शरद पवार-अमित शाह यांच्या कथित भेटीमुळे राज्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा

सगळ्या गोष्टी जाहीरपणे सांगण्यासाठी नसतात असं सूचक वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांच्यात अहमदाबाद येथे गुप्त बैठक झाल्याची बातमी दैनिक दिव्य भास्करने प्रकाशित केली होती.

अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर त्यांच्यात भेट झाल्याची चर्चा होती.

शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. ते कोणालाही भेटले नाहीत. मात्र, आता एका गुजराती दैनिकात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या कथित भेटीचा नेमका अर्थ काय यासंदर्भात बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित यांनी केलेलं विश्लेषण तुम्ही इथे पाहू शकता.

"देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट झाल्याचं गुजराती वृत्तपत्रात छापून आलं. राष्ट्रवादी काँग्रेसने अशी भेट झाल्याचं नाकारलं आहे. मात्र अमित शहांनी या वृत्ताचा इन्कार केला नाही. सगळ्या राजकीय गोष्टी सार्वजनिक चर्चेसाठी नसतात असं सूचक वक्तव्य अमित शहा यांनी केलं. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये बैठक झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही", असं बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, "सर्व पक्षाचे राजकीय नेते एकमेकांना भेटत असतात. शरद पवार आणि अमित शहा यांच्या कथित बैठकीला महत्त्व प्राप्त होतं कारण 2014नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे. 2014मध्ये विधानसभा निवडणुकांनंतर भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आला होता. त्यावेळी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देऊ केला होता.

2019 मध्ये महाविकास आघाडीची निर्मिती होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेबरोबर चर्चा करत होती. दुसरीकडे भाजपबरोबरही त्यांची चर्चा सुरू होती. अजित पवारांचा गट देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करत होता. ही चर्चा शरद पवार यांच्या आशिर्वादाने होत होती की नाही यासंदर्भात वेगवेगळ्या थिअरीज मांडण्यात आल्या. पण एक नक्की की राष्ट्रवादीचा एक गट त्यावेळी भाजपबरोबर चर्चा करत होता".

ही पार्श्वभूमी पाहता, शरद पवारांची गोपनीय बैठक अमित शहांबरोबर होत असेल तर त्याला राजकीय महत्त्व आहे असं दीक्षित म्हणाले.

"या बैठकीच्या बातमीमुळे नक्कीच शिवसेना आणि काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते. काँग्रेसचे अनेक नेते शरद पवारांकडे संशयाने बघत होते. आता अधिक संशयाने बघतील.

"महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून त्याच्या स्थिरतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत. कथित बैठकीच्या बातमीनंतर शिवसेना आणि काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीकडे अधिक संशयाने पाहू लागतील. नेमकी ही बातमी छापून आली त्याचवेळी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनात संजय राऊत यांच्या सदरातून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका करण्यात आली. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमधलं अंतर वाढतंय. त्यांचे नेते एकमेकांवर आरोप करत आहेत आणि दुसरीकडे ही भेट झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे शरद पवार या भेटीबद्दल काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे", असं दीक्षित यांनी सांगितलं.

पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी टाकलेला लेटरबॉम्ब यांच्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे.

राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाला दररोज नवे वळण मिळते आहे. याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्तांची बदलीही करण्यात आली. परमबीर सिंह या माजी पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुखांवर यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

महाविकास आघााडीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांना साथीला घेत सरकार स्थापन केले होतं. मात्र अपेक्षित संख्याबळ सिद्ध करता न आल्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडलं होतं.

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांच्यात भेट झालेली आहे. पवारांनी मोदी यांना बारामती इथे कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं. दिल्लीत या दोघांची भेट झाली आहे. मात्र शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाल्याचं पहिल्यांदाच चर्चेत येतं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)