You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे : 'अजित पवारांच्या मनात काय चाललंय, हे समजण्यासाठी 'ती' भाषा शिकणार आहे '
छत्रपती शिवाजी महाराजांची शासकीय जयंती आज 19 फेब्रुवारीला साजरी होत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी 9.15 वाजता शिवनेरीवर पोहोचले आहेत. तिथं त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते.
युद्ध जिंकण्यासाठी एक जिगर लागतो, युद्धावर जाताना तलवार हातात पकडण्याची प्रेरणा शिवाजी महाराजांनी दिलीय, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
पुढे बोलताना ते म्हणाले, "शिवाजी महाराजांना किती भाषा यायच्या, ते मला अतुल सांगत होते. त्यातली एक भाषा होती इंगित विद्याशास्त्र. ती अजित दादानांही येते. पण, आता मी ती शिकणार आहे. का, तर दादांच्या मनात काय चाललं ते कळलं पाहिजे.
"अशी भाषा असते हे इथं आल्यानंतर मला कळलं. आता अजित दादांनी मास्क घालू द्या, गॉगल घालू द्या. तरी ओळखून दाखवतो दादांच्या मनात काय चाललंय."
अजित पवार यांनी यावेळी बोलताना म्हटलं,"यंदा कोरोनामुळे शिवजयंती साजरी करण्यावर मर्यादा आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निधीचं काम दर्जेदार पद्धतीनं झाली पाहिजेत. हा निधी परिसराच्या विकासासाठी आहे. कामाच्या दर्जेत आणि गुणवत्तेतील कमी खपवून घेतली जाणार नाही."
भारतीय पुरातत्त्व विभागानं 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर प्रकाशयोजना केली आहे. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली होती.
याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, "काही उत्साही लोक नको त्या गोष्टी करतात, त्या थांबल्या गेल्या पाहिजे. पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. पुन्हा अशा घडू नये यासाठीची खबरदारी प्रशासनानं घ्यायला पाहिजे."
संजय राठोड प्रकरणात सखोल चौकशी चाललेली आहे. कुठलाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असा विश्वास देतो, असंही ते म्हणाले.
"गजा मारणे संदर्भात पोलीस प्रशासनाला जाब विचारण्यात आला आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सगळ्यांना नियम लावले जातील,"असं अजित पवार पुढे म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)