संजय राऊत: 'सचिन वाझेंमुळे सरकार अडचणीत येईल हे मी सांगितलं होतं'

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. सचिन वाझेंमुळे सरकार अडचणीत येईल हे मी सांगितलं होतं- संजय राऊत

"सचिन वाझे यांना महाराष्ट्र पोलीस दलात पुन्हा रुजू करण्याबाबतचा जेव्हा निर्णय घेण्यात येत होता तेव्हाच मी शिवसेनेच्या काही नेत्यांना सांगितलं होतं. वाझेंच्या कामाच्या पद्धतीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येऊ शकतं, असा इशारा मी तेव्हाच दिला होता," असा खुलासा संजय राऊत यांनी दिला आहे. 'लाईव्हमिंट'ने ही बातमी दिली आहे.

"सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारला धडा मिळाला आहे. एका अर्थाने अशा प्रकारची घटना घडली ते चांगलंच झालं, ज्यामुळे धडा शिकायला मिळाला," असं ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर "कोणतीही व्यक्ती वाईट नसते. पण कधीकधी परिस्थिती त्यांना तशी बनवते," असं राऊत यांनी म्हटलं आहे.

"जेव्हा सचिन वाझेला महाराष्ट्र पोलीस दलात पुन्हा समाविष्ट करण्याची योजना आखली जात होती तेव्हाच मी काही नेत्यांना सूचित केलं होतं, वाझे आपल्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात. त्यांचा व्यवहार आणि काम करण्याच्या पद्धतीमुळे सरकार अडचणीत येऊ शकतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तेव्हा वाझेच्या कामांबाबत माहिती नव्हती," असं स्पष्टीकरण राऊत यांनी दिलं.

2. गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा खात्मा

कुरखेडा पोलीस उपविभाग अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीच्या खोब्रामेंढा जंगलात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या नक्षलवाद विरोधी अभियानात आज (सोमवार) सकाळी 7.30 ते 8 या वेळेत झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

यामध्ये नक्षलवाद्यांचा उत्तर गडचिरोली विभागीय समितीचा सचिव 25 लाखांचे बक्षीस असलेला जहाल नक्षली ऋषी रावजी उर्फ पवन उर्फ भास्कर हीचामी (46), राजू उर्फ सुखदेव बुधेसिंग नेताम (32), अमर मुया कुंजाम (30), सुजाता उर्फ कमला उर्फ पूनिता गावडे (38) व अस्मिता उर्फ सखलु पदा (28) असे तीन पुरुष व दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सलग तीन दिवसांपासून या भागात सी 60 पथक अभियान राबवित आहे. शुक्रवार 27 मार्च पासून पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकी सुरू आहेत. आतापर्यत तीन चकमकी झाल्या आहेत.

शनिवारी सुमारे एक ते दीड तास चाललेल्या या चकमकीत पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. या चकमकीनंतर घटनास्थळावरून एके 47 सह चार बंदुका व मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचे साहित्य जप्त करण्यात आले.

3. 'लॉकडाऊनमुळे गरिबांना फटका बसतो'

"उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होतं," असं ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे. विरोधकांकडून देखील राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याला विरोध केला आहे. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.

"मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात," असं आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

राज्यात सातत्याने वाढणारे करोना रुग्ण आणि मृतांचा आकडा या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, या मुद्द्यावरून आता उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे म्हटलं आहे.

4.ममता बॅनर्जींना मतदान केलं तर इथे मिनी पाकिस्तान होईल-सुवेंदू अधिकारी

'ममता बॅनर्जींना मत देऊ नका. जर तुम्ही त्यांना मतदान केले तर येथे मिनी पाकिस्तान होईल,' अशा आशयाचं असं वक्तव्य सुवेंदू अधिकारी यांनी केलं. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अल्पसंख्याकांना संतुष्ट करणात गुंतल्या आहेत असा आरोप भाजपाचे नेते सुवेन्दु अधिकारी यांनी सोमवारी केला. पश्चिम बंगालला मिनी पाकिस्तान होण्यापासून रोखण्यासाठी टीएमसीला मत न देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

नंदीग्राम येथील एका स्थानिक मंदिराला भेट दिल्यानंतर अधिकारी यांनी हे वक्तव्य केलं. टीएमसी सुप्रीमोवर टीका करताना ते म्हणाले की, ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्याची त्यांना सवय लागली आहे आणि म्हणूनच त्यांनी लोकांना "होली मुबारक" अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

दुसर्‍या टप्प्यातील मतदान नंदीग्राममध्ये 1 एप्रिल रोजी होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात 294 जागांसाठी मतदान होणार आहे.

5. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे 31मार्चला भूमीपूजन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं भूमीपूजन 31 मार्चला होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कार्यक्रमाची परवानगी मिळवण्याठी राज्य सरकारकडून कार्यवाही सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 'टीव्ही9मराठी'ने ही बातमी दिली आहे.

राज्यात सध्याच्या कोरोना प्रतिबंधक नियमावलीमुळे निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्क येथील महापौरांचे जुने निवासस्थान या स्मारकाची नियोजित जागा आहे.

या स्मारकाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजुरीला चालना मिळाली होती. त्यानंतर आताच्या ठाकरे सरकारमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पात या स्मारकासाठी 400 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे या स्मारकाचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)