अझानमुळे डोकेदुखीचा त्रास होत असल्याची विद्यापीठाच्या कुलगुरूंची तक्रार

रोज सकाळी साधारण साडेपाच वाजता अझान होते. लाऊडस्पीकरवरून होणाऱ्या अझानमुळे झोपमोड होते. त्यानंतर प्रयत्न करूनही झोप येत नाही. त्यामुळे दिवसभर डोकेदुखीचा त्रास होतो. याचा परिणाम रोजच्या कामावरही होतो अशी तक्रार अलाहाबाद विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. संगीता श्रीवास्तव यांनी जिल्हाधिकारी भानू चंद्र गोस्वामी यांना पत्र देऊन केली आहे.

काही दिवसांपूर्वी गायक सोनू निगम यानेही अझानमुळे झोपमोड होते असं म्हटलं होतं. काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेता आरोह वेलणकरने याने यासंदर्भात फेसबुक लाईव्ह केलं होतं. आम्ही कोणत्याही धर्माच्या, प्रार्थनेच्या विरुद्ध नाही पण लाऊड स्पीकरवरून प्रार्थना कशाला? असा त्यांचा सूर होता.

कुलगुरू श्रीवास्तव यांनी अजानमुळे दैनंदिन झोपेत अडथळा येत असल्याचं म्हटलं आहे. याचा परिणाम कामावर होतो असंही त्यांनी म्हटलं आहे.

जिथे माझं नाक सुरू होतं तिथे तुमचं स्वातंत्र्य संपतं ही जुनी म्हणदेखील त्यांनी वापरली आहे. मी कोणत्याही धर्माच्या, जातीच्या विरोधात नाही. तुम्ही अजान लाऊड स्पीकरविनाही करू शकता. तसं झालं तर बाकीच्या नागरिकांची दिनचर्या प्रभावित होणार नाही असं कुलगुरू श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे.

ईदपूर्वी सहरीची घोषणा पहाटे चारपूर्वी होईल. त्यामुळे इतरांच्या त्रासात भर पडेल. राज्यघटनेत सर्व पंथनिरपेक्ष आणि शांततापूर्ण सौहार्दाची संकल्पना मांडण्यात आली आहे याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या जुन्या आदेशाच्या दाखल्याची प्रत त्यांनी पत्रासोबत जोडली आहे.

श्रीवास्तव यांच्याकडून पत्र मिळाल्याची माहिती डीआयजी सर्वश्रेष्ठ त्रिपाठी यांनी दिली. चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनीही नियमानुसार कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे.

दरम्यान अजानचा मुद्दा कर्नाटकताही गाजतो आहे. कर्नाटकात मशिदींमध्ये रात्री 10 ते पहाटे 6 लाऊडस्पीकर लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

कर्नाटकातही अझान चर्चेत

कर्नाटक राज्य वक्फ बोर्डाने दर्गा आणि मशिदींमध्ये लाऊडस्पीकर लावण्यास निर्बंध घालणारं परिपत्रक जारी केलं आहे.

दिवसा लाऊडस्पीकर लावताना लाऊडस्पीकरचा आवाज हा एअर क्वालिटीच्या मानकांनुसार असावा, त्यादृष्टीने खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यातली ध्वनी प्रदूषणाची समस्या रोखण्यासाठी कर्नाटक राज्य वक्फ बोर्डाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सलत, जुमा कुतबा, बयान आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांच्या दरम्यान मशिदीतील लाऊडस्पीकरचा उपयोग करण्यात यावा असं परिपत्रकात म्हटलं आहे.

मशिदीच्या जवळपास कानठळ्या बसवणारे फटाके फोडण्यासही बंदी घालण्यात आली आहे. मशिदीच्या आत मुअज्जिनच्या अम्प्लीफायरचा वापर करण्याचं प्रशिक्षण देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने अजानवर कोणतीही बंदी नसल्याचं पूर्वीच्या एका आदेशात म्हटलं होतं. अजान हे इस्लामचं धार्मिक अंग आहे. मात्र, लाऊडस्पीकरवरून अजान देणं हे इस्लामचं धार्मिक अंग नाही. त्यामुळे मुअज्जिन लाऊडस्पीकर शिवाय कोणत्याही मशिदीतून अजान देऊ शकतात, असं कोर्टाने म्हटलं होतं.

ध्वनी प्रदूषण मुक्त झोप ही माणसाच्या जीवनाचा मूलभूत अधिकार आहे. कोणीही आपल्या मूलभूत अधिकारासाठी दुसऱ्याचा मूलभूत अधिकार हिसकावून घेऊ शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं होतं. त्याचवेळी कोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांकडून या आदेशाचं पालन करून घेण्याचे निर्देशही कोर्टाने मुख्य सचिवांना दिले होते. त्याचवेळी कोर्टाने रात्री 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यास प्रशासन परवानगी देणार नाही असे आदेशही दिले होते.

लाऊडस्पीकरवरून अजान पढण्यावर घातलेली बंदी योग्य असल्याचं अलहाबाद कोर्टाने म्हटलं होतं. जेव्हा लाऊडस्पीकर नव्हते तेव्हाही मशिदीतून नमाज पढली जात होती. त्यामुळे लाऊडस्पीकरवरून अजान देण्यास बंदी घातल्याने संविधानाच्या अनुच्छेद 25नुसार धार्मिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होत नाही, असंही कोर्टाने म्हटलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)