उन्हाळा: फेब्रुवारीतच उन्हाने शरीराची होत आहे लाहीलाही, पुढे काय होणार?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, भूमिका राय
- Role, बीबीसी प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये राहणाऱ्या विनोद यांची आंब्याची बाग आहे. आंब्याचा हंगाम सुरू होणार आहे, पण या वर्षी फेब्रुवारी महिन्यात हवामानात झालेल्या बदलामुळे त्यांना चिंता वाटते.
त्यांची आंब्याची झाडं फुलली आहेत, पण त्याला किती आंबे लागतील आणि ते पूर्ण पिकतील का? अशी भीती त्यांना आहे.
दिल्लीत राहणाऱ्या गरिमा यांची मुलगी नववीत शिकते. वर्षभरानंतर शाळा सुरू झाली. पण फेब्रुवारी महिन्यातच शाळेतून घरी येताना मुलगी घाम गाळत परत येत असल्याने मे महिन्यात काय परिस्थिती असेल याची त्यांनाही काळजी वाटत आहे.
वाढत्या तापमानाची काळजी केवळ विनोद आणि गरिमापर्यंत मर्यादित नाही. तर तापमानात होणाऱ्या बदलांचे परिणाम आता दिसू लागलेत.
- 2020 हे वर्ष भारतीय इतिहासातील आठवे सर्वांत उष्ण वर्ष होते. यंदा तापमान नेहमीपेक्षा 0.29 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक नोंदवले गेले.
- एनओएएच्या नॅशनल सेंटर्स फॉर एन्व्हायर्नमेंटल इन्फॉर्मेशनच्या एका अहवालानुसार जानेवारी 2021 हा इतिहासातील सर्वांत उष्ण जानेवारी महिना होता.

फोटो स्रोत, Getty Images
- 1990 साली हिमनद्या वितळण्याचा दर दरवर्षी 80,000 दशलक्ष टन होता, तो 2017 मध्ये वाढला आणि 1,30,000 दशलक्ष टन एवढा झाला.
- पूर्व ओडिशातील सरासरी तापमान या वर्षी फेब्रुवारीत 3 ते 4 अंश सेल्सिअसने वाढले, त्यामुळे स्थलांतरित पक्षी काही आठवड्यांआधीच परतले.
गेल्या आठवड्याभरात वाढलेल्या तापमानाचा परिणाम तुम्हालाही जाणवत असेल. आठवड्याभरापूर्वीपर्यंत गरम पाण्याने आंघोळ करणारे लोक आता थंड पाण्याने आंघोळ करत आहेत.
फेब्रुवारी महिना सहसा सौम्य थंडीचा असतो, पण यावर्षी तापमान वाढल्याचे दिसून येते. फेब्रुवारी महिन्यात सरासरी तापमान 28 अंश सेल्सिअस होते, पण काही दिवस दिल्लीसह काही राज्यांमध्ये तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे.
भारतात फेब्रुवारी महिन्यात वाढत्या उष्णतेचे कारण काय आहे?
नवी दिल्लीच्या हवामान अंदाज केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव सांगतात, "पश्चिमी विक्षोभाचा (वेस्टर्न डिस्टर्बंस) सहसा उत्तर भारतातील हवामानावर मोठा परिणाम होतो. याठिकाणचे हवामान त्यानुसार बदलत असते. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात सहा पश्चिमी विक्षोभ येतात. पण यावेळी एकच पश्चिमी विक्षोभ आहे."

फोटो स्रोत, Getty Images
कुलदीप श्रीवास्तव सांगतात, "पश्चिमी विक्षोभ 4 फेब्रुवारीला आले होते. पश्चिमी विक्षोभ आपल्यासोबत पाऊस घेऊन येतो. पश्चिमी विक्षोभ नसल्याने ढगही नाहीत आणि यामुळे सुर्याचा प्रकाश पूर्ण येतो. त्यामुळे तापमानातही वाढ होते."
तापमानात होणारी वाढ सामान्य आहे का?
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजीचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू यांच्या मते, "हल्लीच्या काळात तापमानात झालेली वाढ सामान्य आहे. जवळजवळ प्रत्येक वर्ष आणि प्रत्येक महिना गेल्यावर्षीच्या तुलनेत काहीसा उबदार असतो."

फोटो स्रोत, Getty Images
"पूर्व प्रशांत महासागरात ला नीना असूनही 2020 हे वर्ष सर्वांत उष्ण वर्षांपैकी एक होतं. ला-नीनामुळे सहसा तापमान कमी होते, पण ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या प्रभावामुळे ते निष्प्रभ ठरले. म्हणूनच आता ला नीनाची वर्षे आधीच्या एल निनो वर्षांपेक्षा उबदार आहेत,"
ला-नीना आणि एल निनो या प्रशांत महासागराशी संबंधित प्रक्रिया आहेत. मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील घटनांचा जागतिक हवामानावर प्रामुख्याने परिणाम होतो.
एल निनोमुळे उष्ण वारे येतात आणि तापमान दोन ते चार अंशांनी वाढते, तर ला नीनामुळे पूर्व प्रशांत महासागरात थंड वारे वाहतात आणि तापमान सामान्य तापमानापेक्षा तीन ते पाच अंश सेल्सिअसने कमी होते आणि जागतिक तापमान कमी होते.
जागतिक तापमानाबद्दल बोलताना हवामान शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यूज सांगतात, ला नीनाचे प्रशांत महासागरातील स्थान हळूहळू मंदावत आहे. येत्या काही महिन्यांत तापमान तटस्थ राहील आणि नंतर उष्ण होईल असा जागतिक यंत्रणांचा अंदाज आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत जागतिक तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे.
येत्या काही महिन्यांत तापमानात तुलनेने वाढेल का?
भूगर्भ विज्ञान मंत्रालयाच्या भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर, उत्तर-पश्चिम आणि उत्तर पूर्व भारताचा बहुतांश भाग आणि मध्य भारताचा पूर्व आणि पश्चिम भाग आणि उत्तर द्वीपकल्पाच्या काही किनारपट्टी भागात कमाल तापमान असण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सध्या विषुववृत्तीय प्रशांत महासागरात ला नीनाची परिस्थिती मवाळ आहे. मान्सून अंदाजानुसार ला नीनामध्ये हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
कुलदीप श्रीवास्तव सांगतात, "येत्या काही महिन्यांत तापमान वाढेल आणि उष्ण वारे वाहतील. त्यामुळे तापमानात वाढ होईल."
तापमानात सातत्याने होणारी वाढ गंभीर समस्या?
डॉ. रॉक्सी मॅथ्यूज म्हणतात, "पृथ्वीचे तापमान सतत वाढत आहे." तापमानात किंचित वाढ झाल्याचे परिणामही गंभीर असू शकतात."
ते म्हणाले, "भारताच्या नुकत्याच झालेल्या हवामान बदल मूल्यांकन अहवालानुसार भारताच्या सरासरी तापमानात 0-7 अंश सेल्सिअसने बदल झाल्याचे आढळले आहे.
स्थानिक आणि जागतिक तापमानात वाढ झाल्याचा थेट परिणाम हवामान बदलांच्या विविध घटनांच्या माध्यमातून पहायला मिळतो. पावसाचा पॅटर्न बदलला आहे. अरबी समुद्रात तीव्र चक्रीवादळ येण्याचे प्रमाण वाढले आहे. हिमालयाच्या हिमनद्या झपाट्याने वितळत आहेत आणि महासागर तापत आहेत. हिंदी महासागराच्या पाण्याची पातळी वाढत आहे. "

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. रॉक्सी मॅथ्यूज यांच्या मते, येत्या काळात या आव्हानांचा सामना करण्याची तयारी आपल्याला करावी लागेल.
पर्यावरणाच्या मुद्द्यावर काम करणारे वनमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रभूषण सांगतात, सर्वप्रथम हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, हवामानातले बदल गेल्या काही दशकांपासून होत आहे. हे बदल अचानक घडू लागले असं नाही. त्याप्रमाणे त्याचा प्रभावही अचानक दिसून येत नाहीय.
ते म्हणतात, "गेल्या 20-25 वर्षांपासून भारतीय खंडात हे हंगामी बदल आपण पाहत आहोत. ज्यामध्ये वसंत ऋतू (वसंत ऋतू) लहान होत चालला आहे आणि हिवाळ्यानंतर थेट उन्हाळा सुरू होतोय. याचा अर्थ तापमान झपाट्याने वाढत आहे."
"जेव्हा तापमान झपाट्याने वाढते तेव्हा अनेक गोष्टींवर परिणाम होतो. कारण निसर्गाचे स्वरूप बिघडत चालले आहे. प्राण्यांवर याचा परिणाम होतो. प्रजननाचा हंगाम असो वा स्थलांतराचा हंगाम यातही परिणाम होतो. झाडांवर फळ-फूल येण्यापासून सर्व गोष्टींवर याचा परिणाम होतो."

फोटो स्रोत, Getty Images
"ऋतू खूप चटकन बदलत असल्याने त्यानुसार जीवजंतू आणि वनस्पतींनाही जुळवून घ्यावे लागते. यात काही वेळा काही सजीव नामशेष होतात तसंच काही वनस्पतीही.'
चंद्रभूषण सांगतात, ""वसंत ऋतूच्या शेवटी आम्ही गहू पिकवतो. पण तापमान एवढे वाढले आहे की रात्रीच्या वेळीही उष्णता जाणवते. त्यामुळे गव्हाच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो."
"'हवामान बदलाबाबत अनेक प्रयत्न केले जात आहेत. पण हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की ऋतूचक्र बिघडले तर त्याचा परिणाम जीवनावर होईल."

हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )








