सचिन वाझे-परमबीर सिंह: पोलीस-राजकारणी संघर्षात पोलिसांच्या मनोधैर्यावर काय परिणाम होतो?

    • Author, रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

शनिवारी 20 मार्चला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकला. त्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. सचिन वाझे यांना प्रत्येक महिन्यात 100 कोटी गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप त्यांनी केला आणि एकच खळबळ उडाली. त्यावरून आता राजकारण तापलंय.

आरोप प्रत्यारोपांची राळ उठलीय. हा वणवा पेटतोच आहे तोच ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग करून बदल्यांमध्ये घोटाळा होत असल्याच्या माहितीने आगीत तेल ओतले गेले. या सगळ्या प्रकारामुळे महाराष्ट्रातील पोलीस दल ढवळून निघालं आहे. पोलिसांच्या प्रतिमेवर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 100 कोटी या आकड्यावर विनोद, मीम्सचा पाऊस पडला आहे.

निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यावर मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवण्याच्या आरोपाखाली झालेली अटक आणि त्यापासून सुरू झालेलं हे प्रकरण रोज नवीन वळणं घेत आहे. या सगळ्याचा पोलीस दलाच्या मनोधैर्यावर किती परिणाम होतो याचा आढावा आम्ही घेतला.

'संपूर्ण पोलीस दलाला धक्का'

निवृत्त पोलीस अधिकारी सुरेश खोपडे पोलिसांच्या प्रश्नांवर सतत सक्रिय असतात. या विषयावर बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "सुरुवातीला मला असं वाटत होतं की हे सगळं एका मंत्री आणि एपीआय पर्यंत मर्यादित आहे असं मला वाटत होतं. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा धक्का पोलीस दलाला बसला आहे असं माझ्या पाहण्यात आलं आहे. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या भागात काम केलं आहे. त्यामुळे मला अनेक अधिकाऱ्यांचे सतत फोन येत असतात. त्यांच्यात प्रचंड चीड आहे."

"सचिन वाझे प्रकरणामुळे पोलीस चिडलेले आहेतच मात्र परमबीर सिंह यांच्या पत्रामुळेही लोकांच्या मनात प्रचंड चीड आहे. पोलीस दलात दोष आहे हे पोलीसही मान्य करतात. मात्र ते दोष कोण दाखवतंय हेही तितकंच महत्त्वाचं आहे," खोपडे सांगतात.

खोपडे पुढे सांगतात, "परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांच्याबद्दल पोलीस दलातच अद्वातद्वा बोललं जातं. आता परमबीर सिंह कोर्टात गेले आहेत. कोर्टात गेलं की बाजू भक्कम असेल असा सामान्य लोकांचा समज असतो. मात्र परमबीर सिंह याची बाजू पडकी आहे याची पोलिसांना जाणीव आहे.

"या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या सुख-दु:खाचं कारण पोलीसच आहेत असं सामान्य लोकांना वाटतं. पोलीस भ्रष्ट आहेत, शासन भ्रष्ट आहेत असंच लोकांना वाटतं. त्यामुळे पोलिसी कारवाया लोकांना आवडत नाही. सामान्य लोकांच्या कल्याणासाठी घातलेली बंधनं लोकांना आवडत नाहीत. यामुळे साहजिकच पोलिसांचं मनोधैर्य ढासळतं. त्यांचे कुटुंबीयही त्यांना प्रश्न विचारतात," खोपडे सांगतात.

निवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्यामते पोलीस खात्यातला भ्रष्टाचार हे काही आजचं प्रकरण नाही. त्यांच्या मते पोलीस दलात कोण प्रामाणिक आहे, कोण भ्रष्ट आहे हे सगळ्यांना माहिती असतं. सध्या जी वादळं येताना दिसत आहेत ती येत असतातच.

बोरवणकर पुढे सांगतात की, "काही दिवस त्याची चर्चा होते आणि मग पुन्हा पोलीस आपापल्या कामाला लागतात. अशा प्रकरणांमुळे वरिष्ठांबद्दल असलेल्या आदराला तडा नक्कीच जातो मात्र जे अधिकारी प्रामाणिक असतात ते कायम सकारात्मक उर्जा त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना देत राहतात. याचा परिणाम असा होतो की बरेचदा कनिष्ठ अधिकारी अगदी कोणत्याही थरापर्यंत जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना साथ देऊन मनोधैर्य टिकवण्यात मदत करतात".

निवृत्त पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो धडाडीने पोलीस अधिकाऱ्यांची बाजू मांडतात. सध्याच्या प्रकरणातही त्यांनी काही लेख लिहिलेत. त्यात एन्काऊंटर स्पेशालिस्ट या शब्दावरच ताशेरे ओढले. परमबीर सिंह यांच्यावरही त्यांनी अनेकदा टीका केली. शरद पवार यांनी ज्युलिओ रिबेरो यांनीच या प्रकरणाची चौकशी करावी अशी सूचनाही केली रिबेरोंनी त्याला नकार दिला.

द प्रिंट साठी लिहिलेल्या लेखात ते म्हणतात, "मुंबई पोलीस उत्कृष्टच होते. अजूनही आहेत. जेव्हा त्यांना योग्य नेतृत्व मिळालंय तेव्हा त्यांनी आपली चमक दाखविली आहे. शेवटी नेतृत्व कोण करतंय यावर सगळं अवलंबून आहे. जेव्हा जेव्हा चुकीचं नेतृत्व लाभतं तेव्हा घसरण व्हायला सुरुवात होते. त्यावेळी सुमार अधिकारी आनंदात असतं. मात्र प्रामाणिक अधिकाऱ्यांचा गोंधळ उडतो. त्यांना कोणत्या दिशेने जावं हेच कळत नाही. भ्रष्टाचार शिगेला पोहोचतो. बेशिस्तपणा वाढतो. ही परिस्थिती वारंवार उद्बवत नाही. कारण मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर सरकारचं अस्तित्व अवलंबून आहे याची राजकारण्यांना जाणीव आहे."

याविषयावर पुणे पोलिसातील एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर बीबीसी मराठीकडे आपलं मत मांडलं. ते म्हणतात, "या सर्व प्रकरणामुळे पोलिसांकडे सामान्य नागरिकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. यामुळे सगळ्याच पोलिसांकडे अशाच नजरेनं पाहिलं जातं. परंतु या सगळ्याचा आमच्या रोजच्या कामावर विशेष परिणाम होत नाही. पोलिसांवर असे जेव्हा आरोप होतात त्यात ते गुंतले असल्याचं समोर येतं तेव्हा दुःख होतं. पोलिसांची प्रतिमा मलिन होते. ज्येष्ठ पोलीस अधिकारी आमचे आदर्श असतात त्यांच्यावर असे गंभीर आरोप होत असतील तर आम्ही कोणाकडे बघायचं?"

मग यावर उपाय काय?

मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे काही दिवसांपूर्वी नागपुरात बोलत होते. त्यांच्या मते भ्रष्टाचार हा व्यवस्थेचा भाग आहे. त्यांचं हे मत धक्कादायक असलं तरी हे वास्तव असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांच्या बोलण्यातून जाणवतं. मात्र सगळेच पोलीस अधिकारी तसे नसतात. संपूर्ण व्यवस्था भ्रष्ट नाही.

सुरेश खोपडे यांच्या मते, "परमबीर सिंह, रश्मी शुक्ला किंवा सचिन वाझे हे अधिकारी म्हणजे संपूर्ण पोलीस दल नाही. पोलिसांमध्ये काही चांगले अधिकारी आहेत. त्यांचा आदर्श पोलिसांनी ठेवायला हवा. गेल्या काही दिवसात एक मनसुख हिरण प्रकरणात एक शिपाई पकडला गेला. तो शिपाई म्हणजे पोलीस दलाचं खरं चित्र नाही. पोलिसांचं मनोधैर्य वाढवायला आम्ही त्यांना त्यांच्या पुढ्यात असलेल्या इतर कर्तव्याची जाणीव करून देतो. कोरोना, इतर गुन्हेगारी, सामान्य माणसांचं रक्षण हेही पोलिसांचं कर्तव्य आहे. त्या कामाची जाणीवही आम्ही करून देतो".

सरतेशेवटी सुरेश खोपडे एका जुन्या गोष्टीची जाणीव करून देतात. ते सांगतात, "एकदा अकबर बिरबलासमोर एक छोटी रेष आखतो. तिला हातही न लावता ती छोटी करायचं आव्हान देतो. बिरबल त्या रेषेच्या बाजूला मोठी रेघ आखतो आणि ती रेघ आपोआप छोटी होते. सध्या पोलीस दलाने अशीच चांगुलपणाची मोठी रेघ आखावी".

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)