कोरोना चाचणी : कोव्हिड-19ची चाचणी होणार 500 रुपयांत, महाराष्ट्र सरकारकडून पुन्हा कपात

कोरोनाचा प्रादुर्भाव एखाद्या व्यक्तीला झालेला आहे की नाही हे तपासण्यासाठीच्या RT-PCR चाचणीच्या दरामध्ये राज्य सरकारने पुन्हा एकदा कपात केली आहे. आता 500 रुपयांमध्ये ही चाचणी करून घेता येईल.

RT-PCR, अँटीबॉडी आणि रॅपिड अँटीजेन चाचण्यांसाठीच्या दरांत राज्य सरकारने कपात केलीय.

राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नसल्याचं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी म्हटलंय.

RT-PCR चाचणीचे दर -

  • लॅबमध्ये जाऊन चाचणी करण्यासाठी - 500 रुपये
  • हॉस्पिटल, कोव्हिड केअर सेंटर किंवा क्वारंटाईन सेंटर मधल्या प्रयोगशाळांमधल्या तपासणीसाठी - 600 रुपये
  • रुग्णाच्या घरी येऊन नमुना घेऊन चाचणी करण्यासाठी - 800 रुपये

अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोव्हिड) चाचणीचे दर -

  • लॅबमध्ये जाऊन चाचणी करण्यासाठी - 250 रुपये
  • तपासणी केंद्रावरून किंवा एकत्र नमुने घेण्यासाठी - 300 रुपये
  • रुग्णाच्या घरी येऊन नमुना घेऊन चाचणी करण्यासाठी - 400 रुपये

CLIA फॉर सार्स कोव्हिड अँटीबॉडीज चाचणी दर -

  • लॅबमध्ये जाऊन चाचणी करण्यासाठी - 350 रुपये
  • तपासणी केंद्रावरून किंवा एकत्र नमुने घेण्यासाठी - 450 रुपये
  • रुग्णाच्या घरी येऊन नमुना घेऊन चाचणी करण्यासाठी - 550 रुपये

रॅपिड अँटीजेन चाचणी दर

  • लॅबमध्ये जाऊन चाचणी करण्यासाठी - 150 रुपये
  • तपासणी केंद्रावरून किंवा एकत्र नमुने घेण्यासाठी - 200 रुपये
  • रुग्णाच्या घरी येऊन नमुना घेऊन चाचणी करण्यासाठी - 300 रुपये

RT-PCR म्हणजे म्हणजे काय?

RT-PCR म्हणजे Real Time Reverse Transcription Polymerase Chain Reaction.यालाच स्वॉब टेस्ट असंही म्हटलं जातंय. या टेस्टसाठी निर्जंतुक केलेला स्वॉब नाकात घालून सँपल घेतलं जातं आणि त्यावर चाचणी करण्यात येते. RT-PCR Test ही कोरोनाचा संसर्ग झालाय की नाही हे खात्रीशीर पद्धतीने सांगू शकते.

रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये सुद्धा RT-PCR प्रमाणेच स्वॉब सँपल घेतलं जातं. पण याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याचे निकाल साधारण अर्ध्या तासात मिळू शकतात. या स्वॉबमध्ये कोरोनाचे विषाणू आहेत किंवा नाही हे या अँटीजेन टेस्टमध्ये कळतं. कारण, अँटीजेन्स हे विषाणूंचा एक भाग असतात.

या टेस्टचं सँपल तपासण्यासाठी प्रयोगशाळेत न्यावं लागत नाही. त्याची तिथल्या तिथे तपासणी करता येते. ही किट्स तुलनेने स्वस्त, लवकर निकाल देणारी आणि वापरायला सोपी असल्याने याचा जगभरात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातोय.

अँटीबॉडी टेस्टमध्ये व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. यात रक्ताच्या पेशींमध्ये विषाणूंना मारण्यासाठी अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडीज आहेत का, हे या टेस्टद्वारे तपासलं जातं. अँटीबॉडीज आहेत याचाच अर्थ त्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेला आहे, आणि त्याच्या शरीरात या विषाणूशी लढण्यासाठीची यंत्रणा तयार झालेली आहे.

आपल्याला कोरोनाचा संसर्ग झालाय की नाही, हे तुम्हाला तपासून पहायचं असल्यास त्यासाठी कोणती टेस्ट करायची? अधिक माहितीसाठी वाचा - कोरोनाची लक्षणं जाणवल्यावर कोणती टेस्ट करायची?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)