लग्न असो की प्रेमसंबंध, प्रत्येक नात्यात 'क्लोजर' इतकं महत्त्वाचं का असतं?

    • Author, समृद्धा भांबुरे
    • Role, बीबीसी मराठी

अविनाश आणि सोनाली (दोघांची नावं बदललेली) यांची ओळख झाली एका मॅट्रिमोनियल वेबसाईटवर.

तिशीतला अविनाश दिल्लीतील एका खासगी कंपनीत चांगल्या पदावर काम करत होता. घरातूनही लग्नासाठी दबाव होताच. शेवटी त्याने मॅट्रिमोनियल साईटवर नाव रजिस्टर केलं. यादरम्यान त्याची सोनालीशी ओळख झाली.

हळहळू दोघांमधील गप्पा वाढल्या. तीन महिन्यांनी अविनाश नकळतपणे तिच्या प्रेमात पडला. रात्री गुड नाईट असा मेसेज पाठवून अविनाश झोपला आणि सकाळी मोबाईल हाती घेतल्यावर त्याला धक्काच बसला.

सोनालीनं त्याला सोशल मीडियावर सगळीकडे ब्लॉक केलं होतं आणि ती त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती. तेही कोणतंही उत्तर न देता. तीन महिने ज्या मुलीशी दिवसरात्र गप्पा मारत होतो, तीच मुलगी सरळ ब्लॉक करून निघून गेली होती.

"मी लग्नाचा विषय काढणारच होतो. तिला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं, तर तिनं मला थेट तसं सांगायला हवं होतं. मी काही तिच्यावर स्वत:ला लादणार नव्हतो. पण किमान 'क्लोजर' तरी दिला पाहिजे होता," हे सांगताना अविनाश भावूक झाला होता.

वेदिकानेही असाच प्रसंग अनुभवला. वेदिकांचं लग्न होऊन आता 9 वर्षं होत आली आहेत. तिला लहान मुलगाही आहे. वेदिकाचा संसारही सुखात सुरू आहे. पण काही दिवसांपूर्वी वेदिकाने तिच्या मनातली सल बोलून दाखवली.

वेदिकाचे कॉलेजमध्ये असताना एका मुलाशी प्रेमसंबंध होते. तो तिच्यापेक्षा 2 वर्षं मोठा होता. सगळं काही चांगलं सुरू होतं. त्याला परदेशात नोकरीची संधी आली आणि तो कामानिमित्त आखाती देशात निघून गेला. जाताना तिला भेटूनही गेला.

पण त्यानंतर वेदिका आणि त्याचा संपर्क तुटला तो कायमचा. त्यांच्यात ब्रेक अप असं काही झालंच नाही. बस्स, बोलणं बंद झालं. त्यांच्या बाबतीत समोरच्या व्यक्तीनं सोशल मीडियावर रिलेशनशिप स्टेटस 'सिंगल' असं अपडेट केलं आणि विषय संपला.

वेदिकाला आजही ते नातं का तुटलं हा प्रश्न पडलाय.

"ज्या मुलीसोबत आपण चार वर्षं नात्यात होतो, तिला ठोस कारण देऊन नातं संपवायची गरजही त्याला वाटली नाही का," वेदिका असा प्रश्न विचारते.

"आजही तो माझ्या सोशल मीडियावर आहे. त्याचंही लग्न झालंय. माझंही लग्न झालंय. कधी कधी वाटतं त्याला विचारावं, पण यातून दोघांच्याही संसारात विघ्न नको म्हणून स्वत:ला आवरते. पण वाटतं क्लोजर दिलं पाहिजे होतं," वेदिका तिच्या भावना व्यक्त करते.

कुठलीही व्यक्ती असं का वागत असावी?

रिलेशनशिपच्या बदलत्या संकल्पना आणि तरुणांचे अनुभव जाणून घेतल्यानंतर आम्ही मुंबईतील मानोविकारतज्ज्ञ डॉ. हेमांगी म्हाप्रळकर यांच्याशी संवाद साधला.

त्यांनी सांगितलं, "एकतर त्या व्यक्तीची परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी नसते किंवा त्याला अशा परिस्थितीत काय करावं हेच माहिती नसतं. दुसरं म्हणजे सोडून जाणाऱ्या व्यक्तीसाठी तुम्ही कदाचित महत्त्वाचे नसाल. समोरची व्यक्ती कमकुवत असेल. नकार किंवा विरहाला सामोरे जाऊ शकेल की नाही याचा त्यांना आत्मविश्वास नसेल.

"याचा अर्थ एक तर ते स्वत: कमकुवत आहेत किंवा ते दुसऱ्याला तसं समजतात. दुसरं म्हणजे, सूडाच्या भावनेने सुद्धा काही लोक असं वागू शकतात. तिसरी गोष्टं म्हणजे, एखाद्‌याला वाईट अनुभव आले असतील आणि ते बोलून सोडवणं त्यांच्या तत्वात बसत नसेल आणि पुढे या विषयावर बोलून अजून चिखलगाळ करून घेण्यापेक्षा, नातं जबरदस्ती खेचत बसण्यापेक्षा त्याला सोडून दिलेलं बरं, असं ही त्यांना वाटू शकतं."

खरंच नात्यात क्लोजर इतकं महत्त्वाचं आहे का?

खरंच नात्यात क्लोजर इतकं महत्त्वाचं आहे का, असा प्रश्न विचारला असता मानसोपचारतज्ज्ञ दुष्यंत भादलीकर सांगतात, "क्लोजर म्हणजे एखाद्या नात्याचा समाधानकारक शेवट होणं. समजा एखादा व्यक्ती 7 वर्षं बेपत्ता असेल, तर त्यानंतर तो कायदेशीरदृष्ट्या मृत घोषित केला जातो. याला 'लीगल क्लोजर' असं म्हणूया. नातेसंबंधात 'लीगल क्लोजर' असं नसतं. एखादा व्यक्ती तडकाफडकी निघून गेल्यानं मानसिक धक्का बसणं साहजिक असतं.

"नक्की काय झालं, हे मला समजलं तरंच मला क्लोजर मिळेल, असं आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्षात अशी परिस्थिती नसते. समोरचा व्यक्ती तुम्हाला जे उत्तर देईल ते शाश्वत सत्य असेलच असं नाही. अशावेळी आपण समोरच्या व्यक्तीने दिलेल्या उत्तरावर अवलंबून राहायला नको. '

क्लोजर'साठी प्रत्यक्ष भेटूया, असंही अनेकांना वाटतं. पण दोन्ही व्यक्ती 'विचारांनी प्रौढ' आणि समजूतदार असतील तरच त्यांनी भेटावं. अन्यथा भेट टाळायला हवी, कारण भेटीदरम्यान परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यताही जास्त असते, त्यामुळे प्रत्यक्ष भेट टाळावी," असा सल्लाही भादलीकर देतात.

स्वत:ला क्लोजर देता येतं का?

"ब्रेकअप झाल्यानंतर किंवा एखादी जवळची व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यानंतर त्यांच्यातून कसं बाहेर पडायचं हे आपल्याला ठरवायचं असतं. ते दुसरं कोणी तुम्हाला नाही सांगू शकत," असं डॉ. हेमांगी सांगतात.

"मला याचा त्रास होतो. मला या गोष्टीला सोडून द्यायच्या आहेत आणि पुढे जायचंय, हे तुम्हाला ठरवावं लागेल. आपल्याला जरा लागलं, खरचटलं की आपण लगेच त्यावर औषध लावतो, पण मनाला जर त्रास होत असेल तर आपण काहीच करत नाही. उलट बॉलीवुडचे चित्रपट, गाणी ब्रेकअप किंवा अशा सर्व गोष्टींचं इतकं कौतूक करतात की लोकांना तेसुद्धा नॉर्मल वाटतं.

"कुठल्याही रिलेशनशिपमध्ये चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी असतात. मग एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून गेलीये तर आपण त्या नात्यातला चांगल्या आठवणी घेऊन बाकीच्या गोष्टी सोडून द्याच्या. जे झालं ते तुमच्या चांगल्यासाठी झालं आहे, असा जर विचार करून तुम्ही पुढे चालत राहिलात तर तुम्हाला नक्कीच त्रास कमी होईल,"असं त्या पुढे सांगतात.

विवाह समुपदेशक डॉ. कोरे यांच्या मते, "कोणत्याची नात्यात म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं आणि त्यानुसार संवाद घडतो. प्रियकर/प्रेयसीची एखादी गोष्ट खटकू लागते आणि त्यातून दुरावा निर्माण होतो. कधी कधी संवादाची इच्छा राहत नाही अथवा समोरच्या व्यक्तीत सुधारणेची शक्यता कमी दिसते. अशावेळी ते नातं तुटण्याच्या दिशेनं जातं. व्यक्ती समजूतदार नसल्याचं लक्षात आल्यावर समोरची व्यक्ती अचानक दुर्लक्षही करू शकते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे थोडा प्रॅक्टिकल विचारही केला पाहिजे."

असं घडलं तर काय करावं?

पण, नात्याचा शेवट अकस्मात झाला, तर काय करावं? यावर मानसोपचार तज्ज्ञांनी दिलेल्या या काही टीप्स-

  • वेळेवर झोपा. झोप खूप महत्त्वाची गोष्टं आहे. पूर्ण दिवस झोपून राहून नका. पण रात्रभर जागूही नका. वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा.
  • झोपेसोबतच वेळेवर जेवणंही गरजेचं आहे.
  • कुटुंबासोबत जास्त वेळ घालवा.
  • वेगळ्या गोष्टीत मन गुंतवा. छंद जोपासा. तुमच्यात किती टॅलेंट आहे, हे जगाला कळू द्या.
  • कुठे तरी फिरायला जा. घरात बसून राहू नका, बाहेर पडा.
  • व्यक्त व्हा. तुमच्या मनात जे विचार येतील, ते कोणाशी शेअर करा.
  • व्यायाम करा. तुमच्या मनाला आणि शरीराला आलेली मरगळ झटकण्याची गरज आहे.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे 'क्लोजर' अभावी तुम्ही अडकून पडला असाल किंवा मानसिक नैराश्यातून जात असाल तर मानसोपचार तज्ज्ञांशी संपर्क साधा. हल्ली मानसोपचारासाठी काही हेल्पलाईन्सही आहेत, त्यांचीही मदत घेता येईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता. )