हवामान विभाग दारू न पिण्याचा सल्ला का देत आहे?

दारू

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अनंत प्रकाश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारतीय हवामान विभागानं दिल्लीसहित उत्तरेकडील काही भागात पुढचे काही दिवस शीत लहर आणि तापमान कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

या भागांमध्ये दिल्ली एनसीआर, हरियाणा, पंजाब आणि चंदीगढचा समावेश आहे. जिथं गेल्या काही दिवसांपासून तापमान शून्य डिग्री सेल्सिअसदरम्यान राहिलं आहे.

यामुळे हवामान विभागानं सकाळी मोकळ्या जागांमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. कारण त्यामुळे हायपोथर्मिया आणि फ्रॉस्टबाइट यांसारखे आजार होऊ शकतात, असंही विभागानं म्हटलं आहे.

हायपोथर्मिया झाल्यानंतर तुमचं शरीर एका ठरावीक तापमानापर्यंत पोहोचतं आणि काम करणं बंद करतं, तर फ्रॉस्टबाइटमुळे पायाचे किंवा हाताची बोटे, चेहरा आदी सुन्न होतात.

हवामान विभागाचा इशारा

हवामान विभागानं आपल्या सूचनांमध्ये दारू न पिण्याचा सल्ला दिला आहे. कारण, दारू पिल्यामुळे शरीराचं तापमान खालावतं, असं हवामान विभागाचं म्हणणं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

बीबीसीनं याविषयी भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक अंदाज पूर्वानुमान केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली.

त्यांनी सांगितलं, "दिल्लीत सध्या थंड हवा सुरू आहे. यामुळे तापमान 4 अंश सेल्शियस किंवा त्याहून कमी नोंदवलं जात आहे. अशावेळी सकाळच्या वेळी तुम्ही घरातून बाहेर पडायला टाळायला हवं. तसंच प्रवासही टाळावा कारण वातावरणातील धुक्यामुळे समोरच्या गोष्टी स्पष्ट दिसत नाही. अशावेळी फॉग लाईटचा वापर करावा आणि गाड्या हळू चालवाव्यात. तसंच या काळात दारू पिऊ नये, कारण त्यामुळे शरीराचं तापमान खालावतं."

दारू न पिण्याचा सल्ला का?

हवामान विभागानं 25 डिसेंबरला जारी केलेल्या सूचनांमध्ये दारू न पिण्याचा सल्ला दिला आहे.

त्यामुळे मग हवामान विभाग असा इशारा का देत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बीबीसीनं हा प्रश्न विचारल्यानंतर श्रीवास्तव यांनी सांगितलं, याविषयावर वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी संशोधन केलं आहे आणि त्या आधारावरच हवामान विभागानं असा इशारा दिला आहे.

दिल्ली, हिवाळ्याचे दिवस

फोटो स्रोत, SANCHIT KHANNA/HINDUSTAN TIMES VIA GETTY IMAGES

जगभरात असे अनेक देश आहेत जिथं तापमान 10 अंश सेल्शियस ते -20 ते -30 अंश सेल्शियस इतकं कमी असतं. असं असतानाही तिथं दारूचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. यात रशिया, बेलारूस, लिथुयानिया अशा देशांचा समावेश आहे. जगभरात सर्वाधिक दारू या देशांमध्ये सेवन केली जाते.

याशिवाय दारू प्यायल्यानं शरीरात उष्णता निर्माण होते, असाही एक समज आहे.

त्यामुळे मग थंडीच्या दिवसांत दारू पिऊ नये, या हवामान विभागाच्या इशाऱ्यात किती तथ्य आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.

बीबीसीनं याविषयी अधिक जाणून घेण्याकरता वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा केली.

विज्ञान काय म्हणतं?

माणसाच्या शरीराचं मूळ तापमान 37 अंश सेल्शियस इतकं असतं. पण, जेव्हा तुमच्या आसपासचं तापमान कमी होऊ लागतं, तेव्हा आपलं शरीर शरीरातल्या उर्जेचा वापर आपल्या मूळ तापमानाला स्थिर ठेवण्यासाठी करत असतं.

पण, शरीराचं तापमान निश्चित मर्यादेच्या खाली जातं, तेव्हा मात्र तुम्हाला हायपोथर्मिया होतो.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणामध्ये सध्या जे तापमान आहे, त्यात अधिक काळ राहिल्यास तुम्हाला हायपोथर्मिया होऊ शकतो.

सरळ शब्दांत सांगायचं म्हणजे शरीराचं मूळ तापमान जेव्हा खालावतं तेव्हा तुम्हाला हायपोथर्मिया होतो.

दारू

फोटो स्रोत, DIBYANGSHU SARKAR/AFP VIA GETTY IMAGES

आता थंडीच्या प्रदेशात दारू प्यायल्यास त्याचा शरीरावर काय परिणाम होतो, ते पाहूया.

दिल्लीच्या एलएनजेपी हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ऋतु सक्सेना याविषयी सांगतात, "जेव्हा तुम्ही दारू पिता तेव्हा ती शरीरात गेल्यानंतर 'वेजो डायलेशन' होतं. यामुळे तुमच्या हातापायाच्या रक्तवाहिन्यांचा विस्तार होतो, त्यांच्यात पहिल्यापेक्षा अधिक रक्ताचा प्रवाह व्हायला लागतो. यामुळे मग तुम्हाला उष्णतेची जाणीव होते. यामुळे मग लोकांना वाटतं की, थंडी जास्त पडत असल्यामुळे पाश्चिमात्य देशांतील लोक जास्त दारू पितात.

"पण, खरं पाहिलं तर दारूमुळे हातापायातील रक्ताचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे गरमी होत असल्याचं जाणवतं. या जाणीवेमुळेच लोक थंडीचे कपडे जसं मफलर, जॅकेट, टोपी, स्वेटर काढून ठेवतात. पण, ज्यावेळेस ते असं करत असतात तेव्हाही त्यांच्या शरीराचं मूळ तापमान खालावत असतं आणि त्यावेळी आपल्याला याविषयी अधिक समजत नाही. हीच बाब आपल्या शरीरासाठी अत्यंक धोकादायक ठरू शकते."

दारू

फोटो स्रोत, Reuters

पण, दारूमुळे उष्णता उत्पन्न होत नाही, मग त्याची जाणीव का होते?

मॅक्स हेल्थकेयरमध्ये इंटरनल मेडिसिन विभागातील सहसंचालक डॉ. रोमेल टिक्कू याविषयी सांगतात, "तुम्ही पाहिलं असेल की जे लोक जास्त दारू पितात त्यांचा चेहरा लाल-लाल दिसतो. कारण दारूमुळे त्यांचा चेहरा, हात-पायाच्या रक्त धमन्यांतील रक्ताचा प्रवाह वाढतो. यामुळे गरमीची जाणीव होते, कारण रक्त शरीराच्या आतल्या भागातून बाहेरच्या भागात जातं. यामुळे शरीराचं मूळ तापमान कमी होत राहतं.

"यामुळे थंडीच्या दिवसात तुम्ही जास्त दारू पिता तेव्हा तुमच्या शरीराचं मूळ तापमान कमी होत जातं. रक्तप्रवाह वाढल्यानं तुम्हाला घाम येतो आणि यामुळे शरीराचं तापमान अजून खालावतं. अशात जर थंडीच्या दिवसांत तुम्ही दारू पित असाल तर तुम्हाला त्रास होऊ शकतो."

आता प्रश्न निर्माण होतो की, थंडीच्या दिवसांत दारू पिल्यानं तुमचा जीव जाऊ शकतो का?

जीव जाऊ शकतो?

डॉ. ऋतु सक्सेना यांच्या मते, थंडीच्या दिवसांत अधिक दारू प्यायल्यास तुमचा जीवही जाऊ शकतो.

त्या सांगतात, "थंडीच्या दिवसांत तुम्ही खूप दारू प्यायली की सगळ्यात पहिली गोष्ट ही होईल की तुम्ही व्यवस्थित कपडे घालणार नाही. दारूमुळे तुमच्या डोक्यावर असा परिणाम होईल की तुम्ही कोणत्या अवस्थेत आहात, हे तुम्हाला कळणार नाही. यास्थितीत तुमच्या शरीराचं तापमान 30 अंश सेल्शियसहून कमी व्हायला लागलं तर हळूहळू हायपोर्थर्मिया आजार बळावू लागेल. हायपोथर्मियामुळे व्यक्ती कोमात जाऊ शकतो. इतकंच काय जीवही जाऊ शकतो."

पार्टी

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES

रशिया असा एक देश आहे जिथं थंड वातावरण असतं आणि दारूचं मोठ्या प्रमाणावर सेवन केलं जातं.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार, रशियात व्होडकाचं सेवन करणं सामान्य बाब आहे. त्यामुळे देशात दारूच्या अतिसेवनानं जीवनमान खालावलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा..)