You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना 2020 या वर्षीचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले.
आज (25 मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते.
निवडीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आशा भोसले यांचं अभिनंदन केले.
आशा भोसले यांनी 20 हून अधिक भारतीय भाषांमधील 11 हजारहून अधिक गाणी गायली आहेत. 1943 सालापासून त्या गायन क्षेत्रात कार्यरत आहेत.
आशा भोसले यांचा अल्पपरिचय
आशा भोसले यांचा जन्म 1933 साली झाला. आशा भोसले यांनी 2020 मध्ये वयाची 87 वर्षं पूर्ण केली.
संगीत आणि नाटकाचा वारसा असलेल्या आशा भोसले यांनी लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. मिळालेल्या माहितीनुसार आशा भोसले यांची कारकीर्द सुरू झाली 1943 साली. त्यानंतर 1948 मध्ये त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.
आशा भोसले यांनी बॉलीवूडमध्ये सात दशकं अधिराज्य गाजवलंय. बॉलीवूडध्ये तब्बल 1000 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी प्ले-बॅक सिंगर म्हणून आवाज दिला आहे. बॉलीवूडमध्ये आशाताईंना 'मेलडी क्वीन' म्हणून ओळखलं जातं.
आशा ताईंनी आत्तापर्यंत 11,000 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. आशा भोसले, 1943 पासून या क्षेत्रात आहेत. ज्यात त्यांनी 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी म्हटली आहेत.
विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायल्यामुळे 2011 साली आशा भोसले यांचं गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं.
आशा भोसले यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तेलगू, तामिळ, इंग्रजी अशा भाषेत गाणी गायली आहेत.
भोसले यांना 18 वेळा फिल्मफेअरसाठी नामांकन मिळालं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)