हाथरस : ‘तो सारखा तुमच्या मुलीला पळवून नेईल अशी धमकी द्यायचा आणि...’

    • Author, चिंकी सिन्हा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, हाथरसहून परतल्यानंतर

उत्तर प्रदेशातल्या हाथरस कथित बलात्कार प्रकरणाची बरीच चर्चा झाली. याच हाथरस जिल्ह्यातल्या नोजारपूर गावात मुलीची छेड काढू नको, अशी तंबी दिली म्हणून एकाने मुलीच्या वडिलांचाच खून केल्याची घटना घडली आहे.

त्यानंतर या कुटुंबाला भेटायला येणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. आम्हीही या कुटुंबाला भेट दिली.

निळ्या रंगाच्या दरवाज्यावर कुणीही नवीन व्यक्ती आली की पीडित मुलगी काय-काय घडलं हे तपशीलवार सांगते.

'मला न्याय हवा'

ती म्हणते, "आमच्यासाठी सगळं संपलंय. या घटनेविषयी मला सारखं-सारखं सांगावं लागतंय. मला न्याय हवा. वारंवार तेच सांगताना मला त्रास होतो. पण, मला माहितीय, हा त्रास मला सहन करावाच लागणार आहे."

50 वर्षांचे अवनीश कुमार शर्मा शेती करायचे. 1 मार्च रोजी बहराइचला राहणाऱ्या गौरव शर्माने त्यांचा खून केला.

गौरव शर्माने 5 साथीदारांच्या मदतीने अवनीश कुमार शर्मा यांची गोळ्या झाडून हत्या केल्याचं सासनी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. यासाठी अवैध बंदुकीचा वापर करण्यात आला. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मुलीने सहापैकी चार आरोपींना ओळखलं आहे. त्यांची नावं आहेत - गौरव शर्मा, निखिल शर्मा, ललित शर्मा आणि रोहिताश शर्मा.

काय घडलं…

1 मार्च रोजी आरोपीची पत्नी आणि आई मंदिरात गेल्या होत्या. अवनीश शर्मा यांच्या शेतातल्या रस्त्यातून ते मंदिरात गेले. अवनीश शर्मा यांनी त्यांना शेतातून बाहेर व्हायला सांगितलं आणि तिथून भांडणाला सुरुवात झाली. त्याचवेळी अवनीश शर्मा यांच्या दोन्ही मुलीही मंदिरात जात होत्या.

अवनीश शर्मा यांची थोरली मुलगी बाळंतपणासाठी माहेरी आलेली होती. "त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली. गौरव शर्माच्या पत्नीने गौरव शर्मा तुझ्या वडिलांना मारून टाकेन", अशी धमकी दिल्याचं पीडित मुलीचं म्हणणं आहे.

भांडणानंतरही आरोपीची पत्नी आणि आई त्याच रस्त्याने मंदिरात गेल्या. त्यांनी आरोपीलाही तिथे बोलावून घेतलं.

आरोपी गौरव शर्माने त्याच दुपारी अवनीश शर्मा यांना बोलावून आजच तुला ठार करेन, अशी धमकी दिली. त्यानंतर अवनीश शर्मा यांनी मंदिरात गेलेल्या आपल्या दोन्ही मुलींना ताबडतोब घरी पाठवलं आणि दार बंद करून घरातच थांबायला सांगितलं.

त्यानंतर मुलगी आणि तिची आई दुपारी तीन वाजता शेतात गेले. मुलगी सांगते, "मी आईसोबत जेवण घेऊन शेतात गेले." गौरव शर्माचा फोन आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांनाही याची माहिती दिली होती. त्यालाही बरेच तास उलटून गेले होते.

प्रकरणाचा तपास

दुपारी जवळपास साडे तीन वाजता गौरव शर्मा आपल्या पाच साथीदारांसोबत शेतात धडकला. त्याच्या हातात पिस्तुल होतं. त्याने अवनीश शर्मांवर बऱ्याच गोळ्या झाडल्या. आईवरही गोळी झाडली. पण त्या खड्ड्यात पडल्याने त्यांना गोळी लागली नाही.

अवनीश यांच्या शेतात काही मजूरही होते. पण, गौरव शर्माने हवेत गोळीबार करताच ते सर्व शेतातून पळून गेले.

अवनीश शर्मा यांच्यावर गोळीबार केल्यानंतर सर्व आरोपी तात्काळ शेतातून पसार झाले. त्यांनी मोबाईल फोनही बंद केले. त्यांचे कुटुंबीयही घराला कुलूप लावून फरार झाले.

या प्रकरणावरून राजकारण तापू लागलं आहे. आरोपींचे विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाशी संबंध असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. तर आरोपींनी बऱ्याच भाजप नेत्यांसोबत काढलेली छायाचित्र सोशल मीडियावर टाकत आरोपींचे भाजपशीच संबंध असल्याचं समाजवादी पक्षाने म्हटलं आहे.

अवनीश शर्मा यांच्या हत्येनंतर राज्य सरकारने तात्काळ पावलं उचलत तपासाचे आदेश दिले. मात्र, 1 मार्च रोजी गौरव शर्माने धमकावल्याची तक्रार पोलिसात केली त्यावेळी पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही, असं पीडित कुटुंबाचं म्हणणं आहे.

घरात स्थानबद्ध

पीडित मुलगी सांगते, गेल्या दोन वर्षांपासून ती नजरकैदेत असल्यासारखं आयुष्य जगतेय. खूप धमक्या मिळत असल्यामुळे कुणी सोबत असेल तेव्हाच ती घराबाहेर पडायची. बीएससीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला बीएड करायचं होतं. शिक्षिका व्हायचं होतं. पण, गौरव शर्मा तिचा सतत पाठलाग करायचा. तिची छेड काढायचा. त्यामुळे तिने कॉलेजमध्ये जाणंही सोडलं.

2017 साली त्याने तिला फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मुलीने ती रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. पण, त्यानंतर तो तिला सतत त्रास देऊ लागला. त्यामुळे तिच्या पालकांनाही तिला एकटीने घराबाहेर पाठवणं जोखमीचं वाटायचं. 2018 साली गौरवने मुलीशी लग्न करण्याचा प्रस्ताव पाठवल्याचं मुलीच्या काकांनी सांगितलं.

बऱ्याच वर्षांपूर्वी गौरव शर्माचं कुटुंब नोजारपूरमध्ये स्थायिक झालं होतं. नंतर मात्र ते दुसऱ्या शहरात गेले. गौरवने लग्नाचा प्रस्ताव पाठवला तेव्हा मुलीच्या वडिलांनी आणि काकांनी त्याला नकार दिला. मात्र, गौरव ऐकायला तयार नव्हता.

तो कुठलंही कारण काढून भांडू लागला, फोन करून धमकवू लागला, असं अवनीश शर्मांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. जुलै 2018 ला तो अवनीश शर्मांच्या घरात घुसला आणि त्यांच्या धाकट्या मुलीला खाटेवर ढकलून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.

जामिनावर बाहेर

या घटनेनंतर अवनीश यांच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गौरवला अटक करून कोर्टात हजर केलं. कोर्टाने त्याची रवानगी कारागृहात केली. गौरव जवळपास 29 दिवस तुरुंगात होता. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला. तो जामिनावर सुटल्यानंतर कोर्टात सुनावणी सुरू झाल्याचं पीडिता सांगते.

मात्र, आरोपी कधीही सुनावणीच्या तारखेला कोर्टात हजर झाला नाही.

गौरव शर्मा मुलीच्या कुटुंबावर केस मागे घेण्यासाठी दबाव टाकत होता. अवनीश शर्मा यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देणारे त्यांचे पुतणे सांगतात, "गौरव शर्मा आमच्या दूरच्या नात्यात आहे."

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात गौरवने बंदुकीचा धाक दाखवत अवनीश शर्माला पळवलंही होतं. अवनीश शर्मा यांनी या घटनेचीही पोलीस तक्रार करायला पोलिसांत गेले. पण, पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतली नाही. बीबीसीजवळ त्या तक्रारीचा अर्जही आहे.

सासनी ठाण्याचे पोलीस अधिकारी

गेल्या वर्षी 19 फेब्रुवारी रोजी गौरव शर्मा कारने हवेत बंदूक नाचवत अवनीश शर्मांच्या शेतात गेला होता. त्यावेळी अवनीश शर्मा शेतातच काम करत होते. गौरवने बंदुकीचा धाक दाखवत आपल्याला गावाच्या वेशीपर्यंत पळवल्याचं त्यांनी पोलिसांना केलेल्या अर्जात लिहिलं आहे.

मात्र, असा कुठला अर्ज मिळालाच नाही, असं सासनी पोलीस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या पोलिसांवर बराच दबाव असल्याचं जाणवतं.

फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथकं तैनात केली आहेत. आतापर्यंत सहापैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सासनी पोलीस ठाण्याचे सकाळच्या शिफ्टचे इंचार्ज सतीश चंद्र म्हणतात, "प्रकरणाचा तपास सुरू आहे. आम्ही सध्या तपासासंबंधी कुठलीही माहिती तुम्हाला देऊ शकत नाही. आम्ही काय करतोय, ते तुम्हाला का सांगावं?"

सतीश चंद्र पुढे सांगतात, "2019 साली पीडित कुटुंबाने आमच्याकडे कुठलाही अर्ज केलेला नाही."

या घटनेनंतरही धमक्यांचं सत्र सुरूच होतं. तो अधून-मधून पीडित कुटुंबाच्या घराच्या लोखंडी गेटवर लाथा मारायचा. पीडित मुलीचं नाव घेऊन ओरडायचा. या कुटुंबाला धमकावण्यासाठी घराच्या आस-पासच फिरायचा.

धमक्यांचं सत्र

मुलीचे थोरले काका सुभाष चंद्र शर्मा सांगतात, "कुणी तुम्हाला वारंवार धमकावत असेल तर तुम्हाला काय वाटेल? हेच ना की तो पोकळ धमक्या देतोय. काही करणार नाही."

सुभाष चंद्र मुंबईत राहतात आणि भावाच्या खुनाची बातमी कळताच दुसऱ्या दिवशी गावी गेले. पोलीस सर्व आरोपींना अटक करत नाही तोवर भावाच्या पार्थिवाला मुखाग्नी देणार नाही, असं सुभाष चंद्र यांचं म्हणणं होतं.

अवनीश शर्मांचे आणखी एक भाऊ सुनील कुमार शर्मा अलिगढला राहतात. त्यांनाही या घटनेचा मोठा धक्का बसलाय.

थोरल्या मुलीच्या लग्नानंतर अवनीश शर्मांना धाकट्या मुलीचंही लग्न लावून द्यायचं होतं. पण, हे प्रकरण कोर्टात असल्याने गौरव शर्मा लग्नाच्या दिवशीही त्रास देईल, अशी भीती त्यांना वाटायची.

सुनील कुमार शर्मा सांगतात, "गौरव शर्मा तुमच्या मुलीला पळवून नेईल, अशी सारखी धमकी द्यायचा. या धमक्यांमुळे आम्ही तिचं शिक्षणही थांबवलं."

आयुष्यातला अंधार कधी दूर होणार?

2020 मध्ये गौरवचं दुसऱ्या मुलीशी लग्न झालं. त्यामुळे यापुढे तो त्रास देणार नाही, असं अवनीश शर्मा आणि त्यांच्या कुटुंबाला वाटलं. मात्र, तरीही दुसऱ्या गावात रहाणारा गौरव अवनीश शर्माच्या गावात येऊन, त्यांना धमकवायचा.

पीडित मुलगी आणि तिच्या आईच्या पुढच्या आयुष्यात फक्त अंधार दिसत असल्याचं पीडित मुलीची काकू मीरा शर्मा यांचं म्हणणं आहे. त्या म्हणाल्या, "काही दिवसांनी ही सगळी माणसं निघून जातील. आपापल्या कामात व्यग्र होतील. तेव्हा काय होईल?

2018 च्या एवढ्या मोठ्या घटनेनंतरही आरोपीला जामीन कसा मिळू शकतो, असा प्रश्न त्या विचारतात. जामीन मिळाल्यावर तो राजरोसपणे फिरायचा. कुटुंबाला धमकवायचा. मुलीचा पाठलाग करायचा. तिची छेड काढायचा.

आमचं बोलणं सुरू असतानाच ती उठून आईजवळ गेली आणि म्हणाली, "सगळे निघून गेल्यावर मी आणि माझी आई, आम्ही दोघी इथे एकट्याच असू. तेव्हा आम्ही कुठे जाणार?"

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)