परमबीर सिंह: DGP संजय पांडेंच उद्धव ठाकरेंना पत्र : 'मी खरंतर पोलीस दलाचं नेतृत्व केलं पाहिजे, मला का डावललं?'

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

"माझ्या विरोधात अन्याय झालाय. माझं करिअर रोखण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. हे सर्व लिहिताना मला खूप वेदना होत आहेत. माझ्यावर झालेला अन्याय दूर करा."

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे हे गाऱ्हाणं घातलंय वरिष्ठ IPS अधिकारी संजय पांडे यांनी. उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे.

पोलीस महासंचालक (DGP) रॅंकचे संजय पांडे सद्यस्थितीत राज्यातील सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहेत.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली असं पत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच सचिन वाझे प्रकरणी परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आली होती.

दरम्यान, 'मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी यांचा सहभाग स्पष्ट हेत असताना त्याचे धागेदोरे परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहचणार असल्याचं तपासातून स्पष्ट होत असताना परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी आणि कारवाईपासून वाचण्यासाठी खोटा आरोप केला आहे', अशी अनिल देशमुख यांनी आपली बाजू ट्वीटरवर मांडली आहे.

संजय पांडे यांनी लिहीलेल्या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालय, गृहविभाग किंवा गृहमंत्र्यांकडून अजूनही प्रतिक्रिया मिळालेली नाही.

सचिन वाझे प्रकरणी उद्धव ठाकरे सरकार अडचणीत असताना. वरिष्ठ IPS अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सरकार समोरच्या अडचणीत संपता संपत नाहीयेत.

पांडे यांच्या नाराजीचं कारण?

सचिन वाझे प्रकरणी बुधवारी राज्य सरकारने मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची तडकाफडकी बदली केली. परमबीर यांच्यासोबत तीन वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

होमगार्डचे डीजीपी असलेल्या संजय पांडेंची बदली सरकारने महाराष्ट्र स्टेट सिक्युरीटी कॉरपोरेशनला केली. पोलीस दलात ही साइड पोस्ट मानली जाते. त्यामुळे संजय पांडे नाराज झाले.

"माझ्यावर घोर अन्याय झालाय," अशी प्रतिक्रिया संजय पांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केली.

ज्येष्ठ अधिकारी कोण आहेत?

संजय पांडे 1986 IPS अधिकारी आहेत. मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे 1987 बॅचचे तर पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्विकारणारे डीजीपी रजनिश सेठ 1988 बॅचचे IPS अधिकारी आहेत

बीबीसीशी बोलताना संजय पांडे म्हणतात, "राज्यातील सर्वांत ज्येष्ठ IPS अधिकारी असूनही माझ्यावर अन्याय होतोय."

इतर अधिकाऱ्यांपेक्षा सिनिअर असूनही त्यांच्या ज्युनिअर अधिकाऱ्यांची पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालकपदी नेमणूक केल्याने पांडे नाराज आहेत.

उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात काय म्हणतात संजय पांडे?

सरकारच्या निर्णयावर नाराज पांडेंनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीलं. या पत्रात पांडे यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचून दाखवला.

  • राज्याच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करताना तुम्ही माझा विचार केला नाही. ही पोस्ट माझ्यापेक्षा ज्युनिअर अधिकाऱ्याला देण्यात आली.
  • मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी माझा विचार न करता. पुन्हा ज्युनिअर अधिकाऱ्याला या पदावर बसवण्यात आलं.
  • सुबोध जयस्वाल यांची जागा रिक्त झाल्यानंतर पुन्हा मला डावललं गेलं. अतिरिक्त कार्यभार एका ज्युनिअर अधिकाऱ्याला देण्यात आला.
  • स्फोटकं प्रकरणानंतर पुन्हा एकदा मला डावलून मला ज्युनिअर असलेल्या अधिकाऱ्याला हा चार्ज देण्यात आला.

काय म्हणतं सरकार?

संजय पांडे यांनी लिहीलेल्या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालय, गृहविभाग किंवा गृहमंत्र्यांकडून अजूनही प्रतिक्रिया मिळालेली नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक म्हणतात, "सरकार ज्यांना योग्य समजते त्यांच्याबद्दल तसा निर्णय घेतला जातो."

'मी खरंतर पोलीस दलाचं नेतृत्व केलं पाहिजे'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहीलेल्या पत्राबाबत आम्ही संजय पांडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

ते म्हणतात, "मी खरंतर पोलीस दलाचं नेतृत्व केलं पाहिजे,"

"आता सर्व गोष्टी सहन करण्यापलिकडे आहेत. त्यामुळे दाद मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं," असं संजय पांडे पुढे म्हणतात.

मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात ते म्हणतात, "माझा रेकॉर्ड चांगला नसता, तर मला चांगली पोस्ट न देण्याप्रकरणी समजू शकलो असतो. पण, माझ्याविरोधात आरोप नाही. माझा रेकॉर्ड चांगला असूनही माझा विचार केला जात नाही."

"सेवा ज्येष्ठतेप्रमाणे मला पोस्टिंग मिळालं पाहिजे होतं. पण, ज्या ठिकाणी पाठवण्यात आलंय. ते कॉरपोरेशन अनेक राज्यांमध्ये अस्तित्वात नाही," असं संजय पांडे पुढे म्हणाले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप

मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात संजय पांडे यांनी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांवर आरोप केले आहेत.

"सरकारने एका वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी करण्यास सांगितली. मी चौकशी पूर्ण केली. पण, ही चौकशी करताना तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांनी खूप अडथळे आणण्याचा प्रयत्न केला," असं पांडे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

विरोधकांची टीका

सचिन वाझे प्रकरणावरून बॅकफूटवर गेलेल्या उद्धव ठाकरे सरकारवर टीका करण्याची आणखी एक संधी विरोधी पक्षाला या प्रकरणामुळे मिळाली.

संजय पांडे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिल्याची माहिती समोर येताच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्वीट करून याबाबत प्रतिक्रिया दिली.

संजय पांडे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून पोलीस दलातील खदखद दिसून येते. सेवा ज्येष्ठता डावलून नियमबाह्य केलेल्या बदल्यांची चौकशी होणे आवश्यक आहे, असं दरेकर म्हणाले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)