मोहन डेलकर आत्महत्येची SIT चौकशी होणार, कुटुंबीयांनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट

दादरा-नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी स्पेशल इनव्हेस्टिगेशन टीम (SIT) करणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी 9 मार्चला विधीमंडळात ही घोषणा केली.
दरम्यान, मोहन डेलकर यांच्या पत्नी आणि मुलाने विधीमंडळात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट घेऊन सुरक्षेची मागणी केली आहे.
खासदार मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारीला मुंबईतील मरीन ड्राइव्हवर असलेल्या सी-ग्रीन साउथ हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
काय म्हणाले गृहमंत्री
मंगळवारी 9 मार्चला मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला.
या मुद्याला उत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांनी डेलकर यांच्या स्यूसाईड नोटमध्ये नावं असलेल्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी निवेदन दिलं.
ते म्हणाले, "डेलकर यांनी स्यूसाईड नोटमध्ये दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा-पटेल यांचं नाव घेतलं आहे. काही अधिकाऱ्यांच्या दबावाखाली त्रास देण्यात येत होता. राजकीय जीवन संपवण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे मी आत्महत्या करतोय," असं त्यांनी स्यूसाईड नोटमध्ये लिहीलंय.
गृहमंत्री पुढे म्हणाले, प्रफुल्ल खेडा-पटेल हे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गृह राज्यमंत्री होते.
"आत्महत्या केल्यानंतर मला महाराष्ट्रातच न्याय मिळेल. माझा विश्वास आहे, उद्धव ठाकरे सरकारवर असं त्यांनी लिहीलंय. त्या खासदारांना टॉर्चर तिथे होतं. पण, आत्महत्या इथे येऊन करतात. किती विश्वास आहे महाराष्ट्रावर, सरकारवर," असं त्यांनी स्यूसाईड नोटमध्ये म्हटलंय.
डेलकर कुटुंबाची मुख्यमंत्र्यांशी भेट
दरम्यान मोहन डेलकर यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली.

फोटो स्रोत, Twitter
यावर बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, "डेलकर कुटुंबीयांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि माझी भेट घेतली. या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र पोलिसांनी करावी अशी त्यांनी मागणी केली आहे. आमच्या जीविताला धोका आहे असंही त्यांनी सांगितलं."
सरकारने पोलीस सुरक्षा देण्याची मागणी त्यांनी केल्याचं देशमुख पुढे म्हणाले.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोमवारी मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलताना वक्तव्य केलं होतं.
"डेलकर यांचं प्रकरण गंभीर आहे. पण, विरोधीपक्षाला बोलायला तोंड नाहीये. केंद्रशासित प्रदेश कोणाच्या अख्त्यारित येतो हे तुम्हाला माहीत आहे. सात वेळा खासदार असलेल्या व्यक्तीने मुंबईत आत्महत्या करावी हे तिथल्या प्रशासनासाठी लांछनास्पद आहे," असं सोमवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "स्यूसाईड नोटमध्ये नावं असलेल्यांची कसून चौकशी केली जाईल."
कोण आहेत प्रफुल्ल खेडा-पटेल?
प्रफुल्ल खेडा-पटेल दादरा-नगर हवेलीचे प्रशासक आहेत. त्यांची 2016 मध्ये प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
इंडियन एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, 2010-12 दरम्यान भाजपचे आमदार असलेले प्रफुल्ल खेडा-पटेल गुजरातचे गृह राज्यमंत्री होते.
गेल्यावर्षी 2020 मध्ये प्रफुल्ल पटेल हे दादरा-नगर हवेली, दमण आणि दिवचे पहिले प्रशासक बनले.
डेलकर यांची स्यूसाईड नोट
मुंबई पोलिसांना मोहन डेलकर यांच्या मृतदेहाजवळ एक स्यूसाईड नोट मिळाली होती.
गुजरातीमध्ये लिहीण्यात आलेल्या या 15 पांनांच्या स्यूसाईड नोटमध्ये दादरा-नगर हवेलीचे प्रशासक, पोलीस अधिकारी, जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसह अनेकांची नावं लिहीण्यात आली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)









