अमरावतीत कोरोना रुग्णांसाठी ICU आणि ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत?

फोटो स्रोत, Hindustan Times
- Author, मयांक भागवत आणि नीतेश राऊत
- Role, बीबीसी मराठी
अमरावतीत गेल्या 13 दिवसात 8000 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर बुधवारी (24 फेब्रुवारी) रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
अमरावतीकडे संपूर्ण महाराष्टृाचं लक्ष लागलंय. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा वाढणारा आकडा नियंत्रणात आणण्यासाठी लॅाकडाऊन करण्यात आलाय. पण सर्वात जास्त गंभीर समस्या बेड्सची आहे.
"डॉक्टर म्हणतात बेड्स उपलब्ध नाहीत." अमरावतीच्या महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयात प्रोफेसर असलेले संजय शेंडे कोरोनाग्रस्त मित्रासाठी मंगळवारपासून बेड मिळवण्याचा प्रयत्न करतायत. पण, बेड अजूनही मिळालेला नाही.
"माझा मित्र कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आहे. मी शहरातील 2-3 डॉक्टरांना बेडसाठी फोन केला. पण, रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. बेड उपलब्ध असल्यास सांगतो असं डॉक्टर म्हणतात," असं त्यांनी सांगितलं.
संजय शेंडे पुढे सांगतात, "बेड उपलब्ध नसल्याने मित्राला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलंय."

फोटो स्रोत, Getty Images
मुंबई, पुण्यात रुग्णांची बेड्ससाठी होणारी फरफट सर्वांनी पाहिली आहे. अमरावतीत त्यामुळे कदाचित रूग्णांना बेड मिळणं ही गंभीर समस्या बनू शकते.
अमरावतीत बेड्सची स्थिती
अमरावती जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात सद्य स्थितीत रुग्णालयात 1210 रुग्ण उपचार घेत आहेत, तर 800 पेक्षा जास्त खाटा उपलब्ध आहेत.
पण, कोरोना रूग्णांची संख्या वाढल्याने रूग्णालयांचे ICU आणि ऑक्सिजन बेड्स हळूहळू पूर्ण क्षमतेने भरल्याचं पाहायला मिळत आहे.
अमरावती शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयात आयसीयू बेड्स उपलब्ध नाहीत हे जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय.
अमरावती शहरातील रुग्णालयात उपलब्ध ICU आणि oxygen बेड्स सद्यस्थिती

(माहिती स्रोत : जिल्हा प्रशासन)
पहिल्या लॉकडाऊन मध्ये ऑक्सिजन खाटांच्या कमतरतेचा प्रश्न गंभीर झाला होता. कोरोना रुग्णांना खाटांसाठी वाट पहावी लागत होती.
सध्याचा कोरोना वाढीचा दर त्याहून कितीतरी पटीने अधिक आहे. सध्याचे आकडे पाहता आरोग्य विभागावर ताण वाढण्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलीये.
ICU-Oxygen बेड्स उपलब्ध नाहीत?
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सद्य स्थितीत 73 ICU तर 181 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत.
बीबीसीशी बोलताना अमरावतीतील दयासागर रुग्णालयाच्या कोव्हिड विभागाच्या प्रमुख डॉ. रेजी सांगतात, "रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने बेड्सची मागणी खूप वाढली आहे. रूग्णालयात बेड उपलब्ध नाहीत."

फोटो स्रोत, Getty Images
"बेड्सची विचारणा करण्यासाठी लोक येत आहेत. त्यांच्यासाठी आम्ही रजिस्टर ठेवलंय. रुग्णांचे नातेवाईक यांत रजिस्टर करतात. बेड उपलब्ध असल्यास आम्ही त्यांना फोन करून बोलावतो," असं डॅा रेजी पुढे सांगतात.
अमरावतीत कोरोना व्हायरसची पसरण्याची क्षमता खूप जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते, या रूप बदललेल्या व्हायरसमुळे होणारा आजार तीव्र स्वरूपाचा आहे. हीच परिस्थिती शहरातील इतर खासगी रुग्णालयांची आहे.
फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॅा अनिल रोहनकर सांगतात, "जिल्ह्यातील परिस्थिती फार स्फोटक आहे. रुग्णांना दाखल करण्यासाठी बेड्स उपलब्ध नाहीत. येणार्या काळात रुग्णसंख्या अशीच वाढू लागली तर गंभीर परिस्थिती निर्माण होईल."
"एका आठवड्याच्या लॅाकडाऊननंतर केसेस कमी झाल्या नाही, तर लॉकडाऊन वाढवण्याची आम्ही प्रशासनाला विनंती करू. व्हायरस पसरण्याची चेन आपल्याला तोडावी लागेल," असं डॉ. रोहनकर पुढे म्हणाले.
काय करतंय प्रशासन?
जिल्ह्यात रुग्णांची वाढणारी संख्या प्रशासनासाठी चिंतेचा विषय आहे. जिल्हा प्रशासन कोव्हिड डॅशबोर्ड तयार करत आहे.
जिल्हाधिकारी शैलेश नवल म्हणाले, "कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता बेड्सची संख्या वाढवण्यात येत आहे. सूपर स्पेशालिटीमध्ये 250 बेड्स वाढवण्यात आले आहेत. रुग्णसख्येच्या 9 टक्के लोकांना ICU आणि oxygen ची गरज भासत आहे. त्यानुसार आम्ही तयारी केली आहे."

फोटो स्रोत, Getty Images
"रुग्णांची वाढती संख्या पाहता आम्ही बेड्सची उपलब्धता पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. येत्या 10 दिवसांचा अंदाज घेऊन उपाययोजना करत आहोत," असं शैलेश नवल पुढे म्हणाले.
सद्य परिस्थितीत कोरोना रुग्णांसाठी बेड्सचा तुटवडा नाही, असं जिल्हा शल्यचिकित्सक डॅा शामसुंदर निकम यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले "कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 16 टक्के रुग्ण हॉस्पिटल मध्ये दाखल होतात. इतर रूग्ण गृहविलगीकरणात किंवा कोव्हिड केअर सेंटरमध्ये आहेत. त्यामुळे बेड्सची संख्या पुरेशी आहे. पंजाबराव देशमुख हॉस्पिटलमध्ये वाढीव 250 खाटांचं नियोजन आहे. शहरातील 12 खासगी हॉस्पिटल्सना कोव्हिड रुग्णालय म्हणून मान्यता देण्यात आली आहे."
ग्रामीण भागाची स्थिती
अमरावतीचा अचलपूर तालुका कोरोनाचा हॅाटस्पॅाट बनलाय.
"ग्रामीण भागात वाढणार्या कोरोना केसेस चिंतेची गोष्ट आहे," असं जिल्हाधिकारी शैलेश नवल सांगतात.

फोटो स्रोत, Hindustan Times
अमरावतीच्या ग्रामीण भागात मंगळवारी (23 फेब्रुवारी) 271, तर बुधवारी (24 फेब्रुवारी) 196 केसची नोंद झाली आहे.
बेड्सच्या उपलब्धेबद्दल डॉ दिनेश ठाकरे म्हणाले "प्रशासनाने बेड्स वाढवण्यास सुरूवात केली आहे. पण येणाऱ्या काळात बेड्स कमी पडू शकतात. पहिल्या फेजमध्ये डॉक्टरांवर अतिरिक्त बिल वसुलीचे आरोप झाले. डॉक्टरांची बदनामी झाली. डॉक्टरांचा कोरोना काळातला अनुभव अत्यंत वाईट होता. त्यामुळं यावेळी मोजकेच डॉक्टर पुढे आले."

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








