You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे - पूजा चव्हाण प्रकरणाच्या तपासाला विरोधीपक्ष दिशा देऊ शकत नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली. संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचं यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
यावेळी त्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला आणि आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.
कोरोना काळात झालेल्या भ्रष्टचाराचा आरोप खोटा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. तसंच महाराष्ट्रातला विरोधीपक्ष दुतोंडी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
"विरोधकांनी कोव्हीड बद्दल भ्रष्टाचार झाल्याचं म्हटल. मला किव वाटते विरोधी पक्षाची. आपण आपत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटल उभे केले. कोव्हीड योध्यांची ही थट्टा आहे. इतका दुतोंडी विरोधीपक्ष पाहीला नाही."
तपासाला तुम्ही दिश देऊ शकत नाही, तपास निपक्ष सुरू आहे, असं उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड प्रकरणी म्हटलं आहे.
"तपास हा निःपक्षपातीपणानेच झाला पाहीजे. कोणत्याही तपास यंत्रणेवर दबाव नसावा. पण गलिच्छ राजकारण होत आहे. त्यामुळे आज राठोड यांनी स्वतःहून मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे."
"तुम्हाला वाटत असेल इतके दिवस गप्प का बसले आहेत. जेव्हा आम्हाला ही घटना कळली तेव्हापासून तपास सुरू आहे. कोणालाही पाठीशी घालणार नाही. तेव्हाही हीच पोलीस यंत्रणा आहे आणि पुढेही हीच यंत्रणा आहे. त्यांच्यावर अविश्वास दाखवता," असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी पूजा चव्हाणच्या आईवडिलांनी आपली भेट घेतल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तिच्या आईवडिलांनी तपास यंत्रणांवर विश्वास असल्याचं म्हटलंय.
"पूजा चव्हाण यांचे आई वडील आणि बहीण मला येऊन भेटले. तेव्हा त्यांनी पत्र दिलं. त्यात या घटनेचा तपास वेगाने व्हावा ही आमची मागणी आहे. पण फक्त संजय राठोड यांच्यावरच्या संशयामुळे त्यांचा राजीनामा घेऊ नये. यात त्यांचा बळी जाऊ देऊ नका ही आमची मागणी आहे. रोज जे गलिच्छ आरोप होत आहेत त्याने पूजाचा रोज बळी जातोय. तुम्ही घाईघाईने राठोड यांचा राजीनामा घेऊ नये," असं पूजाच्या आईवडिलांनी सांगितल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
"देवेंद्र फडणवीस यांनी मला जो फुकटचा सल्ला दिला की सत्तेसाठी लाचारी पत्करण्याची इतिहासात नोंद होते. तुमच्या सरकारने देश विकायला काढला याचीही इतिहासात नोंद होईल."
"दुसरी एक आत्महत्या मुंबईत झाली. त्यात 13-14 पानांची स्यूसाईड नोट मिळाली आहे. त्यात उच्चपदस्थ नावं आहेत. सहा-सात टर्म खासदार राहीलेल्या माणसाने आत्महत्या केली. भाजप नेत्यांना त्याचा छळ करण्याचा परवाना मिळाला आहे का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी दादरा नगर आणि हवेलीचे खासदार मोहन डेलकरांच्या आत्महत्ये प्रकरणी विचारला आहे.
"सीमाप्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार जोमाने प्रयत्न करतोय. त्यांनी आमच्याबरोबर यावं, केंद्रात आणि कर्नाटकमध्ये त्यांच सरकार आहे. मदत करावी फक्त बोलाची कढी आणि बोलाचा भात नको."
फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना सवाल
काही वेळापूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली. यात त्यांनी महाराष्ट्र सरकारवर बरीच टीका केली.
"राज्याचं तथाकथित अधिवेशन उद्या सुरू होतय. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या इतिहासातलं सर्वात लहान अधिवेशन होतय. कामकाजामधून पळ काढण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे," अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
"मोठ्या प्रमाणावर बदल्या होतायतेय. बदल्यांसाठी बोल्या लागतायेत. आयएएस आणि आयपीएसच्या बदल्यांसाठी भ्रष्टाचार होतोय," असा गंभीर आरोपही फडणवीसांनी केला आहे.
फडणवीस म्हणाले, "हे तीन पाटाचं सरकार आहे. कोण कोणत्या पाटावर बसलय कोण कोणाचा पाट ओढतय हे कळतंय."
फडणवीसांच्या या टीकांना उद्धव ठाकरे या उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
तसंच, फडणवीसांनी संजय राठोड प्रकरणावरूनही टीका केली. ते म्हणाले, "महिलांवर अत्याचार वाढले आहेत. यात बोलायची काय सोय? सत्ता पक्षाचे नेते आणि मंत्रीच यामध्ये आघाडीवर आहेत. संजय राठोड यांच्या इतक्या क्लिप समोर येऊन गुन्हा दाखल झाला नाही. महाराष्ट्र पोलिसांची इतकी लाचार अवस्था आतापर्यंत पाहिली नव्हती. पुण्याचे पीआय यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे. इतके ढळढळीत पुरावे असतानाही संजय राठोड यांच्यावर पोलीसांनी कारवाई करत नसतील तर वरिष्ठांचा आशिर्वाद असल्याशिवाय हे शक्य नाही."
"मुख्यमंत्री नाराज आहेत तर तमाशा कसला आहे 18 दिवस? पोलीस कारवाई करत नाहीत. मंत्री राजीनामा देत नाहीत, हे बिना आशीर्वाद कसं शक्य आहे?" असा प्रश्नही फडणवीसांनी विचारला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)