शरद पवार म्हणतात, 'भाजपचा आसाम वगळता इतर राज्यात पराभव होईल'

फोटो स्रोत, Getty Images
"आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल, हा ट्रेंड असून पाच राज्यांचा हा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय.
बारामतीमध्ये आज (14 मार्च) ते पत्रकारांशी बोलत होते. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यातील निवडणुकांवर शरद पवार यांनी विधान केलं आहे.
ते म्हणाले, "पाच राज्यातील निवडणुकांवर आज सांगणे कठीण आहे पण लोक निर्णय घेत असतात. त्या राज्यांची स्थिती मला माहीत आहे. त्यामध्ये माझ्या दृष्टीने केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह डावे एकत्र आले आहेत. राज्यही त्यांच्या हातात आहे. त्यामुळे केरळमध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल यात शंका नाही."
"तामिळनाडूमध्ये आजची परिस्थिती लोकांच्या मनाचा कौल हा स्टॅलिन, डीएमके यांच्या बाजूने आहे. ते राज्याचं सूत्रं हातात घेतील. लोक त्यांना मोठ्या संख्येने पाठिंबा देतील," असा अंदाज शरद पवार यांनी व्यक्त केला.
'ममता बॅनर्जींचे सरकार येणार'
पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोपही पवारांनी केला आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, "तिथे एकटी भगिनी आपल्या राज्यातील लोकांसाठी संघर्ष करत आहे. राजकीय हल्ला करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. बंगालमधील लोक स्वाभिमानी आहेत. त्यांच्या बंगाली संस्कृती व बंगाली मनावर कुणी आघात करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण राज्य एकसंघ होते. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल."

फोटो स्रोत, Getty Images
पुढे ते म्हणाले, "आसाममध्ये भाजपाचे राज्य आहे. त्यांची तुलनात्मक स्थिती चांगली आहे. त्यामुळे हे एक राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल."
'संसद अस्वस्थ आहे'
दिल्लीच्या सीमेवर आजही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. नवीन कृषी कायदे मागे घेण्याची मागणीवर शेतकरी संघटना ठाम आहेत.
पण "शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारने सामंजस्यपणाची भूमिका घेतली नाही आणि संसद बंद पडली. दोन्ही सभागृह चालू शकली नाहीत. त्यामुळे सोमवारी (15 मार्च) काय होते हे पहावे लागेल," असंही शरद पवार म्हणाले.
ते पुढे सांगतात, "कृषी कायद्याच्या संदर्भातील प्रश्नांवर शेतकरी जसे अस्वस्थ आहेत तशीच संसदही अस्वस्थ आहे. त्यामुळे त्याची प्रतिक्रिया उद्या संसदेत उमटली तर चुकीचे ठरणार नाही."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








