सचिन वाझे प्रकरणात आत्तापर्यंत काय झालं?

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी सचिन वाझे NIA च्या कोठडीत आहेत. कोर्टाने वाझे यांना 3 एप्रिलपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे. जसजशी चौकशी पुढे जातेय, या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपासही NIA ने सुरू केलाय. मनसुख हत्याप्रकरणी एटीएसने अटक केलेले आरोपी विनायक शिंदे आणि नरेश गोर एनआयएच्या ताब्यात आहेत. तर, वाझे यांच्याविरोधात NIA ने अवैध कारवाई प्रतिबंधक कायद्याची कलमं (UAPA) दाखल केली आहेत.

अंबानी जिलेटीन प्रकरण, मनसुख हिरेन हत्या आणि त्यानंतर सुरू झालेलं राजकारण यात आत्तापर्यंत काय झालं. हे आपण जाणून घेणार आहोत.

मिठी नदीच्या पात्रात सापडला लॅपटॉप आणि कॉम्प्यूटर

रविवारी (28 मार्च) NIA चे अधिकारी सचिन वाझे यांना मुंबईतील वांद्रे परिसरात मिठी नदीजवळ घेऊन गेले. वाझे यांनी या प्रकरणाचे महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याचा NIA ला संशय आहे. हे पुरावे गोळा करण्यासाठी NIA ने मिठी नदीच्या पात्रात शोधमोहीम राबवली.

एनआयएच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मिठी नदी पात्रातून 2 सीपीयू, लॅपटॉप, सीसीटीव्हीचा डीव्हीआर आणि एकच नंबर असलेल्या गाडीच्या दोन नंबरप्लेट्स जप्त करण्यात आल्या आहेत.

वाझे यांनी त्यांच्या सोसायटीतील सीसीटीव्ही डीव्हीआर नष्ट करण्यासाठी मिठी नदीत फेकून दिल्याचा NIA ला संशय आहे.

तपास अधिकारी पुढे सांगतात, "मनसुख हिरेन यांची स्कॉर्पियो गाडी चोरी झाली नव्हती. ही गाडी 17 ते 24 फेब्रुवारी वाझे यांच्या सोसायटीमध्ये पार्क करण्यात आली होती. हे लपवण्यासाठी वाझे यांनी CCTV-DVR नष्ट करण्याचा प्रयत्न केला."

वाझे यांनी मनसुख हिरेनची हत्या झाल्यानंतर आपल्याकडील पाच मोबाईल नष्ट केल्याची माहिती दिली आहे.

मनसुख यांनी गाडी चौरी झाल्याची तक्रार दाखल केली होती.

रेतीबंदर परिसरात वाझे यांची चौकशी

गुरुवारी (25 मार्च) NIA ने सचिन वाझे यांना मुंब्रा रेतीबंदर परिसरात नेलं. मुंब्रा रेतीबंदर परिसरातच 5 मार्चला मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आला होता. त्याआधी बुधवारी NIA ने मनसुख हत्याप्रकरणी एटीएसने अटक केलेल्या विनायक शिंदे आणि नरेश गोरचा ताबा घेतला होता.

वाझे यांना रेतीबंदर आणि घोडबंदरच्या गायमुख चौपाटी परिसरात नेण्यात आलं. सचिन वाझे मनसुख हिरेन हत्याप्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी आहेत. मनसुखच्या हत्येबाबत वाझे यांची चौकशी NIA कडून करण्यात येत आहे.

कोर्टात काय झालं?

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी वाझे यांना अटक करण्यात आली. वाझे यांची एनआयए कोठडी 25 तारखेला संपत होती.

मुकेश अंबानी स्फोटकं प्रकरणी एनआयएने वाझेंच्या विरोधात अवैध कारवाई प्रतिबंधक कायद्याची कलमं (UAPA) दाखल केली.

वाझे यांनी कोर्टाला "मला बळीचा बकरा" बनवलं जात असल्याचं सांगितलं.

एनआयएच्या वतीने अतिरिक्त सॉलीसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला. वाझे यांच्याघरातून 62 बुलेट्स जप्त केल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं. पोलीस विभागाने वाझे यांना दिलेल्या 30 पैकी फक्त 5 बुलेट्स मिळाल्या आहेत असं ते पुढे म्हणाले.

मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या विनायक शिंदे आणि नरेश गोर यांच्यासोबत वाझे यांची चौकशी गरजेची असल्याचं NIA ने कोर्टात सांगितंल.

कोर्टाने वाझे यांची 3 एप्रिलपर्यंत NIA कोठडीत रवानगी केली.

महाराष्ट्र ATSचा तपास

मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास NIA कडे जाण्याआधी महाराष्ट्र ATS कडे होता.

महाराष्ट्र ATS ने 21 मार्चला मनसुख हिरेन हत्याप्रकरणी निलंबित पोलीस कर्मचारी विनायक शिंदे आणि बुकी नरेश गोरला अटक केली.

विनायक शिंदेने मनसुखची हत्या केल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा, एटीएस प्रमुख जयजीत सिंह यांनी केला. मनसुख यांच्या हत्येवेळी विनायक शिंदे आणि नरेश गोर रेतीबंदर परिसरातच उपस्थित होते, अशी माहिती एटीएसने दिली होती.

मनसुख बेपत्ता होण्याआधी त्यांना विनायक शिंदेने फोन करून घोडबंदर परिसरात बोलावलं होतं असं एटीएसने सांगितलं. तर, मनसुख यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली संशयास्पद निळ्या रंगाची गाडी गुजरातमधून जप्त करण्यात आली.

नरेश गोरने बनावट नावांवर खरेदी केलेल्या 14 सिम कार्डपैकी 5 सिमकार्ड विनायक शिंदेला देण्यात आले असल्याची माहिती चौकशीत उघड झाली.

सचिन वाझे या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी आहेत असा दावा एटीएसने केला होता.

विनायक शिंदे यांना 2007 च्या लखन भय्या एन्काउंटर प्रकरणी कोर्टाने दोषी ठरवलं आहे. ते पॅरोलवर बाहेर आले होते.

अंबानींच्या घराबाहेर वाझेंची परेड

सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर 19 मार्चला NIA ने वाझे यांना मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर नेलं.

अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीन असलेली गाडी ठेवल्यानंतर सीसीटीव्हीत पीपीई कीट घातलेला व्यक्ती संशयास्पदरित्या आढळून आला. याच व्यक्तीने स्कॉर्पियो गाडी ठेवली असा संशय तपास अधिकाऱ्यांना होता.

हा व्यक्ती सचिन वाझे आहे, असा संशय NIA ला होता. त्यामुळे NIA ने वाझे यांना पीपीई कीट घालून अंबानींच्या घराबाहेर त्यांची परेड केली. वाझे यांची देहबोली सीसीटीव्हीत पीपीई कीट घातलेल्या व्यक्तीसारखी आहे का? हे NIA ला जाणून घ्यायचं होतं.

मुकेश अंबानींच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला नेमकं काय झालं होतं? याचा शोध घेण्यासाठी NIA ने क्राइम सीनचं रिक्रिएशन (नाट्यरुपांकरण) केलं.

वाझेंच्या कार्यालयाची झाडाझडती

सचिन वाझे मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख होते. त्यांच्या अटकेनंतर 17 मार्चला NIA ने CIU कार्यालयाची झाडाझडती घेतली.

वाझे यांच्या युनिटमधील 7 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. वाझेंसोबत काम करणारे API रियाझुद्दीन सिद्धीकी यांची कसून चौकशी करण्यात आली.

मोबाईल फोन, कागदपत्र, लॅपटॉप वाझे वापरत असलेला I-Pad एनआयएने जप्त केला.

जप्त करण्यात आलेल्या 5 गाड्या

सचिन वाझे यांच्या अटकेनंतर NIA ने आत्तापर्यंत पाच गाड्या जप्त केल्या आहेत. यात दोन मर्सिडीज, एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा आणि निळ्या रंगाची गाडी आणि एक टोयोटा लॅंड क्रूझर आहे.

मर्सिडीज

NIA चे पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांच्या माहितीनुसार, सचिन वाझे काळ्या रंगाची मर्सिडीज वापरत होते. या गाडीत 5 लाख रूपये कॅश, नोट मोजण्याचं मिशन काही कपडे आणि नंबर प्लेट्स जप्त करण्यात आल्या.

ही गाडी सीएसटी परिसरातून जप्त करण्यात आली होती.

इनोव्हा

अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला स्कॉर्पियो पार्क करण्यात आली. या स्कॉर्पियोला एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी फॉलो करत होती. ही गाडी एनआयएने जप्त केली. गाडी मुंबई क्राइमब्रांचची असून सचिन वाझे वापर होते हे तपासात स्पष्ट झालं.

ही गाडी 24 फेब्रुवारीला मुंबई पोलीस मुख्यालयातून बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेरात दिसून आली होती.

व्हॉल्वो

नरेश गोर आणि विनायक शिंदेच्या अटकेनंतर एटीएसने गुजरातहून एक निळ्या रंगाची गाडी जप्त केली. एटीएसला संशय आहे की याच गाडीत मनसुख यांना 4 मार्चला घेऊन जाण्यात आलं.

या गाडीतच मनसुख यांना बेशुद्ध करून त्यांची हत्या केल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. त्यामुळे गाडी फॉरेंन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.

एक मर्सिडीज आणि लॅंड क्रूझरबाबत तपास अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली नाही.

परमबीर सिंह यांची बदली

सचिन वाझे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना थेट रिपोर्ट करत होते.

आपल्या हाताखाली असलेला अधिकारी काय करतो हे पोलीस आयुक्तांना कसं माहित नाही? असा प्रश्न उपस्थित झाला.

त्यानंतर 17 मार्चला राज्य सरकारने परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी "पोलीस अधिकाऱ्यांकडून अक्षम्य चुका झाल्या. सिंह यांची बदली रुटीन नव्हती," असं वक्तव्य केलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)