उदयनराजे म्हणतात 'मराठा आरक्षण द्या...अन्यथा विष पिऊन मरू द्या...'

फोटो स्रोत, Getty Images
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. एक तर आरक्षण द्या अन्यथा विष पिऊन मरू द्या असं उदयनराजे भोसले म्हणाले.
"मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची मानसिकता दिसत नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. टंगळमंगळ करण्यासाठी बैठका घेतल्या जातात?" असं उदयनराजे म्हणाले.
राज्य सरकारला हा सवाल विचारलाय, भाजप नेते आणि राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी भूमिका मांडली.
" आरक्षण सरकारने गांभीर्याने घेतलं नाही, तर मराठा समाजातील तरुण वेगळं पाऊल उचलू शकतात. आम्हाला आरक्षण तरी द्या, अन्यथा विष पिऊन मरू द्या," असं भावनिक वक्तव्य त्यांनी केलंय.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विधिमंडळ अधिवेशनातही आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाची बाजू योग्य पद्धतीने मांडत नाही, असा आरोप विरोधकांनी केला. तर, कॅबिनेटमंत्री अशोक चव्हाणांनी, विरोधकांचे हे आरोप दिशाभूल करणारे आहेत, असा पलटवार केला.
काय म्हणाले खासदार उदयनराजे भोसले?
फेसबूक पोस्टमध्ये उदयनराजे पुढे म्हणतात, "मराठा समाजातील लाखो तरून निराशेच्या गर्तेत आहेत. आरक्षणाचा प्रश्न आता सुटला नाही तर तो कधीच सुटू शकत नाही. ही जाणीव मराठा समाजातील तरूणांना झाली आहे."
उदयनराजेंनी सत्ताधाऱ्यांवर आणि राजकारण्यांवर मराठा समाजाचा फक्त मतांसाठी वापर करण्याचा आरोप केलाय.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणतात, "राज्यात बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाचा वापर फक्त मतांसाठी करणाऱ्यांनी शेकडो वर्ष समाजाच्या प्रश्नांना झुलवत ठेवलं. मराठा समाजातील तरुणांना गृहित धरुन शेकडो वर्ष सत्तेच्या पदांवर बसणाऱ्यांनी आरक्षणाचा प्रश्न लोंबकळत ठेवला. इतर समाजाला आरक्षण देताना गांभीर्याने विधानं करणारे आणि कायदेशीर बाजू पुरेपुर लाऊन धरणारे सत्ताधारी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये मेखा मारून बसले आहेत."
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
"एकीकडे एसईबीसी पात्र उमेदवारांना ईडब्लूएस लागू करण्याचा निर्णय घ्यायचा आणि दुसरीकडे एसईबीसीच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात वेळकाढूपणा करायचा ही कसली नीती? मराठा समाजाने तुम्हाला एवढी वर्ष सत्ता दिली त्याचं तुम्ही असं पांग फेडत आहात?" असा प्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली होती.

फोटो स्रोत, @OfficeofUT
"बैठकांनंतर फॉलोअप होत नाही. केवळ वेळकाढूपणा सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याबाबत कोणतंही सुतोवाच होत नाही. याचा अर्थ तुम्हाला मराठा आरक्षण द्यायचं नाही. मराठा समाजातील मुलं-मुली फक्त राजकीय सभांना गर्दी करण्यासाठी हवे का? रस्त्यावर पक्षाचे झेंडे लावण्यासाठी हवे का?" हा प्रश्न फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उदयनराजेंनी विचारला आहे.
मराठा समाजातील मुलांना नोकरी मिळत नसल्याच्या मुद्यावरूनही त्यांनी सरकारला घेरलं आहे. "नोकऱ्यांविना तडफडणारे जीव तुम्हाला दिसत नाहीत. काबाडकष्ट करून, मेरीटमध्ये येऊन संधी उपलब्ध होत नसल्याने या तरूणांनी नक्षलवाद स्विकारला तर त्याला राज्यकर्ते म्हणून तुम्ही जबाबदार नाही का?"
या शब्दात खासदार उदयनराजेंनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत.
उदयनराजेंच्या भूमिकेवर काय म्हणाले अजित पवार?
उदयनराजेंच्या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, "कोणाला, काय धमकी द्यायची हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टात जे काही सांगितलं, त्यानंतर कोणाला काय म्हणणं मांडायचं तो अधिकार प्रत्येकाला आहे." अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

फोटो स्रोत, BBC/ SharadBadhe
"ते राज्यसभेचे सदस्य आहेत. आता केंद्रीय अधिवेशन सुरू आहे. ते तिथल्या-तिथे सुप्रीम कोर्टात गेले तर बरं होईल," असं अजित पवार म्हणाले.
राजकीय फायद्यासाठी लोकांना उसकवण्याचं चाललेलं काम चुकीचं- अशोक चव्हाण
राज्य विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

फोटो स्रोत, Twitter
मराठा आरक्षणाबाबत सुनावणीदरम्यान 8 मार्चला सुप्रीम कोर्टाने देशात आरक्षणावर 50 टक्क्यांच्या मर्यादेच्या मुद्यांसंदर्भात सर्व राज्यांना नोटीस जारी केली. तसंच 102व्या घटनादुरूस्तीसंदर्भात राज्यसरकारचं म्हणणं काय. हे सर्वोच्च न्यायालयाला जाणून घ्यायचं आहे.
यावर पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, "सुप्रीम कोर्टात केंद्राने अशी भूमिका मांडली की, 102वी घटनादुरूस्ती झाल्यानंतर राज्याला अधिकार नाहीत. अटॉर्नी जनरल यांनी हे विधान कोर्टात केलं. सुप्रीम कोर्टात जे घडलं त्याची माहिती देण्याचा मी प्रयत्न केला. मी चुकीची माहिती दिली नाही."
आमची भूमिका मराठा आरक्षण लागू झालं पाहिजे अशी आहे, असं ते म्हणाले.
विरोधकांवर हल्लाबोल करताना चव्हाण पुढे म्हणाले, "आमची भूमिका प्रामाणिक आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही. या मुद्यावर राजकारण करू नये अशी माझी विनंती आहे. राजकीय फायद्यासाठी लोकांना उसकवण्याचं चाललेलं काम चुकीचं आहे."
अशोक चव्हाण खोटं बोलले- देवेंद्र फडणवीस
मराठा आरक्षाबद्दल अशोक चव्हाण यांनी सभागृहात खोटं सांगितलं, असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
अॅटर्नी जनरल यांनी जे विधान केलं नाही, ते त्यांच्या तोंडी घालण्यात आलं, असं फडणवीस पुढे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, घटनेतील 102व्या दुरूस्तीने हा कायदा बाधित होत नाही.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)









