्यपदार्थ विकणाऱ्यांकडून देखील प्रसार होऊ शकतो परंतु भाजी मंडई ही मोकळ्या जागेत असते, दर दुकाने बंदिस्त असतात हा यातील मुख्य फरक आहे. एका ठिकाणी कोरोना होणार नाही आणि एखाद्या विशिष्ट ठिकाणी होईल असे मुळीच नाही परंतु दुकाने सुरु राहीली तर त्याचा प्रसार जास्त होऊ शकतो.
2. कारखाने सुरु आहेत, तेथे शेकडो लोक काम करतात, एकाच बसमधून जातात त्यांच्याकडून देखील संक्रमण होऊ शकते.
कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि व्यापाऱ्यांकडे असणारे कर्मचारी आणि त्यांच्याकडे येणारे ग्राहक यांची संख्या यात फरक आहे. सगळा दोष व्यापाऱ्यांनाच द्यायचा असे नाही परंतु ज्या ठिकाणी जास्त लोक एकत्र येऊ शकतील ती ठिकाणी बंद करणं गरजेचं आहे.
3. ई कॉमर्सला परवानगी दिली जाते. डिलिव्हरी बॉईज घरोघरी जाऊन वस्तू देऊ शकतात ते सुद्धा कोरोना पसरवू शकतात.
ई कॉमर्सला परवानगी देताना डिलिव्हरी बॉईजची चाचणी करणे आवश्यक असल्याचे आदेशामध्ये म्हटलं आहे, त्यामुळे चाचणी केल्यावरच त्यांना काम करता येणार आहे.
4. गेल्या आठ दिवसांपासून व्यापार बंद आहे, तरी रुग्ण संख्या कमी झालेली दिसत नाही.
आठ दिवसात परिणाम दिसणारच नाही. लॉकडाऊन पंधरा दिवस केला तरच त्याचा परिणाम दिसून येतो. त्यानंतरच साखळी तुटायला मदत होते. त्याचे परिणाम दिसण्यासाठी देखील काही दिवस वाट पहावी लागेल.
5. लग्न समारंभ, राजकीय मेळावे येथून देखील कोरोना होतो, त्यांच्यावर निर्बंध का नाहीत ?
लग्न समारंभ आणि राजकीय मेळावे संपूर्ण बंद करायला हवे. लग्नाला 50 लोकांची परवानगी आहे ती देखील रद्द करायला हवी. लग्न, राजकीय कार्यक्रम टाळता येऊ शकतात किंवा पुढे ढकलता येऊ शकतात. लग्न आणि राजकीय कार्यक्रम काही महिने पुढे ढकलले तर काही फरक पडणार नाही.
कोरोनाचा प्रसार झपाट्याने का वाढतोय?
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे म्युटेशन झाले आहे आणि त्यामुळेच त्याचा प्रसार मोठ्याप्रमाणावर होत असल्याचे मत आयएमएचे राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केले. भोंडवे म्हणाले, "सध्या कोरोना विषाणूचे डबल म्युटेशन दिसून येत आहे. त्याचा प्रसाराचा वेग दुपटीपेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर कोरोनाची लक्षणे देखील बदलली आहेत. डोळे लाल होणे, खाज सुटणे, जुलाब होणे ही नवीन लक्षणे दिसत आहेत. आधी वयोवृद्ध नागरिकांना अधिक लागण होत होती आता 20 ते 25 वयोगटातील लोकांना जास्त लागण होते आहे".
"कॉन्टॅक्ट ट्रेसिंग योग्य पद्धतीने होत नाही. एका पॉझिटिव्ह रुग्णामागे 20 जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्हायला हवे, ते सध्या पाचच होत आहे. त्यामुळे जे लक्षणेविरहित रुग्ण आहेत त्यांच्यामुळे प्रसार मोठ्याप्रमाणावर होत आहे. त्याचबरोबर नागरिक देखील नियम पाळत नाहीत आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होत नसल्याने प्रसार वाढतोय", असंही भोंडवे म्हणाले.
इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यापार करावा
दुकाने उघडली तर तिथे गर्दी होणार आणि त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी देखील इलेक्ट्रॉनिक पद्धतींचा वापर करुन होम डिलिव्हरी किंवा ठराविक वेळेत ठराविक लोकांना अपॉईंटमेंट देऊन व्यवहार सुरु ठेवल्यास कोरोनाचा प्रसार कमी करता येऊ शकतो असंही भोंडवे यांना वाटतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)