सचिन वाझे NIA कोर्टात म्हणतात, 'मी बळीचा बकरा, गुन्ह्याची कबुली दिली नाहीय'

'मला बळीचा बकरा बनवण्यात आलाय,' असा युक्तिवाद सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) विशेष कोर्टात केला.

तसंच, सचिन वाझे म्हणाले, "मी या प्रकरणाचा केवळ दीड दिवस तपास अधिकारी होतो. जसा तपास करायला हवा, तसाच केला. केवळ मीच नाही, तर क्राईम ब्रांच आणि मुंबई पोलिसही याचा तपास करत होते."

सचिन वाझे यांना NIA च्या विशेष कोर्टानं 3 एप्रिल 2021 पर्यंत NIA ची कोठडी सुनावली आहे. NIA कडून वाझेंना आज (25 मार्च) विशेष कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं.

सचिन वाझे प्रकरणी कोर्टात काय झालं?

सुनावणी सुरू झाल्यानंतर NIA चे वकील अनिल सिंह यांनी कोर्टाला सांगितलं, "सचिन वाझे यांचा गुन्हा देशपातळीवरील मोठा गुन्हा आहे. एकाद्या पोलिसाचा अशा गुन्ह्यात सहभाग शरमेची गोष्ट आहे."

त्यावर युक्तिवाद करताना सचिन वाझे यांचे वकील आबाद फोंडा म्हणाले, "केवळ जिलेटीनच्या कांड्या ठेवल्याने स्फोट होत नाही. त्यासोबत डिटोनेटर असला तर ते स्फोटक मानलं जातं. गाडीत किंवा सचिन वाझेंकडून डिटोनेटर मिळालेलं नाही."

बचावपक्षाचा हा दावा हास्यास्पद असल्याचं NIA च्या वकीलांना कोर्टासमोर मांडलं.

सुनावणी दरम्यान काय म्हणाले वाझे?

पोलीस कोठडीबाबत सुनावणी सुरू असताना सचिन वाझे यांनी कोर्टाकडे काही सांगण्याची विनंती केली.

वाझे कोर्टाला म्हणाले, "मला बळीचा बकरा बनवलं जातंय. मी केवळ या प्रकरणाचा तपास अधिकारी होतो. अचानक मला सांगितलं, तुझ्याविरोधात पुरावे आहेत. आम्ही तुला अटक करतोय."

"जी चौकशी करायची होती ती करून झाली आहे. आता आणखी NIA कोठडी देऊ नका" अशी विनंती वाझे यांनी कोर्टाकडे केली.

"त्याचसोबत मला आणखी काही गोष्टी सांगायच्या आहेत," असं वाझे कोर्टाला म्हणाले. त्यावर कोर्टाने "तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते लिहून द्या" अशी सूचना केली.

"मी कोणत्याही गुन्ह्याची कबूली दिलेली नाही," असं वाझे कोर्टात म्हणाले.

सचिन वाझेंवर UAPA कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंवर बेकायदा कारवाई प्रतिबंधक (UAPA) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास NIA कडे वर्ग करण्यात यावा असा आदेश ठाणे न्यायालयाने दिला आहे. मुकेश अंबानी यांच्याघराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास NIA कडेच आहे. ठाणे न्यायालयाच्या आदेशानंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपासही NIA कडे गेला आहे.

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात झालेल्या तपासाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) काल (23 मार्च) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला.

मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेंनी पॅरोलवर बाहेर असलेल्या निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचा वापर केल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाने दिली आहे.

मनसुख हिरेन हत्याप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रमुख हे संशयित आरोपी आहेत. महाराष्ट्र ATS ने ही माहिती दिलीये.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी वाझे सद्या NIA च्या कोठडीत आहेत. 25 मार्चला NIA ची कोठडी संपणार आहे.

"मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझेंच्या चौकशीसाठी ATS ने NIA कोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती," महाराष्ट्र ATS प्रमुख जयजीत सिंह यांनी दिली.

हिरेन यांच्या हत्येप्रकरणी मुंबई ATS ने निलंबित पोलीस कर्मचारी विनायक शिंदे आणि बुकी नरेश गोरला अटक केलीये. कोर्टाने दोन्ही आरोपींना 31 मार्च पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

काय म्हणाले ATS प्रमुख?

बुधवारी महाराष्ट्र ATS ने मनसुख हिरेन हत्याप्रकरणी तपासाची माहिती दिली. मनसुख हिरेन यांच्या प्रत्नीच्या तक्रारीनंतर ATS ने हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

महाराष्ट्र ATS प्रमुख जयजीत सिंह म्हणाले, "विनायक शिंदे यांनी मनसुख हिरेनला फोन करून बोलावलं होतं. त्याने हिरेनचा खून केला. याचे पुरावे मिळाले आहेत."

ATS अधिकारी माहिती देतात, मनसुख हिरेनच्या हत्येवेळी शिंदे रेतीबंदर परिसरात उपस्थित होते.

विनायक शिंदेला 2007 मध्ये लखन भय्या फेक एन्काउंटर प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. कोरोना काळात शिंदे पॅरोलवर बाहेर होता. एटीएसचे अधिकारी सांगतात, शिंदे पेरोलवर बाहेर आल्यापासून वाझे यांच्यासाठी काम करत होता.

ATS ने विनायक शिंदे आणि नरेश गोर याला हत्येच्या ठिकाणी नेऊन हत्या कशी केली याचं रिक्रिएशन करून घेतलंय. एटीएसने तपासात अनेक सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत.

"आरोपींनी काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले आहेत," अशी माहिती ATS प्रमुख जयजीत सिंह यांनी दिलीये.

ATS अधिकारी सांगतात, नरेश गोरने 14 सामकार्ड गुजरातहून आणले होते. यापैकी 5 सामकार्ड विनायक शिंदे यांना देण्यात आले होते.

'वाझे खोटं बोलले'- दशतवाद विरोधी पथक

ATS चे अधिकारी सांगतात, "मनसुख हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाझे यांची चौकशी करण्यात आली. सचिन वाझे यांनी आपल्यावर असलेले सर्व आरोप फेटाळून लावले. गाडी मी वापरत नव्हतो असं वाझे यांनी म्हटलं होतं."

एटीएस प्रमुख सांगतात, "वाझे खोटं बोलले यांचे पुरावे मिळाले आहेत. या हत्या प्रकरणात वाझे यांचा सहभाग काय? याचा तपास सुरू आहे."

हत्येमध्ये वापरण्यात आलेली गाडी जप्त ?

बुधवारी ATS च्या अधिकार्यानी दीव-दमणहून एक गाडी जप्त केली आहे.

"ही गाडी तपासणीसाठी फोरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली आहे. ही गाडी खून करण्यासाठी वापरण्यात आली का नाही याची चौकशी करत असल्याचं, " अतिरिक्त पोलीस महासंचालक जयजीत सिंह म्हणाले.

ते पुढे म्हणाले "या गुन्ह्यांत येत्या काळात आणखी लोक अटक करण्याची शक्यता आहे."

ATS अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काही साक्षीदारांचा न्यायाधीशांपुढे जबाब नोंदवण्यात येणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)