धर्मेंद्र, सुनील दत्त, शम्मी कपूरपासून अनेकांनी या दोघींच्या सिक्रेट पत्रांना उत्तरं दिली होती...

    • Author, आलिया नाजकी
    • Role, बीबीसी ऊर्दू, लंडन

आमच्या वेळी असं नव्हतं... ते दिवस काही औरच होते…, असं प्रत्येकाने एकदातरी आपल्या आजी-आजोबांकडून ऐकलं असेल.

कदाचित बऱ्याच बाबतीत या दोन पिढ्यांमध्ये मतभेद असतील. खरं म्हणजे मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया आणि आधुनिक संपर्क साधनं यांनी आयुष्य किती बदलून टाकलं आहे. मात्र, आज ट्वीटरवर एक थ्रेड बघितला आणि अचानक माझ्याच तोंडून निघालं, "आह… कसले भारी होते ते दिवस…"

भारतातली फॅक्ट चेक वेबसाईट असलेल्या 'ऑल्ट न्यूजच्या' सह-संस्थापक ज्या ट्वीटरवर 'सॅम सेज' नावाने ट्वीट करतात त्यांनी ट्वीटरवर त्यांच्या आत्याचा उल्लेख करत आठवण सांगितली आणि सगळ्यांचीच मनं जिंकली.

15 वर्षांपूर्वी 2006 साली त्यांच्या आत्याचं निधन झालं. निधनानंतर त्यांचं सामान तळघरातल्या एका स्टोर रूममध्ये ठेवण्यात आलं. पुढची अनेक वर्षं ते सामान तिथेच पडून होतं. नुकतंच या सामानातला एक जुना अल्बम सॅम यांच्या हाती लागला.

त्यांची आत्या मेहरुन्नीसा नजमा ज्यांना सगळे प्रेमाने नजमा म्हणायचे त्यांना हिंदी सिनेमे प्रचंड आवडायचे. त्यांच्या आईला हे अजिबात पसंत नव्हतं. मात्र, आईची नाराजी असली तरी नजमा रिकाम्या वेळेत तत्कालीन हिंदी सुपरस्टार्सना पत्रं लिहायच्या.

तुमचा विश्वास बसणार नाही पण त्या अल्बममध्ये त्या काळातल्या मोठ्यातल्या मोठ्या हिंदी कलाकारांनी नजमा यांना पत्रांना पाठवलेली उत्तरं होती. सोबतच स्वाक्षरी केलेले फोटोही त्यांनी पाठवले होते.

शम्मी कपूर यांनी इंग्रजीतून, धर्मेंद्र यांनी स्वहस्तााक्षरात हिंदीतून तर सुनील दत्त यांनीही स्वहस्ताक्षरात आणि तेही शुद्ध ऊर्दूत नजमा यांच्या पत्रांना उत्तरं पाठवली आहेत. कलाकारांची ही यादी खूप मोठी आहे. यात कामिनी कौशल, साधना, आशा पारेख, सायरा बानो, तबस्सूम, सूर्या, राजेंद्र कुमार आणि राज कुमार यांचीही पत्रं आहेत.

आपल्यापैकी कुणी शाहरुख खान, दीपिका पादुकोण यांना पत्र लिहिलं आणि त्यांनी स्वतःच्या हाताने त्या पत्राला उत्तर पाठवलं तर…

आजी म्हणायची ते खरंच आहे… तो काळ काही औरच होता.

या पत्रांविषयी बोलण्याआधी जरा नजमांविषयी जाणून घेऊया. त्यांचा जन्म 1930 च्या दशकातला. त्यांचे वडील पंजाबमधले होते. मात्र, आई बर्माच्या (म्यानमार) होत्या. त्यांना दोन बहिणी आणि एक भाऊ होता. नजमा लहान असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.

नजमा आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब नजमा यांच्या आत्याकडेच रहायचं. त्यांची आत्या टोंकचे तत्कालीन नवाब सआदत अली खान यांच्या पत्नी होत्या.

म्हणजेच नजमा यांच्या बर्मन आईने त्यांना टोंकच्या नवाबाच्या राजवाड्यात लहानाचं मोठं केलं होतं.

नजमाची भावंडं शिक्षणासाठी अलिगढला गेले. पण नजमा यांना अभ्यासात फारसा रस नव्हता. त्यांना तर सिनेमांचा छंद होता. त्या तासनतास रेडियोवर लागणारी गाणी लक्ष देऊन ऐकत आणि आवडत्या कलाकारांना पत्र लिहित.

लहान वयातच त्यांना सिनेमाची गोडी लागली. तेव्हापासून त्यांना हा पत्र लेखनाचा छंद जडला. त्यांचं लग्न होईपर्यंत हा छंद कायम होता. लग्नानंतर पत्र लिहिणं बंद झालं. पण सिनेमे त्या नियमित बघायच्या.

सॅम सांगतात, नजमा अत्यंत प्रेमळ आत्या होती. त्यांना सिनेमे आवडायचे आणि कलाकारांना पत्र लिहिणं, त्यांचा छंद होता, हेसुद्धा सर्वांना माहिती आहे. पण, त्यांचा हा अल्बम इतका महत्त्वाचा आहे, याची कल्पना कुणालाच नव्हती.

लग्नानंतर आठच वर्षात नजमा यांच्या पतीचं निधन झालं. त्यांनी दुसऱ्या लग्नाला नकार दिला आणि आयुष्यभर आपल्या भावंडांसोबतच त्या राहिल्या. त्यांना स्वतःचं अपत्य नव्हतं. पण, भाची त्यांच्या खूप लाडाची होती. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन सिनेमे बघण्याचा आपला छंद जोपासला होता.

आता त्यांच्या या अमूल्य अल्बमची झलक बघूया…

सुरुवात करूया सुनील दत्त यांच्यापासून. सुनील दत्त यांनी ऊर्दूतून नजमा यांच्या पत्राला उत्तर दिलं. एक-दोन वाक्य नव्हे बरं का… एक लांबलचक पत्र… पत्र लिहिणारी तरुण मुलगी असावी, असा अंदाज बांधून त्यांनी पत्रात एकदा नव्हे अनेकदा नजमा यांचा उल्लेख 'ताई' असा केला आहे.

खरंतर आपल्या आवडत्या सिनेकलाकाराने 'बहीण' म्हणणं त्यांना किती आवडलं असेल किंवा 'बहीण' शब्द वाचून त्यांना काय वाटलं असेल, हे काही सांगता येत नाही.

या पत्रात सुनील दत्त यांनी काही हिंदी शब्दही ऊर्दू लिपीत लिहिलेत. 'खैर अंदेश'ही ऊर्दूत आणि 'शुभचिंतक'ही ऊर्दूत.

नजमा यांचे 'खैर अंदेश' भाऊ सुनील दत्त यांचं हे पत्र माझं सर्वात आवडतं आहे.

आता धर्मेंद्र काय लिहितात, बघा. त्यांनी स्वतः पत्र लिहिलं आहे. हे पत्र हिंदीत आहे. कदाचित नजमा यांनी धर्मेंद्र यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने पत्र पााठवलं असावं. उत्तरात धर्मेंद्र लिहितात, "वाढदिवसाला तुमच्या सुंदर शुभेच्छा मिळाल्या. इतका आनंद झाला की शब्दात व्यक्त करता येणार नाही. याच आनंदात माझा फोटो आणि ऑटोग्राफ पाठवतोय. माझ्या शुभेच्छाही सोबत आहेतच. तुमचा, धर्मेंद्र."

हे पत्र हाती आल्यावर नजमा यांना काय आनंद झाला असेल, याचा अंदाजच बांधलेला बरा.

नजमा यांना अभिनेत्री तबस्सूम यांनीही पत्र पाठवलंय. ते पत्र सॅम यांनी ट्वीटरवर पोस्ट केलेलं नाही. ते पत्र खूप खाजगी असल्याचं सॅम यांचं म्हणणं आहे. तबस्सूम यांच्या पत्रातून नजमा आणि तबस्सूम यांच्यात बरेचदा पत्रव्यवहार झाला असावा, असा अंदाज बांधता येतो.

नजमा फक्त चित्रपटांच्या प्रशंसक नव्हत्या. त्यांना रेडियो सिलोन ऐकण्याचाही छंद होता. रेडियोवर होणाऱ्या कुठल्या ना कुठल्या स्पर्धेत त्या कायम भाग घ्यायच्या आणि जिंकायच्यादेखील. पुरस्कार म्हणून रेडियो सिलोनकडून वेगवेगळ्या गायकांनी स्वाक्षरी केलेले फोटो त्यांना मिळायचे.

ही थ्रेड व्हायरल झाल्यानंतर नॅशनल फिल्म आर्काईव्ह्ज ऑफ इंडियाकडूनही संपर्क करण्यात आल्याचं आणि पत्रांचं जतन करण्याची जबाबदारी घ्यायला तयार असल्याचं सॅम यांनी सांगितलं.

मात्र, याबाबत सॅम यांनी अजूनतरी कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)